समाजधर्म 13
आपल्याकडील विद्यार्थ्यीच नाही, तर सारेच वर्ग पाश्मित्यांच्या चालीरीतींकडे झुकत आहे. परंतु दु:खाची व खेदाची गोष्ट ही की, त्याच्या ध्येयाकडे व सदगुणाकडे न झुकता, त्यांच्या नटण्या मुरडण्याच्या, त्यांच्या सुखविलासांच्या कल्पनांकडेच आपण जोराने खेचले जात आहोत. इंग्लंडमध्ये सकाळी सारेच चहा घेतात. त्यात काही दोष आहे असे मानण्यात येत नाही. परंतु रेल्वेपासून दूर असलेल्या भागात इंग्रज मनुष्य पायांनी हिंडेल किंवा फार तर घोडा होईल. त्याने तसेच केले पाहिजे. आपण त्यांचा चहा उचलला; परंतु खेडयापाडयात जातानाही आपण गाडीघोडे उडवीत जाऊ, किंवा पालखी मेणे सजवू. इंग्रजी मनुष्य चांगले खातो परंतु कामही भरपूर करतो. समाजात चार; चौघात तो आपल्या शरीरप्रकृतीची, आरोग्याची चर्चा करणार नाही. त्यांना त्यात कमीपणा वाटतो. आजारी पडण्याची त्याला लाज वाटते व म्हणून शक्यतो आपल्या आजारीपणाचे तो प्रदर्शन करणार नाही. दुसर्यांनी कीव करावी, दया करावी, असे त्याला वाटत नाही, इंग्रज मनुष्य स्वाभिमानी आहे. त्याला निशाण मारता येतो, पिस्तुल झाडता येते. या जगात तो मर्दाप्रमाणे वागेल व आपल्या सर्व शक्तीनिशी तो स्वत:चा बचाव करून घेईल. आपण इंग्रजाप्रमाणे पाव, बिस्किटे, अंडी, यांचा खुराक सुरू केला, परंतु स्वत:बद्दलची कुरकुर कधी न करणारा त्यांचा स्वाभिमान, ज्यामुळे अंध:पात होईल असल्या सुखलोलुपतेचा त्यांच्याजवळील अभाव, या गोष्टीचे मात्र अनुकरण आपण करणार नाही. इंग्रजाचा स्वछंदीपणा सहज आपलासा करू, परंतु त्यांचा संयम, स्वाभिमान व मर्दपणा यांना जवळ करण्याची गोष्ट काढणार नाही.
ज्याला आधीच धोक्याची सूचना मिळाली त्याचा अर्धाअधिक सांभाळ झाला भारत वर्षात ही धोक्याची घंटा वाजली आहे. आपली नीती बिघडू न देणे, आपले चारित्र्य निष्कलंक ठेवणे, दृष्टी निर्मल राहणे, यामध्ये जे सामर्थ्य आहे ते आपल्यापैकी फारच थोडयांच्या ध्यानात येते. अंगबळापेक्षा अकलेचे बळ अधिक, परंतु अकलेच्या बळापेक्षा चारित्र्याचे बळअधिक पावित्र्य हे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. आपली ध्येये हीच आपली अभेद्य कवचे, हीच संरक्षण करणारी चिलखते, नरजातीची व नारीजातीची थोरवी कशात आहे ते आपण सदैव ध्यानात धरू या. ते जर ध्यानात राहील तर फुरसतीचा मिळालेला प्रत्येक क्षण, धनधान्याचा मिळलेला अधिक कण म्हणजे थोर ध्येयासाठी करावयाचा जो महायज्ञ, त्याचीच नवीन सामग्री होय असे आपण मानू व त्या क्षणाचा व त्या कणाचा आपल्या ध्येयप्रसिध्दीच्या कामात उपयोग करू.