समाजधर्म 21
८ पूजेचे फूल
ज्या ज्या वेळेस आपण एखादी जुनी हस्तलिखित पोथी, एखादी जुनी तसबीर, एखादे जुने रत्न, किंवा अगदी साधी का गोष्ट होईना - एखादे भांडे, एखादा जरकाम, भरतकाम केलेला कापडाचा तुकडा आपल्या हातात. घेऊन पाहतो, त्या वेळेस क्षणभर का होईना, आपल्या मनात एक विशिष्ट भाव सहजपणाने उत्पन्न होतो. प्रदर्शनात, एखाद्या संग्रहालयात अजबखान्यात जाऊन त्या वस्तू हातात घेऊन पाहा. एक विशेष भाव हृदयात जागृत होतो. ती ती वस्तू पाहताच मनाला प्रसन्नता वाटते. ज्या कारगिराने ती वस्तू तयार केली त्याने स्वत:चे सारे जीवन आनंदाने त्या वस्तुसाठी दिले होते. हृदयाच्या रंगाने ती वस्तू रंगविली होती. मारूनमुटकून गरज आहे म्हणून इच्छा नसताना ते काम निर्माण झालेले नाही, मारूनमुटकून केलेले काम दुसर्याला प्रसन्न करणार नाही, दुसर्याच्या हृदयाला स्पर्श करणार नाही. ज्या कामात आपले प्रसन्न व मोकळे मन ओतलेले आहे. तेच काम दुसर्याच्या मनात प्रसन्न भाव जागृत करील त्या कलावस्तूत कारागीर जे सौन्दर्य ओतीत होता, त्यात त्याचा सारा धर्म होता. त्या क्षणापुरता, त्या घडीपुरता; त्याची कला हाच त्याचा परमधर्म होता ज्या वेळेस स्वत:ला विसरून आपण कर्म करीत असतो. त्या वेळेस आपण अत्यंत धर्ममय असतो.
मोठमोठी कामे अशाप्रकारचे निर्माण होतात. ज्याच्या निर्मितीत माणसाने जीवन ओतले नाही, हृदयाचे रक्त ओतले नाही, ती निर्मिती कवडीमोल होय. आपल्या रक्ताने कर्म रंगवा म्हणजे श्रीरंग तुम्हाला भेटेल. बेफिकिर व विचारशुन्य माणसाच्या दृष्टीला ज्या गोष्टी क्षुद्र व कमी महत्वाच्या वाटतात त्यासाठी लोकांनी जीवन दिलेली असतात. एक सुंदर वीणा तयार करावयास एक वर्षही लागेल, सारे जीवनही कदाचित खलास होईल ते वाद्य उत्कृष्ट तयार करण्यासाठी साधने सारखी शोधीत रहावे लागेल. चांगला दांडा, चांगला भोपळा त्यांना कमावून तयार करणे, मजबूत करणे, तारा जोडणे त्या तारा कशा लावाव्या, किती लावाव्या, अंतर किती राखावे ते मणी अडकवावयाचे, ती घोडी चढवावयाची, त्या खुंटया बसवावयाच्या शेकडो गोष्टी आहेत. तो वीणाकार त्यासाठी रात्रंदिवस श्रमतो व ती वस्तू तयार करतो. त्या वीणाकाराप्रमाणेच दुसरेही असे वेडे पीर असतात. कोणी हस्तलिखित ग्रंथच सुंदर नक्षीने सजवून ठेवतो, कोणी कलाबूतचे अपूर्व काम करतो, कोणी सूर्यकिरणासारख्या झिरझिरीत व तलम शाली तयार करतो. अशी दृश्ये भारतात परवापरवापर्यंत पाहावयास मिळत होती. अशा सुंदर आश्चर्यकारक वस्तू राजे महाराजाच्या संग्रही राखलेल्या आहेत. भारतातील कलावंताची ही नि:संगवृत्ती अजूनही कोठे कोठे निदर्शनास येते. रस्त्यावर बाजारात, गरिबांच्या गल्लीतून असे कलावान काम करताना अजूनही दिसतील. भारतवर्षाचे अजून खरे म्हटले तर मध्ययुगच चालले आहे. यंत्राचा- निर्जीव यंत्रांचा सुळसुळाट अजून येथे फारसा झालेला नाही, अजूनही वस्तूमध्ये अंतंरंगे ओतून जीवने ओतून, त्या वस्तू समाजाला पुरविणारे अल्पसंतोषी कारगीर भारतात वावरत आहेत. मध्ययुगातून अर्वाचीन युगात शिरावयाचे झाले तर किती शिरावे याचा विचार करीत भारतवर्ष घुटमळत उभा आहे. त्याच्या पाठीमागे मध्ययुग आहे व समोर अर्वाचीन युग आहे.
मध्ययुगाचे काय बरे विशेष होते? मध्ययुगात असे काय विशेष होते की ज्यामुळे कारागीर हातातील अत्यंत मोलवान कामापासून तो साधी हुक्क्याची नळी बनविण्याच्या कामापर्यंत सर्वांमध्ये सौंदर्य व कला ओतीत असत? या गोष्टीचा क्षणभर विचार करण्यासारखा आहे पाहिली गोष्ट म्हणजे त्या काळात सुंदर व थोर असा साधेपणा होत. ज्या खोलीत माणूस काम करी, कला निर्मी तेथेच, खाणे-पिणे उटणे-बसणे; तेथेच त्याचा जप, तेथेच त्याची झोप, तेथेच शेजघर व तेथेच देवघर, सारे तेथेच नाना प्रकरच्या काम्य व भोग्य वस्तूंनी त्यांच घर भरलेल नसे, त्याची इच्छा एकच असे व ती त्याच्या कामात ओतलली असे. तीच त्याची हौस. तोच आनंद. त्याच्या खोलीतील जास्तीत जास्त शोभेच्या वस्तू म्हणजे एखादे शेषशायी भगवानाचे चित्र व त्याच्याच हाताने कलांचे काही नमुने, आपल्या कामात पूर्णता आली पाहिजे. ही जी त्याची इच्छा, त्या इच्छेला दुसरे कोणतेही खाद्य त्याच्या खोलीत नसे. ती इच्छाच स्वत:ला खाई व पुष्ट होई. सभोवती अत्यंत साधेपणा असणे, वरती निळा चांदवा, खाली भूमीमाय - दुसरे काही नको. या साधेपणाचा कलेवर किती व काय परिणाम होतो हे आपणास समजून येत नाही. परंतु त्याचा फार खोल परिणाम होत असतो. काही नसण्यात जे सौंदर्य आहे ते पाहणारे फार थोडे. भारतवर्षातील हा साधेपणा आपणांस आजही दुकानातून दिसून येईल. वाणी आपल्या मित्रांना आपल्या दुकानातील मालाच्या राशीतच भेटतो- सभोवती मीठ, मिरची, गूळ, तेल पडलेलेच असते. मध्ययुगात भारतीयाला अभ्यासाची खोली, प्रयोगाची खोली, जेवणाची खोली, लोकांना भेटण्याची खोली सार्या कर्माची एकच जागा व एकच खोली असते.