समाजधर्म 1
१. समाज
सामुदायिक प्रार्थना
ख्रिस्ती लोकांच्या चर्चमध्ये त्यांच्या प्रार्थनेच्या वेळी जावे म्हणजे युरोपियन लोकांची संघटनशक्ती, त्यांचे सहकार्यचातुर्य, त्यांचा व्यवस्थितपणा, त्यांची टापटीप या सर्व गुणांचा आपल्या मनावर खोल ठसा उमटल्याशिवाय रहाणार नाही. ख्रिस्ती धर्मातील धर्मविचार, हिंदुधर्मातील अत्यंत संपन्न व परमोच्च विचारांसमोर पोरकट दिसतील, अर्धवट दिसतील, खालच्या पायरीचे दिसतील, परंतु त्यांच्या प्रार्थनेतील गंभीरता, सुंदरता, उठावदारपणा या गोष्टी आपल्याकडे दिसणार नाहीत, या बाबतीत आपण त्यांच्याशी तुलनेस उभे राहू शकणार नाही.
सामुदायिक प्रार्थना हा युरोपने लावलेला फारच मोठा शोध आहे यात शंका नाही. ज्याने ही प्रथा पाडली त्याची बुध्दी फारच विशाल असली पाहिजे, जीवनाचा ठाव घेणारी असली पाहिजे. युरोपियन बुद्धीची हृदयाची येथे पार मोठी उंच उडी आहे यात शंका नाही. सामुदायिक प्रार्थना प्रथम ज्यू लोकात बीजरूपाने होती, मुसलमानांनी त्या कल्पनेचा जास्त फैलाव केला. धर्मयुद्धाच्याकाळात; क्रूसेड्स्च्या काळात; सारे युरोप इस्लामी संस्कृतीतील विचारांनी भारून गेले होते. मुसलमानी विचार युरोपमध्ये सर्वत्र पसरले, जिकडे तिकडे रुजले. युरोपियन विचारात इस्लामी विचार मिळून गेले, एकरुप होऊन गेले, पुढे १४५३ मध्ये तुर्की लोकांनी कॉन्स्टँटिनोपल घेतले व नवयुगाला सुरुवात झाली. नवयुगाला सुरुवात होताना कोणकोणत्या गोष्टींना, कोणकोणत्या विचारांना, कोणकोणत्या भावनांना महत्व दिले गेलेहे कोण आणि आज काय सांगणार? राष्ट्रांच्या किंवा व्यक्तीच्या जीवनात कोणत्या कोणत्या गोष्टींचा ठसा खोल उमटतो कोणते विचारबीज पेरले जाते, कोणते विचार जोराने फोफावतात, हे कोण सांगू शकेल? तुर्की लोकांनी कॉन्स्टँटिनोपल घेतले व तेथून जे ख्रिस्ती लोक युरोपमध्ये गेले, त्यांनी ही तुर्कांची सामुदायिक प्रार्थना, इस्लामीयांची सामुदायिक प्रार्थना तिकडे सर्वत्र रुढ केली नसेल ना?
काहीही असो, ख्रिस्ती धर्म हा आरंभी आशियातील विचार असला, पौर्वात्य विचार असला, तरी त्याचे अंतिम पर्यावसान आजच्या युरोपियन प्रॉटेस्टंट पंथात झाले आहे खरे. सामुदायिक प्रार्थनेचा विचार ज्यू व इस्लामी संस्कृतीत उत्पन्न झाली व त्याचे परिणत रूप आज इंग्लडमधील प्रॉटेस्टंट पंथात दिसून येते. कोणते बीज कोठे उडून जाईल व वाढेल याचा नियम नसतो. पूजाकर्मातील सामुदायिक प्रार्थनेचे अंग हे अत्यंत महत्वाचे आहे यात शंका नाही.