समाजधर्म 34
जगापासून दूर राहणे अत:पर योग्य होणार नाही, जग दाराशी आले आहे व 'दाखवा तुमच्याजवळ काय आहे ते' असे म्हणत आहे. आपण बराच काळ जगापासून दूर राहिलो. आता जगच भेटावयास आले आहे. आत मागे सरून चालणार नाही. आपण सारे भूतकाळ आता जगाच्या मालकीचा केला पाहिजे. आपणावर ही मोठी जबाबदारी आहे. जग ही वस्तू तुमच्याजवळ मागत आहे. या जबाबदारीस ओळखणे म्हणजेच राष्ट्रीय ध्येयाचा साक्षात्कार, म्हणजेच भारतीची ध्येये मूर्तिमंत करणे आपल्या ध्येयाच्या साक्षात्काराच्या पाठीमागे जगाचा विचार सदैव असू दे. जगाच्या पार्श्वभूमीवर आपण आपली ध्येयचित्रे काढू. आपल्या ध्येयांचा प्रत्येक गोष्टीत साक्षात्कार घेत चला. प्रत्येक वस्तूत आपले स्वत:चे हृदय, आपली स्वत:ची कला ओता. जगाला आपणास जास्त देता यावे म्हणून ज्या आपल्या जुन्या चालीरीती आड येत असतील आपणास अडथळा व विरोध करीत असतील. या देण्याच्या कामात प्रतिबंध करीत असतील त्यांना मोडून तोडून खुशाल फेकून देऊ या. भारताची ध्येये जगाला देण्यासाठी चला जगात तुमचाही वास पसरावा, सुगंध दरवळावा, निरनिराळ्या राष्ट्रवृक्षांच्या वासाज तुमच्याही पुरातन व पूज्य तरुवरांच्या फुलाचा वास मिसळून जाऊ दे. जुन्या रुढी स्वार्थासाठी, क्षुद्र लोमासाठी नोकर्याचाकर्या मिळाव्या म्हणून नाही. सोडावयाच्या, तर आपल्या पूर्वजांच्याच थोर ध्येयांना मूर्तिमंत करण्याच्या कामी त्या आड येतात म्हणून सोडावयाच्या, कारण केवळ स्वच्छंदी व बेलगामी बनण्यासाठी म्हणून किंवा परकीयांची अनुकरणे करून नोकरी मिळावी म्हणून जर आपण जुनी बंधने तोडून फेकणार असू तर आपले थोर भाऊ व थोर बहिणी आपणास जवळ उभे करणार नाहीत; आपला तिरस्कार करून आपले मुखावलोकनही करणार नाहीत हे ध्यानात धरले पाहिजे.
आपण विचाराने व आचाराने जगद्राष्ट्राचे होणे ही वस्तू मनुष्यांना साधणे अशक्य आहे. आपल्या राष्ट्राला सत्य राहूनच, आपल्या राष्ट्राचीच खरी सेवा व खरी पूजा केल्याने आपणास जगताची सेवा करता येईल. या जगन्मंदिराची आपले राष्ट्र ही एक लाहनशी खोली आहे. या खोलीतील भिंतीवर आपण सुंदर चित्रे काढून ठेवू या व अप्रत्यक्षपणे जगन्मंदिर शोभवू या. जगाच्या विशाल बागेतील आपले राष्ट्र हा एक लहानसा तुकडा आहे. या तुकड्यात आपण सुंदर फुलझाडे लावू या व असे केल्यानेच जगदुद्यान सजविण्यात भाग घेऊ या. संस्कृती म्हणजे भाराभर माहिती असणे नव्हे, संस्कृती म्हणजे सर्वांमध्ये लुडबुड करणे नव्हे. संस्कृती म्हणजे सहानुभूती आपण स्वत: वाढत राहून दुसर्यांकडून सहानुभूती ठेवणे, त्याचा हेवादेवा, द्वेष; मत्सर न करणे, त्यांचे अशुभ व अकल्याण न चिंतने, त्यांच्याबल शुभेच्छा बाळगणे व त्यांना जर आपले सांभाळून मदत देता आली तर देणे हयाला संस्कृती म्हणतात. मलाही जिवंत राहिले पाहिजे व दुसर्यानेही जिवंत राहिले पाहिजे. जगाच्या बागेत माझेच एकटयाचे झाड असेल तर काय मौज?आपण वैचित्र्याने शोभतो, परस्परास शोभा देतो. बगीच्यात गुलाब, शेवंती, मोगरा, चमेली, जाईजूई झेंडू; सार्यामुळे शोभा आहे. या जगात मी एकटाच आहे असे जर मला दिसेल तर मलाही मरुन जावे असेच शेवटी वाटेल. कारण माझी वाट कोण पाहिल? माझ्या फुलांचे रंग कोण बघेल? आपण सारी राष्ट्रे वाढू या. एकमेकांच्या विकासांचा विशिष्ठ रंगरुपांचा गौरव करू या.
