Get it on Google Play
Download on the App Store

समाजधर्म 18

जो जो आपणास भेटेल, दिसेल, आढळेल, त्याच्याकडे हा ज्ञानदाता आहे या दृष्टीनेच सदैव बघावे. हयाच्यापासून आपण काहीतरी घेऊ,  हयाच्यापासून आपण काहीतरी शिकू, अशा भावनेनेच त्याच्याकडे पाहावे.  प्रत्यकाचे अनुभव, प्रत्येकाला लाभलेले सत्याचे साक्षात्कार. ते पाहण्यासाठी ते समजून घेण्यासाठी, आपण दक्ष व उत्सुक असले पाहिजे. संधी कधी गमावता कामा नये. अशा रितीने सदैव ज्ञानोत्सुक जर आपण राहू, ही सवय जर स्वत:ला लावून घेऊ ज्ञानाबद्दलचा हा आदर जर अशा रितीने वृध्दिंगत होईल, तर दुसर्‍याच्या मतांबद्दल व विचारांबद्दल पूज्यभाव, आदर व सहानुभूती दाखविण्यास आपण शिकू. सुसंस्कृत व थोर पुरुषांच्यासहवासात राहण्याचे भाग्य ज्याला लाभते, त्याच्या ठिकाणी ही वृत्ती येते. विचारक्षेत्रातही  मागचा व पुढचा हा भाव असतो ही गोष्ट जो विसरून जातो.  आपलेच मत खरे व हे आपणच प्रथम जगाला देत आहोत. मागे कोणी दिले नाही. पुढे याच्याहून चांगले कोणी देणार नाही असे ज्याला वाटते तो मनुष्य हीन वृत्तीचा व असंस्कृत मनाचा समजावा. त्याला सत्संगती मिळाली नाही.  थोरांच्या सहवासात, संतांच्या मेळाव्यात, तो कधी गेला नाही असे समजावे. जी पिढी नवविचार घेत असते. नवीन दृष्टी ग्रहण करीत असते, नवमतवादी म्हणून जी होऊ पाहत असते, त्या पिढीतील तरुण लोकांच्या मार्गात तर असे अहंकार पदोपदी नडतील. एका बाबतीत आपल्या पूर्वजांच्या मार्गाहून आपण भिन्न मार्ग घेत आहोत, एवढयानेच दुसर्‍या क्षेत्रात आपल्या पूर्वजांना अधिक ज्ञान व अधिक अनुभव होते ही गोष्ट ते विसरून जातात आणि जो नवीन  मार्ग त्यांनी आज स्वत:स्विकारला आहे. त्या मार्गातही त्यांच्याकडून पुष्कळ पुढे गेलेली, त्यांच्याहून थोर थोर अशी मंडळी आहेत हेही ते विसरतात. हयामुळे त्यांच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होतो. जो नवविचार आपलासा करून घेत आहेत. जे नवीन ज्ञान ते मिळवीत आहेत.  त्यामुळे ते आपल्या सभोवतालच्या लोकांपासून अहंकाराने व ऐटीने जर  दूर राहतील, तर ते नवीन ज्ञान फारसे किंमतीचे नाही असे खुशाल समजावे. जे ज्ञान सहकार्य शिकवीत नाही, नम्रता देत नाही, पूर्व संस्कृतीबद्द्ल  आदर दाखवीत नाही, ते ज्ञान तरुणांचा विकास कसे करणार? अशा घमेंडखोर व तुसडेपणाच्या वृत्तीमुळे तरुणाचेच नुकसान होते. अशा अविनयी स्वभावमुळे सुसंस्कृत मंडळींत, थोरांच्या बैठकीत त्यांना जाता येत नाही.  