समाजधर्म 3
भविष्यकाळात हिंदुधर्मसुध्दा बहुजनसमाजाच्या विकासात भाग घेतल्यावाचून रहाणार नाही. सामुदायिक प्रार्थनेचे महत्व हिंदूधर्म समजून घेईल. सामान्य लोकांच्या शिक्षणाचा, त्यांच्या विकासाचा विचार वरच्या लोकांच्या मनात डोकावेल व तो त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. सेवेचे विचार, कर्माची ध्येये डोळयासमोर उभी रहातील, साक्षात्काराचे परमोच्च ध्येय सामान्य जनतेसाठी खाली येईल. यशोदेसाठी परमात्मा बाळकृष्ण होईल. विराटविश्वमूर्ती अर्जुनासाठी चहू भुजांनी नटेल. हिंदुधर्म सामान्य लोकांसाठी खाली येणार नाही का? जरा खाली वाकून आपल्या मुलाबाळांशी हितगुज करणार नाही का? साक्षात्काराचे आपण कौतुक करतो, तेच कौतुक सेवा करणार्या पुरुषांचेही आपण करू. याचा अर्थ, असा नाही की, ईश्वराकडे जाण्यासाठी जीवाने विरक्त, निस्संग, अलिप्त रहावे, हा जो विचार तो आपण सोडून देत आहोत. परंतु हा विचार हृदयात बाळगूनही ही दृष्टी जवळ ठेवूनही, आपण सामान्य जनांच्या विकासासाठी, त्यांच्या सृप्त शक्ती जागृत करण्यासाठी झटू. त्यांच्याही हृदयातील देवाला जागृत करणे हे तितकेच महत्वाचे काम आहे; त्यांच्या जीवनाला फुलण्यास मदत करणे हे तितकेच आवश्यक व पवित्र कर्तव्य आहे हे ओळखू; या गोष्टीवर जोर देऊ. आपणात जे निरनिराळे पंथ व समाज उत्पन्न होत आहेत त्यावरून असे दिसते की, ही सेवेची दृष्टी, हे नवीन रूप हिंदुधर्म घेत आहे. आर्यसमाज, ब्राम्होसमाज वगैरे समाज याच दिशेन चालले आहेत, हा नवयुगधर्म सुरू होत आहे.
अर्वाचीन सनातन हिंदुधर्माने लोकहिताचे, लोकांचे लोकजागृतीचे संसार सुंदर व मंगल करण्याचे, जीवन तेजस्व व बलवान करण्याचे असे हे सेवामय स्वरूप जर आपलेसे केले नाही, तर तरणोपाय नाही. हिंदुधर्माला जहर तेजस्वी व्हावयाचे असेल, बलवान जयिष्णु व्हावयाचे असेल, जगाचे मन ओढून घ्यावयाचे असेल, स्वत:च्या इकडे तिकडे जाणार्या, इतर धर्मात जाणार्या मुलांना जवळ ठेवावयाचे असेल, परधर्मांतील श्रध्दाळू लोकांना बाहू पसरून जवळ ओढवयाचे असेल, तर अत:पर हिंदुधर्माने सर्वांपासून दूर असलेल्या उत्तंग व परमोच्च अशा साक्षात्काराच्या ध्येयापासून खाली आले पाहिजे. हिमालयातील शंकराच्या जटाजुटांतील गंगा खाली आली पाहिजे व तिने मैदानावर येऊन लाखो लोकांची शेतेभाते पिकविली पाहिजेत. संन्यासाच्या, साक्षात्काराच्या कैलासावरून सेवेच्या मैदानात, शेतकरी; मजूर यांच्या रोजच्या जीवनात साहाय्य करण्यासाठी धर्माने खाली आले पाहिजे हिंदुधर्माच्या प्रार्थनांत सर्व लोकांना स्थान पाहिजे. त्यांच्या आकांक्षा, त्यांची सुख; दु:खे, त्यांची जीवने, त्यांची हृदये यांचे प्रतिबिंब त्या प्रार्थनेतून पडले पाहिजे. एकत्र जमून सर्वांनी त्या प्रार्थना म्हटल्या पाहिजेत, तन्मयता निर्माण झाली पाहिजे. प्रार्थना चालली असताना लोकांचे हृदय बोलले पाहिजे व तोंडही उघडले पाहिजे. सार्यांनी प्रार्थनेस केव्हा जमायचे, कोठे जमावयाचे, हे ठरले पाहिजे. व्यवस्थितपणा आला पाहिजे मंदिरातील व्यासपीठ आता प्रवचनपीठे होऊ देत, व्याख्यानस्थाने होऊ देत. तेथून साक्षात्कार व संन्यास य परमोच्च ध्येयाचे, जग म्हणजे माया आहे, "का ते कांता कस्ते पुत्र. " वगैरे उपदेशचे न झेपणारे पेलणारे, बोलणार्यांनाही केवळ ओठांपुरते आणि ऐकणार्याला फक्त कानांपुरते असे घुटके पाजण्याऐवजी लोकांना रोजच्या कामकाजात, रोजच्या व्यवहारात उपयोगी पडेल असे शास्त्रीय ज्ञान, आरोग्यज्ञान, सहकर्मज्ञान, संघटनज्ञान या मंदिरातील व्यासपीठावरून दिले गेले पाहिजे. असे केल्यामुळे वैयक्तिक पूजा; जिवाशिवाचे एकांतातील बोलणे, हे देश भक्तांचे हितगुज नाहिसे होईल असे नाही. आपल्या ज्या धार्मिक खजिन्यांची जुन्या ठेवण्याची; किंमत आताशी फिरून कळू लागली आहे ते खजिने, ते ठेवे, आपण गमावू अशी कोणालीही भीती वाटायला नको.