समाजधर्म 17
७ गुरू व शिष्य
मनुष्याचा सर्वगामी जो विचार त्या विचाराच्या नियमाची गुरूकिल्लीच हिंदुधर्मातील तत्तवज्ञानाने दिली आहे. ज्या वेळेस हिंदुधर्मातील तत्त्वाची निर्मळपणे व नि:पक्षपातीपणे नीट मांडणी केली जाईल त्या वेळेस वरील गोष्ट नमूद केली जाईल. हिंदूंची तत्वज्ञानपध्दती असे सांगते की, प्रत्येक वस्तूच्या दर्शनाने, प्रत्येक विचाराच्या स्फुरणाने, आपण उत्तारोत्तर अधिक मोठया विचारवर्तुळात शिरत असतो. जगातील आजच्या सर्व प्रकारच्या अभ्यासात व शिक्षणात हीच दृष्टी मान्य केली गेली आहे, ही विचारपध्दती स्वीकारली गेली आहे, असे दिसून येईल. बुध्दधर्म हे हिंदुधर्माचेच बाळ आहे ही गोष्ट धर्मपदाच्या प्रारंभीच्या शब्दांवरून दिसून येते. सनातनधर्माच्या महासागरावरीच एक लाट म्हणजे बुध्दधर्म. ही गोष्ट धर्मपदातील प्रारंभीच्या शब्दांनी जितकी स्वच्छपणे व स्पष्टपणे लक्षात येते तितकी दुसर्या वचनांनी व शब्दांनी येणार नाही. ''आजची आपली अंतर्बाहय स्थिती हे पूर्वीच्या चिंतनाचे व मननाचे फळ आहे. आजचे जीवन आपल्या पूर्वीच्या विचारात प्रकट झालेले आहे, पूर्वीच्या विचारावर उभारलेले आहे.''
धर्मपदाच्या आरंभीचे हे शब्द होत. हया शब्दांतील सत्यावर धर्माची उभारणी करणारा बुध्द हा हिंदूच असला पाहिजे. सनातन धर्मीयांनाच वरील सिध्दांत सुचेल, अन्याधर्मीयाला कदापि सुचणार नाही.
हिंदुस्थानात ज्या शेकडो विचारांना धर्मतत्वाचे स्वरूप मिळाले आहे, धर्मतत्वे अशी मान्यता लाभली आहे, त्या सर्वात गुरुभक्ती हे तत्व, गुरुभक्तीची कल्पना हा विचार फार रमणीय आहे आणि तितकाच कुतूहलजनकही आहे. हा विचार परक्याला समजण्यास कठीण जातो. गुरुभक्ती म्हणजे किती तरी गूढ कल्पना असे परकियास वाटते. एखादा विचार आपणास मिळावा, काही विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचा वा अनुभूतीचा स्पर्श आपणास व्हावा, म्हणून ज्याच्या जवळ तो विचार किंवा ते ज्ञान किंवा ती अनुभूती असेल, त्याच्या चरणांजवळ आपले मन रिकामे करून भक्तिपूर्वक मुकेपणाने बसणे, त्या पुरुषाची अखंड प्रेमाने सेवा करणे, हा जो मार्ग त्या मार्गातील रहस्य कळून त्याच्यावर श्रध्दा बसण्यास त्या मार्गाचा अनुभवच घेतला पाहिजे. गुरुभक्तीचा हा जो मार्ग तो केवळ आध्यात्मिक शिक्षणाच्या बाबतीत आहे असे नाही, तर इतर ज्ञानाच्या बाबतीतही असू शकेल. सटरफटर शेकडो गोष्टी वरपांगी धार्मिक स्वरूपाच्या सांगण्याच्या क्रियेत मात्र ती असणे शक्य नाही.
सत्याला ग्रहण करावयास चित्त सदा तत्पर असले पाहिजे. रिकाम्या भांडयातच ओतता येते. विहिरीमध्ये अपार पाणी आहे, परंतु पोहरा जर वाकणार नाही तर त्याच्यात पाणी शिरणार नाही. नम्रपणा हा ज्ञानाचा आरंभ आहे. ज्याच्याजवळून आपण काही शिकलो त्याला आपण पूज्य मानिले पाहिजे. ज्याच्याबद्दल आपणास आदर वाटत नाही त्याच्यापासून आपण काय शिकणार? काय घेणार? त्याच्या शब्दाकडे आपण लक्षही देणार नाही; त्याच्या उपदेशाची व शिकवणुकीची आपण टर करू, जेथे आदर नाही तेथून ज्ञान आपणास घेता येणार नाही. वयाने मोठे, अधिकाराने मोठे, संबंधाने मोठे-अशा सर्वांना आपण उत्थान देतो, आदर दाखवितो. परंतु चारित्र्य व पावित्र्य, ज्ञान व विद्या यांच्यामुळे जो मोठा त्याच्यासमोर तर निरहंकारपणे लोटांगणच घालावे असे वाटते, त्याची धूळ आपल्या मस्तकी धारण करावी असे वाटते, त्याच्या पायाची धूळ आपण बनावे असे मनात उत्कटत्वाने येते. आपणास शिकविणारे अनेक शिक्षक आहेत. जगातील सजीव निर्जीव प्रत्येक वस्तू आपणास शिकवीतच आहे. हे सारे चराचर म्हणजेच गुरूच आहे. परंतु त्या लक्षावधी गुरूमध्ये एक सद्गुरू असतो-ज्याचे केवळ अस्तित्व, ज्याचे केवळ दर्शनच अनंत गोष्टी शिकवीत असते, 'जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे' असा तो असतो त्याचे सारे जीवन मुकाटयाने आपणास काहीतरी देतच असते. 'गुरोस्तु मौनं व्याख्यांन शिष्यस्तु छिन्नसंशय:!’अशी ती स्थिती असते. अशा गुरूचे केवळ अस्तित्व म्हणजेच महाशिकवण होय. असा जो असेल, ज्याच्याजवळ गेल्याने हा अनुभव येईल तोच खरा गुरू. आपण आपल्या अनुभवाने शेवटी कोठे जावयाचे हे तोच दाखवून देतो. कोठलेही ज्ञान असो. अगदी साध्या क्षुद्र वस्तूचे का ते असेना ते ज्याच्यापासून आपणास मिळाले. ते जे कायमचे आता आपले झाले, तो जो ज्ञानदाता, त्याचे स्मरण आपण सदैव केले पाहिजे. तो ज्ञानाचा उगम विसरणे म्हणजे कृतघ्नतेसारखे ओंगळ व वाईट या जगात दुसरे काय आहे?