समाजधर्म 45
हिंदूंच्या किंवा मुसलमानांच्या राजवटीत प्रत्येक गोष्टीतील सामाजिक व धार्मिक हेतू विभिन्न दिसत नसत. सामाजिक व धार्मिक हेतू एकात एक मिसळून गेले होते. जे सामाजिक ते धार्मिक वाटे व जे धार्मिक ते सामाजिक वाटे. विचारांच्या दृष्टिने त्यांना पृथक करता येत असे, परंतु आचारास सामाजिक व धार्मिक यात भेदच उरला नव्हता. अमुक का खावे, अमुक का निषिध्द, असाच पोषाख का करावा, असा का करू नये या गोष्टीतही धार्मिक हेतू दाखविले जात. ह्या साध्या गोष्टी तात्कालिक गोष्टी धर्म वाटत, आणि म्हणूनच अनुल्लंघनीय वाटत. त्यात फेरबदल करणे म्हणजे अब्रह्मण्यं वाटे. परंतु आता एकदम सारा रंग पालटला आहे. मनू बदलला आहे. नवी विटी नवे राज्य. पाश्चिमात्य संस्कृती येथे आली. नवीन आचारविचारांशी आपल्या आचारविचारांची तुलना होऊ लागली. प्रत्येक गोष्टीत उपयुक्तता पाहण्याची, हेतू व कारण शोधण्याची बौध्दिक डोळस दृष्टी बळावत चालली. आपणास दिसून येऊ लागले की, अमुक खाल्याने किंवा अमुक पेहरल्याने स्वर्ग किंवा परमेश्वर इतके स्वस्त नाहीत. खाण्याच्या मुळाशी आरोग्य, स्वच्छता इत्यादी गोष्टी दुसर्याही मार्गाने होतील. जुन्याच गोष्टींनी होतील असे नाही. कदाचित आरोग्याची नवीन आहारपध्दतीही शोधून काढता येईल. आरोग्य जर चांगले रहाणार असेल तर मी टोमॅटो खाईन. त्याने माझा धर्म बिघडणार नाही. देव दूर पळणार नाही. कोठेही जगात जा, सुसंस्कृत मानवी जीवनाला स्वच्छता व आरोग्य ही आवश्यकच आहेत; परंतु ती एकाच मार्गाने मिळतील असे नाही. दुसरेही अधिक उपयुक्त व अधिक परिणामकारक मार्ग त्या वस्तू मिळवून घेण्याचे असतील, असू शकतील. निरनिराळ्या देशात निरनिराळ्या आहारपध्दती, पोषाखपध्दती असतील. ह्यांच्यावर धर्माची मुख्य गोष्ट अवलंबून ठेवू नये. चहाच्या पेल्यात धर्म बुडत नाही, बिस्किट खाल्ल्याने मरत नाही. उपरणे पांघरल्याने जगतो असे नाही. शर्ट घातल्याने मरतो असे नाही. हॅट व पागोटे-दोघांचा धर्माच्या प्राणशी संबंध नाही.
पाश्चिमात्त्य संस्कृतीच्या सन्निकर्षाने, आगमनाने बाह्य महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या व आंतरिक महत्त्वाच्या कोणत्या हे आपण पाहू लागलो. मोती व शिंपले, साली व रस निरनिराळे करून पाहू लागलो. सामाजिक आचार व रूढी आणि थोर सात्त्विक विचार यांच्यात फरक करू लागलो. 'शिवू नको' धर्माला रजा देऊ लागलो, हिंदूधर्म म्हणजे टिळमाळा, भस्मे-जानवी, मुकुटे-पितांबर, शेण्डी-दाढी यात नाही हे दिसून येऊ लागले. स्वच्छता व पवित्रता हे ध्येय-मग ते कशानेही गाठा. याप्रमाणे ध्येय व हेतू सापडल्यावर निरनिराळ्या पध्दती व मार्ग यांची तुलना आपण करू लागतो व जी अधिक परिणामकारक दिसेल ती उचलतो. दुसर्याच्या संस्कृतीमधीलही संदेश आपण घेतो व स्वयंसंस्कृतीतील जे चांगले आहे ते घेतो. असा ''सतां सद्भि: संग: कथमपि हि पुण्येन भवति।'' त्यांच्यातील चांगले व आपल्यातील चांगले यांचे लग्न लावून देतो व शुभमंगल होईल अशी सदिच्छा धरतो. उभय संस्कृतीला जे असत् आहे त्याचा त्याग करतो. याप्रमाणे धर्म व सामाजिक गोष्टी यांच्यात फरक करावयास आपण शिकलो. बदलणारा धर्म व शाश्वत धर्म यातील फरक पहावयास शिकलो. सामाजिक रूढी-आहार, पेहराव वगैरे बदलणारा धर्म आहे. त्याचे स्तोम माजवणे बरे नव्हे ही गोष्ट लक्षात आली. आता भिन्न पोषाखाच्या माणसापासून आपण पळून जाणार नाही, भिन्न आहाराच्या माणसास पाहून अब्रह्मण्यं म्हणणार नाही. आपण आता कोपर्यात राहण्यात धर्म आहे असे म्हणणार नाही. यामुळे आता हिंदुधर्म बाहेर अंगणात येणार व जगस्पर्धेत भाग घेणार. तो साता समुद्रापलीकडे जाईल, परकी भाषेतही बोलेल, परकी आचार-विचारांच्या लोकांशी हस्तांदोलन करील, विचार-विनिमय करील. हिंदुधर्म आता झुंजार होणार. नवतेजाने नटणार, सार्या जगाला भेटणार.
आज शाळांमधून बसलेला, निरनिराळ्या वर्गातून बसलेला जो नवभारत आहे त्याला झुंजार व्हावयाचे आहे. झुंजाचे विचार व झुंजाचे ध्येय ह्या कल्पनेने त्यांचे हृदये भरून गेली पाहिजेत. हाच विचार त्यांच्या डोक्यात घोळत राहिला पाहिजे. निष्क्रियत्वाऐवजी क्रिया, हल्ले सहन करीत कोपर्यात जाण्यापेक्षा हल्ले करीत व हल्ले चढवीत उठावणी करणे, दुबलेपणाच्या ध्येयाऐवजी बळाचे ध्येय चित्ती धरणे, उत्साहाची गर्जना करीत शत्रूवर तुटून पडणे, ह्या गोष्टी तरुणांच्या मनात भरून राहिल्या पाहिजेत. नुसती मनाची वृत्ती बदलली की क्रांती झाली. सारे मनावर आहे. मनात नवविचारांची, नवीन ध्येयाची दारू भरा की ठो ठो बार उडू लागतील, धुडुम् धुडुम् आवाज होऊ लागतील. मुलांना हे शिक्षण मिळू दे म्हणजे-दहा-बारा वर्षातच स्पष्ट फरक दिसून येईल. जागतिक स्पर्धेत, जागतिक संस्कृतीच्या झगडयात आपणास विजयी व्हावयाचे आहे, या विचाराचे बीजारोपण बालमनात, तरुण मनात झाले पाहिजे.