समाजधर्म 14
६ स्वातंत्र्य
ज्याची बुध्दी मेलेली नसून स्वतंत्र आहे असा मनुष्य 'स्वातंत्र्य म्हणजे काय' हा प्रश्न पुन:पुन्हा स्वत:ला विचारल्याशिवाय राहणार नाही. आपण बहुतेक सारे जण स्वातंत्र्यासाठी जन्मलेले आहोत. आपण सगळेच कशासाठी तरी धडपडत असतो. तडफडत असतो. जेथे धडपड करावायास लावणारे असे ज्या जीवनात काहीच नाही ते जीवनच नव्हे. ते बिनधडपडीचे जीवन, ती स्थिती अत्यंत भयाण व भेसूर वाटेल, धडपड हे भाग्य आहे. जीवनाचे सौंदर्य आहे. धडपडीने जीवनाला तेज असते. जीवनाला अर्थ असतो. धडपड जीवनाचे सारसर्वस्व आहे. जेथे कशाचीही आकांक्षा नाही, जेथे काहीतरी मिळवावे व ते मिळविण्यासाठी मरावे असे वाटत नाही ते जीवन कसले? ते जीवन असहय होय; त्यापेक्षा मरण पत्करले. ज्याची बुध्दी स्वतंत्र आहे. तो धडपड करीलच करील. त्याच्याने तेथे शांत बसवणार नाही. त्याचे आतील कुरुक्षेत्र तरी निदान त्याच्याजवळ असतेच. ते कोणती सत्ता हिरावून घेणार? फक्त हातापायांची, मनगटाची हालचाल म्हणजे धडपड? समाजातील स्पर्धाक्षेत्रातच धडपडीस वाव असतो अशी ज्याच्या मनात धडपडीची कल्पना असते. धडपडीचा एवढाच बाहय व स्थूल अर्थ जो पाहतो, त्याच्या धडपडीला तुरुगांत वाव नाही, तेथे ती खलास झाली. संपली, ही गोष्ट खरी; परंतु स्वतंत्र बुद्धीच्या माणसाची धडपड तेथेही संपणार नाही. तो मनात अनेक प्रश्न उत्पन्न करील व धडपड करीतच राहील. धडपडीची संकुचित व्याख्या करणारा, बुध्दिची धडपड ज्याला माहित नाही, अशाच्या जीवनाला तुरुंगामध्ये अर्थ रहात नाही, त्याची सारी धडपड संपते, तसाच दुसराही एक मनुष्य आहे. संपत्तीच्या पिंजर्यात लहानपणापासून वाढलेली परंतु संपत्तीतील सुखाविलास वरबटावे असे मनास न वाटणारी, त्या पिंजर्यातून पळताही येत नसलेली व तेथे राहूनच आत्मविकासाचा मार्ग शोधून काढण्यासाठी बुध्दी असलेली अशी जी एखादी व्यक्ति-तिचीही धडपड संपली असे समजता येईल अशा तर्हेने ज्याच्या ज्याच्या जीवनात धडपड उरत नाही ते जिवंत असून मेलेलेच असतात, किंकर्तव्यशून्य असे दगड ते बनतात. आपला आनंद, आपला उत्साह, आपली बुध्दी हयांना धडपडीने तेज चढते. जेथे धडपड नाही तेथे नुसता कसा तरी एक शेणाचा गोळा पडलेला आहे असेच दिसेल. धडपडीतच
खरी वाट आहे, प्रगत आहे व स्वतंत्रता आहे.
अमुक व्यक्ती क्षूद्र आहे की महान आहे, राष्ट्र क्षूद्र आहे की महान आहे, हे स्वतंत्र होण्यासाठी तेथे धडपड चालली आहे की नाही यावरून सांगता येईल स्वतंत्रता म्हणजे काय हे बुध्दीने वर्णन करून जरी सांगता येत नसले तरी ती आपण अनुभवू शकतो व तिच्यासाठी धडपडतही असतो. आपण सारेच कोणत्या ना कोणत्यातरी बाबतीत स्वतंत्र होऊ पाहत असतो. हळूहळू थोडयाफार प्रामाणात निर्दोष, अव्यंग व स्वयंपूर्ण असे स्वातंत्र्य आपण उभारीत असतो. कोणी हक्कांच्या नावाखाली स्वातंत्र्यासाठी झगडतात. ईश्वर आणि माझा हक्क हे अशा लोकांचे ध्येय असते. परंतु हिंदुधर्म फार खोल जाणारा आहे, सूक्ष्म बघणारा आहे. हिंदुधर्म सांगतो की, मनुष्याला वस्तू प्रिय नसून मुक्ती प्रिय आहे. अमुक एका बाबतीतील अमुक एका वस्तूबद्दलचे स्वातंत्र्य नव्हे तर केवळ स्वातंत्र्य वस्तुनिरपेक्ष स्वातंत्र्य, हे हिंदुधर्माचे ध्येय आहे हे ध्येय वस्तुप्राप्तीच्या पैलाडचे आहे. आत्मविकासाचे प्रधान साधन म्हणजे अशा प्रकारची मुक्ती असे हिंदुधर्म मानतो. जो स्थिर मती झाला, ज्याला प्राप्तव्य व गंतव्य राहिले नाही, तोच खरा मुक्त व स्वतंत्र्य असे हिंदुधर्म सांगत आहे. जो आत्मरूप झाला. आत्मरत झाला, तोच मुक्त, तोच सर्व बंधनातून सुटला इतर गती खुंटून त्यालाच खरोखर परमगती मिळाली.