मृत्यूवर विजय 1
कोणी कोणी परमेश्वराने मदत करावी, आपले दु:ख व दैन्य त्याने हरण करावे म्हणून पूजा करतात. त्या सर्व सामर्थ्यवान् प्रभूची आपणास धीर मिळावा म्हणून प्रार्थना करतात. आणि अशा आर्त भक्तांना धैर्य प्राप्त होते यात शंकाच नाही. कारण शत्रू कोणीही असो, परमेश्वर आपल्या बाजूस आहे, अशी अशा आर्त भक्तांची साहजिकच भावना असते. परंतु अशा आर्तभक्तीत दोष येतोच आर्तभक्तीत देवाला आपण राबवितो, त्याला आपले काम करावयास लावतो, आपली जी पै किंमतीची क्षुद्र सुखे ती प्राप्त करून घेण्यासाठी देवाला आपण एक साधन बनवितो. देवाहून आपण आपल्या कामनांनाच श्रेष्ठ केले !
काही लोक दैववादी असतात. परंतु यातही धोका आहे, दोष आहे. कारण त्यामुळे दैवच सर्व काही करीत आहे. कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुं अशा दैवाच्या हातातील आपण केवळ बाहुली आहोत, असे आपण मानू लागलो. परंतु वस्तुस्थिती याच्या उलट असते. कार्य करणारे क्रियावान् आपण असतो व दैव हे निष्क्रिय व पंगू असते. आपणच दैवाचे नियंते असतो, दैव घडवीत असतो. दैववादी अरब शिपाई घोड्यावर स्वार होतो, भाला सरसावतो व ‘किस्मत’ अशी गर्जना करून शत्रूवर तुटून पडतो आणि क्षणभर तो अजिंक्य भासतो. परंतु शत्रुचा जोराचा हल्ला येऊन त्याला माघार घ्यावी लागताच तो कपाळाला हात लावून बसतो व ‘किस्मत दुसरे काय ?’ असे म्हणतो. तो अरब शिपाई लढाईस तेथे पुन्हा उभा राहू शकत नाही.
या दोन प्रकारांपेक्षा तिसराही एक प्रकार आहे. तो म्हणजे ईश्वराला आई म्हणून पुजून त्यापासून मिळणार्या धैर्याचा. ही जी दिव्य मातृपूजा आहे, तेथे मरणाला मिठी मारावयाची आहे. तेथे दु:खाचा खाऊ आहे. अलोट धैर्य हाच आनंद आहे. आईचा हात मृदूच असेल असे नाही, तर तो कठोरही असेल. तो अमृताप्रमाणे गोडच असेल असे नाही, तर विषासारखा कडूही असेल. आई तारीलही किंवा मारीलही. परंतु आईने मुलाला कितीही झोडपले, मारले, पिटले, तरी मूल तिच्या पदराला धरणार, तिच्याच ओच्यात डोके खुपसणार. आई जे जे देईल ते ते सारे गोडच आहे, चांगले आहे, पूज्य आहे. दु:खातही आईची करुणाच आहे. आपत्ती हा तिनेच पाठविलेला आशीर्वाद, तिचाच तो पवित्र दूत. त्याचे स्वागत केले पाहिजे. आई मुलाचे वाटेल ते करील, त्याला रडवील किंवा हसवील; चढवील किंवा पाडील. परंतु भक्त विचारतो, ‘आई, तू नाहीस तरी कोठे ? ’सर्वत्र तूच आहेस. नाना रुपांनी तूच येतेस. मारावयास आलेली राक्षसीण तूच, तारावयास आलेली देवता तूच. कोणत्याही वेषात तू ये, तुला शोधून काढण्यास मी शिकतो आहे. तुझा लपंडाव मी चालू देणार नाही.’
“जेथे जातो तेथें । तूं माझा सांगाती
विठ्ठल सखा । विठ्ठल दु:खा ।।”
“सर्वस्वी तुझाच स्पर्श मी अनुभवून राहिलो आहे. पंख लावून मी आता समुद्रापलीकडे गेलो तरी तेथही तूच मला दिसतेस. मी स्वर्गात गेलो तरी तेथे तू व नरकात पडलो तरी तेथे तू.”