Get it on Google Play
Download on the App Store

समाजधर्म 25

अशा प्रकारची सत्ता चालविण्यास संयमाची अत्यंत आवश्यकता असते. अत्यंत गुंतागुंतीचे हे अनुभव असतात. अनेक प्रकारच्या गुंतागुंतीतून मार्ग काढावयाचा असतो. नाना भावना, नाना विचार, नाना विकार, नाना प्रश्न हृदयात थैमान घालतात व त्यातून मार्ग निर्माण करावयाचा असतो.  मनाच्या मृदु व हळूवार भावना, त्याचप्रमाणे न्यायाच्या प्रखर भावना दोन्हीही उभ्या असतात. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या मेंदूत अनेक गोष्टीचे सतत, अनेक गोष्टीचे ध्यान राहिले पाहिजे.  बारीक; बारिक शेकडो गोष्टी, त्याचे संबंध व त्यांचे परिणाम इकडे लक्ष ठेवावे लागेल.  अशा माणसाचीच सत्ता दृढ होईल व चिरकाल टिकेल. ज्याला स्वत:चे मन ताब्यात ठेवता येते, जो स्वत:चा स्वामी आहे, स्वत:च्या लहरीचा वासना; विकारांचा जो गुलाम नाही; तोच पुरुष सत्ता गाजवू शकेल, काम करू शकेल. तोच अधिकार चालवू शकेल. गडबडगुंडा व गोंधळ बंद करू शकेल. ज्याला स्वत:चा स्वभाव ताब्यात ठेवता येत नाही. स्वत:च्या भावनांवर ज्याला नियंत्रण ठेवता येत नाही. त्याला लहान मुल असो,  चाकर असो, अनुयायी असो; कोणी मानणार नाही. सारे त्याचा तिरस्कार करतील. त्याच्या शब्दाला किंमत राहणार नाही. कारण त्याला स्वत:लाच स्वत:च्या शब्दाची किंमत नसते. दुसर्‍यांना शिस्त व संयम शिकविण्यापूर्वी आपण आपल्या मनाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावयास हवा. सत्ता व  अज्ञानपालन हया दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो दुसर्‍याला  अमुक कर असे सांगतो. त्याप्रमाणे तो आधी तसा वागत असला पाहिजे, तरच त्याच्या सांगण्याला अधिकार येतो, तरच त्याच्या आज्ञेत सामर्थ्य असते. आधी स्वत:स्वत:ची आज्ञा पाळा व मग दुसर्‍यास हुकूम करा.  मीच माझा सेनापतीही आहे. मीच माझा गुरूही आहे  व शिष्यही आहे.  मलाच आधी माझा शिष्य होऊ दे. मग इतर शिष्य मला मिळतील. आपले शिक्षण त्या मानाने उत्कृष्ट झालेले त्या मानाने आज्ञानालनाची शक्ती आपणास जास्त. जे आज सत्ता गाजवीत आहे, तो काल हुकुमाप्रमाणे वागत होता.  आपण उत्कृष्ट रीतीने आज्ञापालन करण्यास, शिस्त पाळण्यास शिकू या की उद्या आपणांस आज्ञा करणारे होता येईल. बलवान् मनुष्याचे बळ  अशाच निरनिराळया साधानांनी निर्माण झालेले असते. संयमातून व साधनेतून  सामर्थ्य प्राप्त होत असते. व्रतपालनाने विजयशक्ती येत असते. 

मनुष्य महाविद्यालयात जातो का जातो? शिक्षक होण्यासाठी ? नाही,  तर कसे शिकवे हे शिकण्यासाठी आपण जे जे ऐकतो व जे जे पाहतो,  त्यापासून योग्य तो बोध ज्याची बुध्दी व हृदय घेऊ शकतात, तोच खरोखर चांगल्या रीतीने शिकून तयार झाला. या जगात शिकून व मनाने व बुध्दीने कसे मोठे व्हावे हे ज्याला समजले, ज्याची इंद्रिये सदैव दक्ष असतात.  ज्यांचा मेंदू तरतरीत असतो, आजूबाजूस होणार्‍या शेकडो हजारो गोष्टीच्या बाबतीत जो आंधळयाप्रमाणे व बहिर्‍याप्रमाणे वागत नाही, तोच खरोखर शिकला, एखादया रोपात कसे बदल होतात हे अशिक्षिताला काही कळणार नाही. ते रोपटे अशिक्षिताला आपली कथा; जीवनकथा सांगू शकणार नाही,  सांगू लागले तरी त्याला समजणार नाही. अशिक्षित कधी खोल बघणार नाही, नाना प्रकारच्या चाली व रूढी का पडल्या हे तो शोधणार नाही. त्याचप्रमाणे ज्यांना पुष्कळ पठित ज्ञान आहे. जो केवळ पुष्कळ चोपडया व  पुस्तके वाचतो, तोही खरोखर शिकला असे नाही, तो पढतमूर्ख असण्याचा संभव असतो. इंद्रिये जी अनुभवसंपत्ती क्षणोक्षणी आणीत असतात. इंद्रिये  जी मालमसाल्याची पोती भराभर भरून आणून ओतीत असतात, त्याची  उत्कृष्ट निवड करणारा, त्या सर्वांमधून उत्कृष्ट सोयी तयार करणारा, त्या सर्वाचा नीट पारिपाक करणारा तोच खरा शिकला. एक मानसिक क्रिया इतर शेकडो मानसिक क्रियासाठी आपणांस समर्थ करीत असते. केलेला एक विचार दुसरे दहा विचार करण्याची ताकद देत असतो. एकाग्रता साधण्यासाठी केलेला प्रयत्न मनावर सत्ता चालविण्याची शक्ती देत असतो.  आणि जो स्वत:च्या मनाचा मालक झाला तो जगाचा पालक होतो, तो जगाला हुकुम देण्याची शक्ती मिळवितो.

जो मनुष्य विद्यार्थी होण्यासाठी शिकतो. शिकण्याची कला शिकण्यासाठी शिकतो, आणि जो दुसर्‍यापेक्षा आपण वरचढ व्हावे, आपणास भरपूर पगार मिळावा, आपणास विद्वान म्हणून मान मिळावा म्हणून शिकतो त्या दोघांच्यामध्ये केवढे नैतिक अंतर, केवढी नैतिक तफावत दिसून येईल? एक सरस्वतीचा भक्त तर एक भाडोत्री हमाल. म्हणून तर आपल्या शास्त्रात पदोपती सांगितले आहे की, ज्ञानासाठी म्हणून ज्ञान मिळवा, प्रेमासाठी म्हणून प्रेम करा. फलरहित नि:स्वार्थसेवा ही फार थोर वस्तू आहे व हिंदुधर्म तीच तुमच्याजवळ मागत आहे. खर्‍या सिध्दीला दोन गोष्टीची जरुरी  असते. निर्मळ व निस्वार्थ हेतू व त्या हेतूच्या परिपूर्णतेसाठी स्वात्मार्पण करण्याची तयारी हया दोन गोष्टी जवळ असतील तर बाकी सारे आपोआप येईल आणि म्हणूनच तलवार गाजवणार्‍या विजयी वीराच्यापोटी जन्मास येण्यापेक्षा संतांच्या पोटी जन्मलेले अधिक बरे. वीर भूमीत जन्मण्यापेक्षा संतभूमीत जन्मणे अधिक श्रेयस्कर होय, कारण वीर जे मिळवितो. ते तो उपभोगून टाकतो. त्याने जे मिळविले ते त्यानेच भोगून गमविले. परंतु संत  जे सामर्थ्य मिळवितात. ते भावी पिढीला ठेवून जातात.