आपल्या अनुभवांचे क्षेत्र वाढून नुसते भागत नाही. ते अनुभव पचवून, त्यांची व्यवस्था लावून, त्यातून जेव्हा सुंदर संगीत आपण निर्माण करतो तेव्हाच त्या अनुभवांना व्यक्तीचे शील व चारित्र्य हे नाव मिळते पचविलेल्या अनुभवांचे फळ म्हणजे आपले चारित्र्य होय. त्या त्या व्यक्तीचे चारित्र्य हे त्याच्या चालचालणुकीत, त्याच्या सर्व व्यवहारात प्रगट होत असते, प्रतिबिंबीत झालेले असते. हे जसे व्यक्तीचे तसेच राष्ट्राचेही असते. राष्ट्र जगाच्या बाजारात नानाविध अनुभव मिळवून ते पचवून आपलेसे करून घेते व त्यातुन सुंदर संस्कृती जन्माला येते. आजूबाजूच्या सृष्टीतून मिळालेल्या अनुभवातूनच विचार, संस्कृती ध्येये ही जन्माला येत असतात माणसाच्या आशा व स्वप्ने याची निर्मात्री झरी म्हणजे त्याच्या सभोवतालची त्याच्या सान्निध्यात आलेली सृष्टीच होय जेथे दारिद्री लोक सभोवती आहेत तेथे दरिद्रसेवा हेच ध्येय ठरते. तेथे दरिद्री मनुष्य हाच आपला सेव्य नारायण होतो. जेथे रोग आहे तेथे रोग दूर करणे, अज्ञान आहे तेथे अज्ञान दूर करणे हे स्वधर्म प्राप्त होतात, मनुष्याची ध्येय त्याची परिस्थिती देत असते, ठरवीत असते. केवळ सभोवतालची मानवी सृष्टीच नव्हे तर अमानवी सृष्टीही आपली ध्येये निर्माण करण्यान भाग घेत असते. डोंगरपर्वत, सागर, सरित, दरीखोरी अफाट मैदाने, सुपीक भूमी, निरभ्र आकाश, प्रसन्न तारे या सर्वांची आपली ध्येये, आपले विचार निर्माण होण्यास मदत होत असते. या सर्व वस्तूचे परिणाम अहर्निश आपणावर कळत नकळत होत असतात. म्हणून त्या त्या राष्ट्रांची ध्येये भिन्न होतात. भिन्न भिन्न हवामानात ती निर्माण होत असतात. भारताची ध्येय काय होती हे पाहिले पाहिजे व ती आपण वाढविली पाहिजेत. आपल्या पूर्वजांच्या आशा; आकांक्षा काय होत्या, स्वप्ने, मनोरथ, ध्येय काय होती हे समजून घेणे होय. म्हणून भूगोलइतकाच इतिहास ही महत्त्वाचा आहे. अर्वाचीन जगाची नीट जाणीव होण्यासाठी, त्याचे स्वरूप समजण्यासाठी, ते कशावर उभे आहे, कोठे उभे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. जगाचा भूगोल आपण अभ्यासितो, जगाच्या धडपडीही अभ्यासिल्या पाहिजेत; कारण या धडपडीतून जगातील निरनिराळ्या काळातील ध्येय समजून येतील व त्या ज्ञानाचा स्वत:च्या विशिष्ट ध्येयाच्या विकासासाठीही अपार उपयोग आहे जे सत्ये; उघडे सामर्थ्यवान सत्ये; आपण शोधीत आहोत. त्याच्यासाठी स्वत:चे ज्ञान व दुसर्याचेही ज्ञान; दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजेत आणि ते ज्ञान भौगोलिक व ऐतिहासिक दोन्ही दृष्टींनी मिळविले पाहिजे.