Get it on Google Play
Download on the App Store

समाजधर्म 30

शिक्षकही पवित्र व मुलांनाही तो पवित्र मानीत आहे. समोर बसलेली मुले ही शिबीश्रियाळाची, प्रताप, कर्मवीर होतील अशी तो भावना करील.  विवेकानंद कलकत्याला एका महाराष्ट्रीय योगिनीकडे गेले होते.  ती काही बंगाली मुलींना शिकवीत होती.  विवेकानंदांनी वंदन केले व विचारले, 'काय चालले आहे''? ती थोर बाई म्हणाली.  ''या माझया देवांची सेवा करीत आहे. '' खरी अद्वैती ती होती. म्हणून शिक्षक होण्यास ती योग्य होती. जो सर्वत्र एकत्व अनुभवतो तोच उत्कृष्ट शिक्षक होय.  तोच नवीन पिढी ऐक्यासाठी निर्माण करील तोच नवीन पिढीला मंगलाची दृष्टी देईल. परंतु असे थोर आचार्य; रॉय, असे थोर शिक्षक आहेत कोठे?

आपण मनुष्य आहोत, पशु नाही. ''मानुष अमरा तय तो मेष''  आम्ही मनुष्य आहोत, मुकी बिचारी मेंढरे नाहीत. आपण चैतन्यमय आहोत, शरीरमय नाही. आपण ज्योतिर्मय आहेत, मृण्मय नाही. विचार व साक्षात्कार चितंन व दर्शन म्हणजेच आपले जीवन, खाणे पिणे, भोगणे, झोपणे हे मानवाचे सारे जीवन नव्हे. आज ह्या काळात असा अनुभव घेणे कठीण का आहे? ह्या कलियुगात असले जीवन कोठले लाभायला असे का म्हणता? कोणी तुम्हाला सांगितले हे कलियुग म्हणून? काळाला स्वरुप देणारे तुम्ही आहोत. तुम्ही कराल तर हा क्षण सत्ययुगाचा आहे. कराल तर कलीयुगाचा आहे. कलियुग वगैरे भ्रांत कल्पना आहेत. आजचा हा क्षण म्हणजे वाढत आलेला प्राचीन काळच होय. आताच्या हया क्षणात प्राचीन सर्व युगे एकवटली आहेत. ज्यायुगात महाभारते झाली, रामायणे झाली, ज्या युगात वेद स्फुरले, उपनिषदे गायिली गेली, ज्या युगात महर्षी झाले, योध्दे व वीर चमकले, ज्या युगात शास्त्रकार, भाष्यकार व्याकरणकार झाले. ती सारी युगे तो सारा गतकाळ या आताच्या एका क्षणात पुंजीभूत होऊन उतरलेला आहे. त्या प्राचीन सर्व युगाचे सार ह्या क्षणात आहे, माझ्या मागच्या अनंत जन्माचे सार म्हणजे हा जन्म, त्याप्रमाणे मागच्या सर्व काळाचे सार म्हणजेच आजचा काळ, सारा भूतकाळ ह्या क्षणात साठवलेला आहे. समुद्राच्या थेंबात सार्‍या समुद्राची चव, अत्तराच्या एका थेंबात हजारो फुलांचा सुगंध, त्याप्रमाणे ह्याच्या आताच्या क्षणात सर्व प्राचीन काळातील सर्व विचारांचे सार आहे. हे सारे गतवैभव या क्षणात आहे. आणि हा क्षण मला मिळालेला आहे. म्हणजे सारे प्राचीन भांडार माझे आहे. मी त्याचा वारसदार आहे. पूर्वजांची सारी अनुभवसंपत्ती हा क्षण मला देत आहे.  ती मी घेतो व पुढे उडी मारतो.  या अनंत पूर्वशक्तीच्या साहाय्याने मी आणखी उंच उडी मारणार व नवविचारनक्षेत्रे मिळविणार.  ज्ञानासाठी म्हणून मला ज्ञान पाहिजे आहे.  म्हणूनच ते संपूर्ण पाहिजे आहे. मानवजातीची सेवाही सेवेच्या आनंदासाठीच मला पाहिजे ह्यासाठी स्वार्थ मला झडझडून फेकून देऊ दे.  मी भारतातील ऋषिमुनीचा नाही का? मी सर्वत्र अद्वैत पाहण्यासाठी धडपडणार नाही. का?