समाजधर्म 40
१५: जगाला जवळ घेणारी नीती
मनुष्य हा समाजाचा एक घटक आहे. मनुष्य व समाज यांच्यामध्ये अवयवी आणि असा संबंध आहे. मनुष्याला जणू स्वतंत्र अस्तित्वच नाही. हातपाय, नाकडोळे, बुध्दी, हृदय, मन इत्यादी साधनानी युक्त असा मनुष्य समाजपुरुषाचे, एक साधन आहे. आपण समाजासाठी आहोत, दुसर्यांसाठी आहोत हा विचार आपल्या मनात जवळ जवळ येतच नाही असे म्हटले तरी चालेल. परंतु अत:पर ह्या विचारांची उपेक्षा करून चालणार नाही. राष्ट्राच्या दृष्टीने या विचाराला आज जितके महत्त्व आहे तितके दुसर्या कोणत्याच विचाराला नाही. एका सुप्रसिध्द युरोपियन समाजशास्त्रज्ञाने असे म्हटले आहे की, 'मनुष्याची संस्कृती व सुधारणा जितकी कमी तितका तो 'आम्ही' चा विचार अधिक करतो. त्याची सुधारणा जितकी कमी तितका तो 'मी' चा विचार अधिक करतो. ' असंस्कृत, रानटी मनुष्य समुदायाचा विचार प्रथम करतो व नंतर स्वत:चा करतो. हे वाक्य जरी वदतोव्याघातासारखे वाटले तरी तसे ते नाही.
शिकणार्या पुष्कळ लोकांना हे माहीत असेल ही, बेडकाचा मेंदू जरी काढून ठेवला व त्याच्या मागच्या पायावर अॅसिडचा थेंब टाकला तर तो पाय चटकन आत ओढला जातो, शरीराच्या जवळ घेतला जातो. हे ज्ञान त्या पायाला मज्जातंतूच्या द्वारा झाले नाही. मधल्या ज्ञानतंतूच्या उठाठेवीची जरूर न लागताच होणारे जे बाह्य परिस्थितीचे ज्ञान त्याला प्रतिक्रियात्मक ज्ञान असे म्हणतात. ते संवेदनात्मक ज्ञान नव्हे. आपल्या स्वभावांतील बरेचसे गुणदोष हे अशा रीतीनेच आपणात आलेले असतात. समाजातून आपणास न कळत ते आपणात येतात. समाजाच्या कृतीची ती प्रतिक्रिया असते. हे सारे सहज जणू होते. तेथे मेंदूची जरुरी नसते.
समजा, तुमच्या कुलाभिमानाला कोणी डिवचले तर लगेच मनात सूडबुध्दी येत नाही का? तुमच्या पत्नीच्या अंगाला कुणी स्पर्श केला तर तुम्ही व तुमच्या कुटुंबातील सारी मंडळी चवताळून नाही का जाणार? अशी जी ताबडतोब उत्पन्न होणारी सूडबुध्दी ती का विचारात्मक क्रिया असते? नाही ती तत्क्षणीची एक प्रतिक्रिया असते. यावरून समाजशास्त्रज्ञाचे जे म्हणणे वर दिले आहे तेच नाही का सिध्द होत? आजसुध्दा कौटुंबिक बाबतीत कुटुंबाचा जितका विचार करतो तितका स्वत:चा एकट्याचा करीत नाही. मानवजातीच्या उत्क्रांतीकडे जर लक्ष दिले तर जसजसे आपण मागे मागे जाऊ तसतशी ही ही वृत्ती अधिकच प्रबळ असलेली आपणास आढळून येईल. ज्या काळात व्यक्तिचे कार्यक्षेत्र फार मर्यादित असे, त्या काळात प्रत्येक व्यक्ति आपल्या कुटुंबाला, आपल्या जातीला, आपल्या वंशाला अधिक चिकटून बसत असे. जसजसा काळ वाढत जातो, कार्यक्षेत्राचा विस्तार वाढतो, तसतसा व्यक्तिव्यक्तिंमधील बाह्य संबंध कमी कमी होत जातो. मते बदलतात, विचार निराळे होतात, आचार भिन्न होतात. भावाभावामध्ये, पितापुत्रामध्ये, पतिपत्नीमध्ये, ध्येयाचे बाबतीत, आचारविचारांचे बाबतीत भेद दिसून येतात. समाजातील नीती व कायदे म्हणजे समाजाचे प्रतिबिंब म्हणजेच श्रुतिस्मृतिपुराणे. समाजातील संस्थाही समाजातील विचाराच्याच निदर्शक असतात. समाजातील झाडून सारे सामाजिक बुध्दीचे प्रतिबिंब असते. एक पत्नीव्रत म्हणजे नीतीच व बहुपत्नीकत्व म्हणजे नीतीच. युरोपातील सतीचाही प्रभाव तिकडील कवींनी वर्णिला आहे. युरोपची जोन ऑफ आर्क आहे. भारताची सीतादेवी आहे. दान्ही देवताच, थोर विभूतीच-परंतु स्वरूप मात्र निराळे.
समाजाचे प्रतिबिंब सामाजिक ध्येयात, नीती-नियमात, नाना प्रकारच्या आचार-विचारात पडलेले असते. ह्या सर्वांचे मिळून व्यवस्थित केलेले जे शास्त्र, त्याला नीतिशास्त्र म्हणतात. व्यक्तीच्याद्वारा होणारे मानवजातीचे ध्येय म्हणजेच निती. ह्यावरून सहजच लक्षात येईल की, नीती ही गतिमान असते, नीती कधी स्थिर नसते. सर्व काळात आचारविचार सारखेच नसतात. नीती सर्वकालीन नसते; ती तात्कालीन असते. सामाजिक जीवनाचे अनुभव वाढतात, गुंतागुंतीचे होत जातात; बुध्दीवैभव वाढते; कर्माचे क्षेत्र वाढून विचाराचे क्षेत्र वृध्दिंगत व विशाल होते. हे सारे होत जाते तसतसे नीतीचेही स्वरूप अधिक सूक्ष्म व सुंदर होते. तिच्यातील ओबडधोबडपणा जातो. तिच्यातील ठरावीकपणा जाऊन तिच्यात विविधता येते. रमणीय असे वैचित्र्य येते. एक काळ असा होता की, ज्या वेळेस कौटुंबिक व जातीपुरती नीती पुरेशी असे. अशा या नीतीच्या नावाखाली इतर जातीच्या लोकांना बिनदिक्कत ठार मारण्यात येई. त्या भिन्न जातीच्या डोक्यावरही घाव मारले जात. ह्या विसाव्या शतकातही असे प्रकार कमी झाले आहेत असे म्हणता येणार नाही. आपल्या समाजाहून भिन्न समाजातील लोकांची छळणूक व लूट नीतीच्या नावाखाली आजही करण्यात येत आहे. त्या ध्येयदेवांना जमीनदोस्त करण्यात येत आहे. आपली संस्कृती दुसर्यावर बळजबरीने लादू पाहणारी नीती ह्या सुधारलेल्या विसाव्या शतकात सुधारलेली राष्ट्रे मानीत आहेत व पाळीत आहेत, हे दुर्दैव होय.