समाजधर्म 36
भारताला सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रात का स्थान दिले जात नाही याचे कारण शोधून काढावयाचे म्हटले तर ते सहज सापडण्यासारखे आहे. या जगात दुसर्यांना जिंकण्याच्या इच्छेने भारत कधी गेला नाही आणि आजच्या काळातही नम्रपणे व विनयाने जे नवीन मिळत आहे ते सुखासमाधानाने घेत आहे. या नवीन गोष्टी परिचित असल्यामुळे प्रथम जरा तो भांबावला, दिपावला. गेल्या दोन पिढ्या हिंदुस्थानांतील लोक जणू स्वप्नात असल्याप्रमाणे चालत होते. ते भ्रमिष्टासारखे भटकत होते, वावरत होते. येणार्या नवीन प्रचंड लाटांचा प्रतिकार त्यांना करता येत नव्हता. ते वाहावत जात होते. त्यांच्यात मर्दपणा, पौरुष जणू राहिलेचे नव्हते.
परंतु आज? आज डोळे झाडझाडून, दृष्टी साफ करून, कंबर कसून, मनगट सरसावून भारत; नवभारत हा तरूणभारत; उभा राहिला आहे. सिंह जागा झाला आहे. पूर्वीचा मेंगरूळपणा व बेंगरूळपणा त्याने झुगारून दिला आहे. जीवन म्हणजे संग्राम आहे, स्पर्धा आहे हे त्याने पुरे ओळखले आहे. आम्ही आता विरुध्द मातबरांशी? विरूध्द प्रबळ शक्तीशी झुंज घेऊ, झगडू. या झगड्यात आमचे तेज प्रकट होईल व जगाच्या तेजात आम्ही भर घालू. जगाने दिलेले दोन तुकडे दीनवाणेप्रमाणे चघळीत नाही राहणार. जगाचे अनुकरण करीत, जगाच्या पाठोपाठ खाली मान घालून गुलामाप्रमाणे, गोंडा घोळणार्या कुत्र्याप्रमाणे, अत:पर भारतवासी जाणार नाहीत. आता आम्ही अक्रिय न राहता सक्रिय होणार; दुसर्याचे हल्ले सहन करीत किंवा परतवीतच न बसता फेरहल्ले चढविणार व शत्रूच्या गोटात शिरणार, अत:पर दुसर्यांनी आम्हाला हुकूम फर्माविण्याची जरूरी नाही, ते आम्ही चालू देणार नाही. आमच्या दैवाचे आम्ही नियते, आमच्या भाग्याचे आम्ही विधाते. सबंध भारत आता एक राष्ट्र होऊ दे. नसानसातून एकराष्ट्रीयत्वाचे रक्त उसळू दे; नाचू दे. सर्व राष्ट्राचे हृदय एक होवो, बुध्दी नाडी एक होवे, एक होवो, एकाच विशाल व थोर हृदयाशी जोडलेले आपण सारे अवयव बनू या. अविरोधी, सहकारी अवयव बनू या. आपण आपले कार्यक्रम ठरवू. कूच कसे कोठून करावयाचे, मजल दरमजल कसे जावयाचे, कोठे मुक्काम करावयाचे ते सर्व आपले आपणच ठरवू या. आमचे कार्यक्रम आखून द्यावयास आता परकी नकोत, आम्ही कसे वागावयाचे ते, ते सांगावयास नकोत. आमचे आम्हाला आता सारे कळते, समजते. आमचे नकाशे आम्ही तयार करू, आमचे आराखडे आम्हीच रेखाटू. दुसर्यांनी घालून दिलेली धोरणे व दुसर्यांचे हुकूम मानणारे जी हुजूर अत:पर आम्ही होणार नाही. आम्ही आमची धोरणे निर्माण करू, आमची ध्येय निश्चित करू, आमची कार्यपध्दती आम्ही मुक्रर करू.
प्राचीन ज्ञान नवीन स्वरूपात, नवीन भाषेत मांडावयाचे, त्या ज्ञानाला नवीन रंगांनी रंगवायचे, नवीन वस्त्राने नटवायचे, नव्या दृष्टीने जुन्या विचारांची व ध्येयाची मांडणी करावयाची. रत्न जुनेच, त्याला कोंदण नवीन करू या, रस तोच, पात्र नवीन बनवू या. जुनी शक्ती नवीन अंगात ओतावयाची. केवळ नवीन भाड्यांना किंमत नाही. तो पूर्वीचा सुधारस त्यात पाहिजे. आत्मा तोच. राष्ट्राचा आत्मा का कधी बदलतो? आत्मा बदलू पाहाल तर फझीत व्हाल. आत्म्याला वस्त्रे द्या, नूतन देह द्या. या रीतीने सर्व संसारपाहू या. कोणतेही काम असो; आध्यात्मिक असो वा आधिबौतिक असो; आम्ही सर्व कर्मात हात घालणार व विजयी होणार.
अफाट कार्यक्षेत्र पडले आहे. ध्येयाचा तुटवडा नाही? कामाची वाण नाही. वाण काम करणार्यांची आहे; तूट सेवा करणार्यांची, जीवने एकेका गोष्टीत अर्पण करणार्यांची आहे. सोन्याचांदीच्या खाणी, हिर्यामाणकांच्या खाणी तुमची वाट पाहात आहेत. जीवनाची नवीन कल्पना, धर्माची, कर्तव्याची, मोक्षाची नवीन कल्पना; संघटनेची, सहकार्याची नवीन कल्पना; बंधुप्रेम, राष्ट्रप्रेम; ते कृतीत आणण्याची नवीन कल्पना सर्व नवरंग घेऊन जायचे आहे. या सर्व गोष्टीत तेज निर्माण करावयाचे आहे. चैतन्य खेळावयाचे आहे. ह्या सर्व क्षेत्रांत पेटलेले नुसते आगीचे लोळ होऊन घुसा. 'ज्वलनिव ब्रह्यमयेन तेजसा' असे धगधगीत आगीचे व स्फूर्तीचे पुतळे बनून प्रत्येक कार्यक्षेत्रात क्रांती घडवून आणा.