समाजधर्म 24
९ जीवनाला वळण देणे
दारिद्य माणसाला घणाप्रमाणे ठोकून ठोकून आकार देत असते. आपत्तीमुळे मनुष्याचे चारित्र्य तयार होत असते. दु:ख, कष्ट, आपत्ती हयातून तावून सुलाखून गेलेला मनुष्य समाजात योग्य ते स्थान घेतल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंत मनुष्याला कधी कोठे अडचण नसते. त्याला विरोध माहित नसतो. त्याला सार्या सवलती असतात. सारे हक्क असतात; परंतु म्हणूनच तो नादान निघण्याचा संभव असतो. तो लहरी होतो. तो हजारोंची मने दुखवील व स्वत:चा नाश करून घेईल. मौल्यवान वस्तू प्राप्त करून घेण्याची खरी शक्ती श्रीमंतीपेक्षा दरिद्यात राहूनच मिळविता येते. दारिद्यात असताना मिळालेले ज्ञान व आलेले अनुभव ही फार मोठी संपत्ती आहे व तिच्या जोरावर आपण पुढे वाटेल ते मिळवू शकू. सेवा, दारिद्रय, असहाय्यता हया धीरवान लोकांच्या शाळा आहेत. हया शाळात मोठे लोक तयार होतात. जो लहानपणी गरिबीत वाढतो.
त्याला प्रत्येक गोष्टीत जपावे लागते. जपून बोलणे, जपून चालणे, प्रत्येक शब्दाचा व कृतीचा विपर्यास केला जाऊ नये म्हणून तो जपत असतो. तो कुणाचा अपमान करणार नाही, कुणाला हिडीस; फिडीस करणार नाही. तो उधळपट्टी करणार नाही, आळशी राहणार नाही, तो सर्वाशी सहकार्य करील. समाजात कसे वागावे. समाजाची मनोरचना कशी असते. हे पाहण्याची पात्रता असते. तो दुसर्यांचा मान राखील, कोणाचे मन मुद्दाम दुखावणार नाही, ज्याचा स्वाभिमान दुसर्याच्या स्वाभिमानाला धक्का लावीत नाही, तोच समाजाचे चित्र अजमावून शकेल. राजा व रयत हे बाह्यत% परस्परांशी निराळया रीतीने वागताना दिसतील. उदाहरणार्थ, राजा सिंहासनावरच असेल व प्रजा मुजराच करील या दोघांच्या स्वाभिमानाला कशानेही बटटा लागता कामा नये. आपण जी सेवा करू ती अशा रीतीने करावी की, एक दिवस आपणाला अधिकार प्राप्त होईल. आज आज्ञा इतक्या कसोशिने पाळू या की एक दिवस आज्ञा करणारे होऊ. आजचे उत्कृष्ट सैनिकच उद्याचे सेनानी होतील. थोरांना अशी सेवा करून दाखविण्याची तळमळ असते. त्याप्रमाणे जो सेनानी सैनिकांचा पदोपदी अपमान करील, त्यांचा अभिमान दुखविल, त्या सेनानीचे हेतू कधी तडीस जाणार नाहीत, त्यांचे कार्य विफल होईल.
धनी व सेवक, राजा व प्रजा, सेनानी व सैनिक यांना परस्पर जोडणारे काय असते? परस्परांच्या संबंधातील निर्दोष वागणूक, उभयतांच्या बोलण्याचालण्यात, प्रत्येक शब्दात व प्रत्येक कृतीत दोघांमध्ये सहकार्य आहे ही गोष्ट दिसून आली पाहिजे. अन्योन्य होणार्या सर्व व्यवहारात परस्परांचे दिसून येणारे हे जे अकपट व संशयातील वर्तन, मोकळेपणाचे वर्तन; जोडीत असते. एकमेकांच्या मनात परस्परांबद्दल असणारी जी अचल श्रध्दा ती एकमेकास जोडीत असते. ज्या क्षणी परस्परांच्या वर्तनात श्रध्दा दिसणार नाही. त्या क्षणी संबंध तुटून जातात. जगातील सारे व्यवहार श्रध्देवर व पतीवर चाललेले आहेत. परस्पर विश्वावर सारे विश्व चालले आहे. लष्करात शिकलेला सैनिक सेनापतीला सलाम करतो. सेनापतीला योग्य तो भाव द्यावयास तो कधी चुकणार नाही. सेनापतीही त्या सलामीची दुरुपयोग करणार नाही. सेनापतीही त्या सलामाचा स्मिताने व सभ्यतेने स्वीकार करील व उलट कलाम करील. आपणही त्या लष्करातीलच एक अंश आहोत व त्यामुळे हे आपले स्थान आहे हे ओळखून, हे सदैव हृदयात धरून तो तसे वागेल. ज्या वेळेस हुकूम तोडणार्याला देहांन्त शिक्षा एकदम फर्मावयाची असते. त्या वेळेसही चिर अभ्यासिलेली मनाची स्थिरता तो सोडणार नाही. सेनापती या नात्याने त्याची ती गोष्ट करावी. लागत असते. शिस्तीच्या अमूर्त ध्येयासाठी, लष्कराच्या आदर्शसाठी त्याला ती कठोर गोष्ट करावी लागत असते. ती शिक्षा देण्यात त्याचा व्यक्तिविषयक स्वार्थ, किंवा सूड काहीच नसतो, त्यामुळे त्याच्या हुकुमाची ताबडतोब अंमलबजावणी होते. यामुळेच त्याच्या हुकुमाला अधिकार प्राप्त होतो व दुसरे त्याप्रमाणे करावयास तात्काळ पुढे येतात.