थोरांच्या बैठकीत एकदोनदा त्यंची परीक्षा घेतली जाते परंतु शेवटी हीन जणांच्या संगतीत स्वत:हून लहान असलेल्या लोकांतच राहण्याची त्यांच्यावर पाळी येते व तेथे ते नायक होतात. पुढारी व देव होतात ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ या नात्याने मग ते तेथे मिरवतात. व स्वत:च्या अहंकाराची तृप्ती करून घेतात, पूजा करून घेतात, त्यांना तेथे सदैव स्वस्तुतीच ऐकू येते व आपण फार मोठे आहोत असे त्यांना वाटू लागते अशांच विकास थांबतो, वाढ खुंटते. नवीन विचारांचा प्रकाश, नवीन विचारांची हवा त्यांना मिळत नाही. आपण सर्वज्ञ आहोत आपणास कोण काय नवीन देणार, या ऐटीत राहिल्यामुळेच ते अज्ञानात राहतात, अंधारात राहतात. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे सर्वज्ञशिरोमणि जे खरोखर श्रेष्ठ आहेत त्यांना त्रासदायक वाटतात. अशांचा उर्मटपणा व उथळपणा ते किती सहन करणार? हे उल्लू तरुण त्यांना असहय वाटतात. आपण खरे नेते, आपणच अद्वितीय पुढारी, असे ज्या तरुणाला वाटते, हया कल्पनेने जो घेरला गेला, ग्रासला गेला-असा तो तरुण म्हणजे समाजाला जडलेला रोगच होय. शनीची  साडेसात ती, जो शिकण्याच्या वृत्तीचा असतो, मला अजून काय समजले आहे? काहीच नाही, अशी ज्याची नम्रपणाची वरपांगी नव्हे तर आंतरिक वृत्ती असते. नवीन विचारासाठी, नवीन ज्ञानासाठी, सर्वस्व अर्पण करावयास जो उत्सुक असतो. स्वत: कष्टपूर्वक सेवा करूनही विनयाने जो थरथरत उभा असतो, ज्याच्या मध्ये उत्कटता, उत्सुकता व नम्रता सारख्याच प्रमाणात दिसून येतात अशा तरुणाला थोर विचार स्फुरत असतात 'वत्स' एहि एहि' अशा प्रकारची हाक, प्रेमळ व गंभीर हाक परमोच्च ध्येये त्याला मारीत असतात परंतु ही नम्रता ज्यांच्या गावीही नाही, पुढारी म्हणून ज्याला  मिरवायचे असते, तो स्वत:ला वाटेल तेव्हा विकील. तो आज या छावणीत घुसेल उद्या त्यांच्या कंपूत शिरेल. आज येथे पुढारी, उद्या तेथे पुढारी. जेथे पुढारीपण मिळेल तेथे तो जातो व लगेच तेथली मते व विचार त्याचीच होतात. मते व विचार म्हणजे जणू सदरे, कोट वाटेल तेव्हा बदलावे,  वाटेल तेव्हा फाडावे, फेकावे नवीन धारण करावे! परंतु खरे पुढारी ते जन्मत:च पुढारी असतात. पुढारी जगाच्या कारखान्यात व बाजारात तयार करता येत नसतो. तो धरूनच पुढारीपण व त्याला लागणारे गुण घेऊन येत असतो. पुढार्‍याची मूर्ती प्रत्यक्ष परमेश्वराने घडविलेली असते व ती या  जगन्मंदिरात पाठविली जाते. श्रध्दाळू व कष्टाळू सेवकातूनच नेते निर्माण होत असतात. आपल्यातून थोर पुढारी निर्माण व्हावेत. आपणामधून थोर नेते समाजाला मिळावेत, म्हणून आपण भरपूर सेवा करू या; खूप मेहनत करू या] नम्रपणाने गंभीरपणाने व मुकाटयाने खोल असे जे विचार ते सेवा करता करता ग्रहण करीत राहू या. मग खर्‍याने त्याची तूट राष्ट्रास  भासणार नाही. परंतु जेथे असे सेवकच नाहीत, तेथे नेत्यांचे दुर्भिक्ष्यच असावयाचे! जेथे पाणीच नाही तेथे कमळे कुठून फुलणार? मग प्रत्येक सेवकच नेता म्हणून मिरवू लागतो व पूर्वी त्याच्या हातून होणारी  थोडीफार सेवा तिलाही तो मग या पुढारीपणामुळे पारखा होतो.