समाजधर्म 4
हे दिवस असे आहेत की, देव आपणावर नवीन विचारांचा वर्षाव करत आहे, नवीन कर्तव्ये, नवीन रस्ते भगवान दाखवीत आहे, नवीन संस्कृतीचा प्रकाश दाखवित आहे, अशा वेळेस हिंदुधर्माने कोपर्यात बसून चालणार नाही. धर्माने पुढे आले पाहिजे. या नवविचारांची, नवभावनांची केवळ उपेक्षा करून भागणार नाही. त्यांना शिव्याशाप देऊन चालणार नाही. धर्माने त्यांचा अंतर्भाव करावयास, संग्रह करावयास, पोट विशाल केले पाहिजे. हे नवविचार आपणात मिळवून, आपला त्यांच्यावर शिक्का मारून आपले म्हणून, निरनिराळया रूपात प्रकट केले पाहिजेत. प्राचीन काळात, आपल्या पूर्व इतिहासात, प्रत्येक सामाजिक वा राष्ट्रीय जागृतीचा प्रश्न धर्मानेही उचलला होता, त्या त्या जीवनांच्या नानाविध क्षेत्रांत धर्म बेफिकिर राहिला. आपल्या प्राचीन इतिहासात राष्ट्रीय आकांक्षा राष्ट्रीय भावना व राष्ट्रीय विचार यांचे प्रतिबिंब धर्मात पडलेले दिसून येईल. अशानेच धर्म श्रीमंत होतो, संपन्न होतो. यामुळं आपले काही एक जाणार नसून उलट काहीतरी अधिक मिळणारच आहे. सामान्य जनतेसाठी आज धर्माला प्राधान्य देऊ, सेवेला महत्व देऊ, शती उत्कृष्ट आहे, ती पूजाच आहे. नीट कर, रस्ता झाडणे पवित्र आहे, नीट झाड, असे धर्माने आज सांगितले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, ज्ञान व भक्ती हा जो ईश्वराच्या काही थोडया आवडत्या जिवाचा मार्ग तो नाहीसा होईल. ज्ञान व भक्ती आणि त्यामुळे मुक्ती हा मार्गही राहिलच. परंतु सेवेत व कर्मातही मुक्ती आहे हाही मोक्षाचाच मार्ग आहे. असे सांगा, हे दालन नीट खुले करा. तुमचे ज्ञानभक्तीचे दालन खुले आहे; परंतु तेथे लोकांना जाता येत नाही व जमता येत नाही. परंतु सेवारूप व सामाजिक कर्म त्या दालनात अनेकांना येईल. "स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिध्दीं विन्दति मानव:
आपणांस जे योग्य करता येईल, समाजसेवेचे जे कर्म आपणांस करता येणे शक्य असेल; मग ते शेती विणकाम, कुभांरकाम मृत ढोर फाडण्याचे काम कोणतेही असो; ते नीट हृदय ओतून करावे व मुक्त व्हावे; असे श्रीगीता सांगत आहे. गीतेने सर्वांना मोक्ष खुला केला आहे. कर्माचे महान दालन सर्वाना उघडले आहे. तुमचे ज्ञानभक्तीचे दालन ज्या तुम्हा दोनचार जणांना लागेल त्यासाठी खुले आहेच व हेही मोकळे होऊ दे. खरोखर या तिन्ही दालनातील हवा एकमेकात गेली पाहिजे. ती अगदी अलग असताच कामा नयेत. हिंदुधर्म हा स्थाणू नसून गतिमान आहे. ते सदैव विकसित होणारा, नवीन पानाफुलांनी नटणारा, सदैव सतेज व टवटवीत आहे, हे सत्य आपणास सिद्ध करून द्यावयाचे आहे. हिंदुधर्म अनादि आहे तसाच अनंतही आहे. ज्याची वाढ पुरी झाली त्याला अंत्यत येणार; फळ पिकले की पडणार! हिंदुधर्म सदैव वाढतच राहणार व म्हणूनच तो राहिल. नदी वाहते म्हणून तेजस्वी आहे. साचेल तर घाण होईल हिंदुधर्माला साथ व कार्यकर सनातनत्व पाहिजे असेल तर त्याने वाढत रहिले पाहिजे नवीन नवीन घेत राहिले पाहिजे. हिंदुधर्म असा संग्राहक आहे. विकासक्षम आहे, हे जगाला दाखवून द्या.