समाजधर्म 2
सामुदायिक प्रार्थना हिंदुधर्मात असलीच तरी ती अविकसित रूपात आहे. उपाध्याय व यजमान या पलीकडे सामुदायिक प्रार्थनेचा विकास झाला नाही. हिंदुधर्मातील प्रार्थनेची कल्पना इतकी तीव्र, भावनोत्कट व प्राणमय असते. ही कल्पना इतकी आंतरिक व जिव्हाळयाची असते की, ती सामुदायिक करणे, चव्हाटयावर मांडणे, लोकांना कसेसेच वाटते हिंदुमताचा या विचाराने गोंधळ होतो. हिंदुधर्मात व्यक्ती पूजा करते, व्यक्ती प्रार्थना करते. परंतु पूर्वी कोणीतरी रचिलेली प्रार्थना व्यक्तीकडून म्हणण्यात येते. प्रार्थना रचणार्यांची भूमिका तीच प्रार्थना म्हणणार्याची असते असे नाही. ठरावीक मंत्र, ठरावीक स्तोत्र व प्रार्थना व्यक्ती म्हणते. परंतु ती स्तोत्रे व त्या प्रार्थना न मानणारे जे युरोपियन लोक त्यांना नॉन्कॉन्फर्मिस्ट म्हणतात. परंपरेने चालत आलेल्या ठरावीक व निश्चित प्रार्थना म्हणणे ते नाकारतात. स्वत:स योग्य वाटेल त्या शब्दांनी ते देवाला आळवतात. ज्या दिवशी जी प्रार्थना रुचेल म्हणतात. परंतु आपल्याकडे तसे नाही. कोणी रुद्र म्हणेल, कोणी सौर म्हणेल, कोणी ठरावीक हरीपाठाचे अभंग म्हणतील, कोणी रामरक्षा, ठराविक करुणाष्टके म्हणतील. त्या प्रार्थनेशी आपण एकरूप होत नाही, होऊ शकत नाही. प्रार्थना व पूजा यांत्रिक झाल्या आहेत.
ख्रिस्ती धर्मात ऋषी फार नाहीत व संतही फार थोडे. अनेक शतकांनी एखादा साधू फ्रान्सिस जन्माला येतो; एखादी जोन ऑफ आर्क आढळते, आणि हे संतसुध्दा ज्या पंथात मूर्ती, भजन, जप, तप, साधना वगैरे गोष्टी राहिल्या आहेत, त्या पंथातच बहुधा जन्माला आलेले आहेत. परंतु युरोपची शक्ती, ख्रिश्चन धर्माची शक्ती, ज्या काही अपवादात्मक विभूती निर्माण होतात त्यावर अवलंबून नाही. बहुजनसमाजाच्या विकासात युरोपची शक्ती आहे. त्यात युरोपचे सामर्थ्य आहे फार अत्युच्च मोठेपणात, परमथोर विभूतिमत्वात युरोप मागे पडेल, परंतु व्यावहारिक धर्मात, युरोप श्रेष्ठ आहे. थोडयाशाच परंतु निश्चित कल्पना न दबण्याची वृत्ती, रोजच्या व्यवहारातील मोक्ष व स्वातंत्र्य या गोष्टी तिकडील बहुजनसमाजात आढळून येतील. ज्या वेळेस सर्व समुदायाला बरोबर घेऊन जायचे असते, त्या वेळेस पुष्कळशी छाटाछूट करूनच पुढे जावे लागते. सर्वसाधारण जनतेला परमोच्च ध्येय मानवत नाही, झेपणार नाही. यासाठी ख्रिश्चन धर्माने मोठमोठयांची डोकी उडविले आहेत. फार उंच जाणारे आम्हाला नकोत असे ख्रिश्चन धर्म सांगत असतो. सर्वांची डोकी सारखीच उंच होऊ द्या असे तो म्हणतो पाय एकाच भूमीवर व डोकी एकाच पातळीत. कोणीही फार खुजा दिसू नये, बुटकेपणा दिसू नये, म्हणून फार उंच, लोकांना ख्रिश्चन धर्माने दूर केले आहे. ख्रिश्चन धर्माला एखादा हिमालय व बाकीची सारी ढेकळे, असे नको आहे. त्यांना सार्या टेकडया पाहिजे. त्यांची प्रार्थना ही सामान्य लोकांसाठी आहे. म्हणून त्यांनी ती सुंदर केली, साधी केली, त्याला त्यांनी संगीताची जोड देऊन प्रार्थनेत आकर्षकता आणली. ज्ञानापेक्षा सेवेला ख्रिश्चन धर्म थोर मानतो, भक्तीपेक्षा सार्वजनिक उपयुक्ततेला महत्व देतो. तिच्यावर भर देतो. ख्रिश्चन धर्माने आपले ध्येय बेताचे उंच केले आहे व त्या ध्येयाप्रत सर्वांनी जावे, स्वाभिमानी सुसंघटीत, तेजस्वी व बळकट होऊन जावे, अशी व्यवस्था केली आहे.
धार्मिक विचारांच्या बाबतींत युरोपमधील एखादा मोठा पंडितही हिन्दुस्थानातील एखाद्या शेतकर्यापुढे पोरकट ठरेल, उलट युरोपमधील झाडूवाल्यासही सार्वजनिक कर्तव्याची व हक्कांची जी जाणीव असते, ती आमच्याकडील मोठमोठया पुढार्यास व मुत्सद्यासही नसते.
आज ध्येयाची देवाण; घेवाण करण्याची वेळ आली आहे. मानवजातीस आपल्या मुलांना तेच तेच धडे शिकवावयास हरकत नाही. मानवजातीची अशी अपेक्षा आहे की, पृथ्वीच्या एका भागात जो धडा तिने शिकवला तो जगातील इतर लोकांनी घ्यावा व आपलासा करावा. पौर्वात्य विचार पाश्चिमात्य जगाला लौकरच जिंकून घेणार यात शंका नाही; आणि पौर्वात्यांच्या विकासाला पाश्चिमात्य ध्येय व पध्दती येथे येऊन हातभार लावतील ही गोष्टसुध्दा तितकीच खरी आहे. एकमेकांस पूर्ण व्हावयास मदत करावयाची आहे. एकमेकांचे विशिष्टत्व नाहीसे करावयाचे नाही, एकमेकास दूर करावयाचे नाही. पूर्व पश्चिमेस हात देईल व पश्चिम पूर्वेच्या मदतीस येईल. ईश्वराच्या या विश्वमंन्दिरात पूर्व व पश्चिम एकमेकींचे हात धरून प्रेमाने फुगडी घालतील.