समाजधर्म 12
५ सुखविलास व पुरुषार्थ
आपल्याला रिकामा मिळालेला वेळ आपण कशात खर्च करतो यावरून आपल्या शिक्षणाची खरी परीक्षा होत असते. आपणाला जी कर्तव्ये व जी कामे करावीच लागतात व म्हणून जी यथासांग आपण पार पाडतो. त्यातून आपले खरे चारित्र्य प्रकट होत नाही, तर आपणास कोणत्या गोष्टीची हौस आहे, कोणत्या गोष्टीत आनंद वाटतो, कोणत्या गोष्टीचा आपणास छंद आहे; त्यावरून आपले शील व आपले चारित्र्य ही दिसून येतात.
ज्या काळात सुखविलासाचे पुराण सर्वत्र सांगण्यात येत असते, त्या काळात श्रीमंत वर्गाचे अपरंपार नुकसान होण्याच संभव असतो. नीट व्यवस्थित श्रम केल्याने जो मनुष्य भला माणूस झाला असतो, तोच मनुष्य हे पुराण ऐकून पशूही होतो. आणि सारेच जीवन ख्यालीखुशालीत जर दवडील तर पशूहूनही तो नीच होतो आणि ज्या वेळेस हया सुखभोगाच्या, ख्यालीखुशालीच्या कल्पना परदेशांतून येतात, त्या वेळेस आपले जे नुकसान होईल त्याला तर मोजमापच राहणार नाही. हया विदेशी विलासकल्पानांचा जर आपणावर पगडा बसला तर शतमुखानी आपली हानी होईल. मोटार गाडीने जो अनिवार्य व अपरिहार्य विनाश आणिला आहे त्याला युरोपांतील नीतीही आळा घालू शकत नाही; मग मोटारच नव्हे, तर मद्याचे प्याले, घोडयाच्या शर्यती वगैरे शेकडो प्रकार आले म्हणजे हिंदी राजेरजवाडयांची, हिंदुस्थानातील जहागिरदार, जमीनदार, कारखानदार यांची काय स्थिती होईल व कोठवर पाळी येईल हे कोणी सांगावे? आणि पुन्हा युरोपमधील थोर नैतिक ध्येयांचा ज्यांना स्पर्शही नाही. अशा युरोपियन लोकांकडून हे प्रकार आमच्या श्रीमंतांना दाखविले जातात व शिकवले जातात; हया-मुळे तर आणखीन धोका.
सदैव बंधनात ठेवल्याने व्यक्तीची खरी परीक्षा होत नाही. बंधने काढून व्यक्ती मुक्त करा व मग ती आपले स्वातंत्र्य कशा तर्हेने घालविते त्यावरून तिच्या शिक्षणाची किंवा इतर विचारपध्दतीची परीक्षा करा. एकाच ध्येयाकडे येण्यास अनेक मार्ग असतात. हिंदु-मुसलमान, ख्रिश्चन यांच्या शिष्टाचारांच्या पध्दती वेगवेगळया असतील. परंतु त्या त्या पध्दतीच्या द्वारा त्यांचा शिष्टपणा प्रकट झाला पाहिजे. पध्दत कोणतीही असो, शब्द कोणत्याही भाषेतील असोत, त्यातून एकच अर्थ निघाला पाहिजे, त्या निरनिराळया लोकांच्या भिन्न पध्दतीतून त्यांची भलाई, त्याचे सदगृहस्थत्व प्रकट झाले पाहिजे. जर तो सभ्य गृहस्थ म्हणून ठरला नाही तर त्याचे शिक्षण कुचकामाचे ठरेल, त्याची संस्कृती हीन ठरेल. युरोप काय किंवा अशिया काय दोन्ही ठिकाणी जुगार खेळणे, दारू पिऊन झिंगून पडणे, सारखे तोंडाचे धुराडे चालू असणे हया गोष्टी सभ्यतेच्या मानल्या जात नाहीत. अशा ओंगळ गोष्टी करणार्याला चांगले गृहशिक्षण मिळाले आहे असे समजत नाहीत आणि हया गोष्टी जरी समाजात रूढ असल्या तरी त्यांना मर्यादा असते. अमर्यादपणा होऊ देत नाहीत. अमर्यादपणा झाला तर शिष्टाचाराचा भंग झाला असेच मानतात. युरोपमध्ये इतरांनी आपणास बावळट व नेभळट समजू नये म्हणून फार दक्षता बाळगतात, ते तरतरीत राहतील, नीटनेटका पोषाख करतील, चपळ व उत्साही रहातील. तसेच स्त्रियांना व इतर अशक्त, पंगू वगैरे माणसांना आपण सांभाळले पाहिजे, त्यांना साहाय्य दिले पाहिजे, अदबीने त्यांच्याजवळ वागले पाहिजे, हया गोष्टी युरोपमधील लोकांत जणू उपजतच असतात. स्त्रिया पाहून ते फिदीफिदी हसणार नाहीत. स्त्रियांच्या समोर ते दाक्षिण्याने वागतील. हे गुण प्रत्येकात असलेच पाहिजेत अशी युरोपियन संस्कृतीची शिकवण आहे. धडधाकट शरीर, बेताबाताचा कपडालत्ता, बळकट मनगट, आनंदाने शारीरीक कष्ट सहन करण्याची तयारी हया गोष्टी सदगृहस्थ होण्यास तिकडे आवश्यक आहेत. युरोपियन समाजाच्या या ध्येयामुळे तेथील व्यसनांनाही आळा बसतो. परंतु मनुष्य सदैव हेतु:पुरस्सर ध्येयाला चिकटून बसतोच असे नाही. यामुळे युरोपियन लोकांचे सद्गुण एकदम मनात भरण्याऐवजी त्यांचे दोष व त्यांची व्यसनेच हिंदी विद्यार्थ्यांच्या डोळयांत भरण्याचा अधिक संभव असतो.