Get it on Google Play
Download on the App Store

हिंदुधर्माची श्रेष्ठता 3

आपण लौकरच नष्टप्राय होणार, आपली संस्कृती लौकरच मरणार, असे बरळत व आरडत, नदीतीरावर नकाश्रू ढाळीत, काही लोक बसलेले आढळतात. परंतु सत्य मरणार नसून, जे काही मरणार आहे ते त्यांच्या भ्रामक समजुती व वेडगळ रुढी ह्या मरणार आहेत, ही गोष्ट त्यांनी खूप लक्षात ठेवावी. कोणी उजाडत चहाचा घोट घेतात म्हणून का हिंदुधर्म मरणार आहे ? कोणी डोक्यावर केस ठेवले एवढ्याने का हिंदुधर्म मृत्यूपंथास लागला ? हिंदुधर्म असा लेचापेचा नाही. निरनिराळ्या जाती, निरनिराळे धंदे, भिन्न भिन्न आचार, आपल्या राहणींचे बाह्य स्वरूप, आपल्या संस्कृतीचे बाह्य आचार या सर्वांचा लोप झाला तरी हिंदुधर्म मरणार नाही; तो जशाचा तसा अभंग व निर्भय उभा असेल. हिंदुधर्मातील विचार इतक्या अल्पावधीतच ख्रिश्चन राष्ट्रांत पसरू लागले आहेत, यावरूनच हिंदुधर्माच्या भवितव्याबद्दल कल्पना करता येणार नाही का ? कोणतीही उच्च संस्कृती आणा; तिच्याशी हिंदुधर्माचा विरोध नाही. जाऊ दे; ते काहीही असो. हिंदुधर्म स्वत:च्या जन्मभूतीत तरी मरणार नाही, हे नि:संशय पटवून द्यावयासाठी पुन्हा वरच्या वाक्याप्रमाणे अप्रस्तुत व न शोभणारी अशी स्वत:ची महती गाणे भाग पडेल. ते ते धर्मपंथ लोपताच ती ती राष्ट्रे मेली नाहीत का ? धर्माच्या अस्ताबरोबर राष्ट्रांचाही अस्त होतो, हे आपल्याला माहीत नाही का ? बाबिलोनमधील प्राचीन असीरियातील संस्कृतीचा इतिहास ही दु:खद कहाणी, हेच कटू सत्य सांगत नाही का ? ती राष्ट्रे गेली, मेली, कायमची नष्ट झाली. ती पुन्हा जिवंत होण्याचा संभव नाही. असे का बरे झाले ? ह्याचे कारण स्वत:च्या पूर्वजाचा विचारठेवा त्यांनी झुगारून दिला हे होय. भारतवर्ष असला आततायीपणा, आत्मघातकीपणा करणार नाही. भारतवर्ष स्वत:चे न सोडता जगभर जाईल व आपल्याच भांडारातून जगभर गेलेले अर्धवट ज्ञान त्याला सर्वत्र दिसून येईल. जगातील पोरकट धर्मकल्पना, अविकसित व अर्धवट विचार हे आपल्याच परंपरेच्या वैभवातून दिले गेलेले आहेत हे भारताला आढळून येईल. हिंदुधर्म ही माऊली आहे व तिच्याच दुधावर इतर सारे धर्म पोसले आहेत. हिंदुधर्म जगात हिंडूफिरू लागेल, त्या वेळेच ही चुकलीमाकलेली स्वत:ची बाळे त्याला दिसून येतील. भारतमाता, हिंदुधर्ममाता पुनरपि जगद्गुरू होईल, जगाला शिकवील. आपल्याला विरोध करणार्‍या लोकांचे विचार किती उथळ व तुटपुंजे आहेत, हे दिसून येऊन स्वत:च्या ऋषींच्या थोर गंभीर विचारांची खोली व सूक्ष्मता भारताला कळून येईल. दिवसेंदिवस स्वत:च्या या विचारवैभवाचा भारताला अधिकाधिक अभिमान वाटू लागेल; भारताचा आत्मविश्वास बळावेल, आत्मश्रध्दा वाढेल.

ती वेळ येत आहे, अगदी जवळ आली आहे. या गोष्टीबद्दल आता साशंक राहणे म्हणजे भारतमातेचा, हिंदुधर्माचा उपमर्द करणे होय, द्रोह करणे होय. तसे करणे युक्त नाही, योग्य नाही. ते करणे चमत्कारिक, कसेसेच दिसेल. जर हिंदुधर्ममातेचे उज्ज्वल भवितव्य आपणास दिसत नसेल, तर तिच्या गतवैभवाचा इतिहास वाचण्याला आपण नालायक ठरू. जगातील धर्मच नव्हेत, तर युरोपमधील विद्यापीठेही आज या विसाव्या शतकात भारतीय ऋषींची, भारतीय विचारद्रष्टयांची पूजा करतील, त्यांना वंदन करतील. तपोवनातील तरुछायेखाली ज्यांनी बसावे, ज्यांच्या अंगावर केवळ वल्कले शोभावी, अशा त्या थोर ऋषींनी अशी गहन व गूढ सत्ये प्रकट केली, अशी सत्ये अनुभविली, इतकी विशाल व व्यापक सत्ये जगासमोर मांडली, नि:शंकपणे मांडिली की, ज्या सत्याची ऐहिक सुखविलासात दंग असलेल्या युरोपला स्वप्नांतही भेटगाठ झाली नाही.

राष्ट्रीय हिंदुधर्म

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
धर्म 1 धर्म 2 धर्म 3 हिंदुधर्माची श्रेष्ठता 1 हिंदुधर्माची श्रेष्ठता 2 हिंदुधर्माची श्रेष्ठता 3 हिंदुधर्म व संघटना 1 हिंदुधर्म व संघटना 2 हिंदुधर्म व संघटना 3 त्यागवृत्ती 1 त्यागवृत्ती 2 त्यागवृत्ती 3 त्यागवृत्ती 4 माणसांप्रमाणे वागा 1 माणसांप्रमाणे वागा 2 तळमळ 1 तळमळ 2 * सामर्थ्य 1 * सामर्थ्य 2 खरी महत्वकांक्षा 1 खरी महत्वकांक्षा 2 खरी महत्वकांक्षा 3 खरी महत्वकांक्षा 4 चारित्र्य 1 चारित्र्य 2 विवेक 1 विवेक 2 पात्रता 1 पात्रता 2 पात्रता 3 आत्म-प्रौढी 1 आत्म-प्रौढी 2 आत्म-प्रौढी 3 अनुभव 1 अनुभव 2 कर्मद्वारा साक्षात्कार 1 कर्मद्वारा साक्षात्कार 2 श्रध्देचे सामर्थ्य 1 श्रध्देचे सामर्थ्य 2 कमळ व भ्रमर 1 कमळ व भ्रमर 2 कमळ व भ्रमर 3 कमळ व भ्रमर 4 विचारांचा विकास 1 विचारांचा विकास 2 राष्ट्रीय धर्म 1 राष्ट्रीय धर्म 2 राष्ट्रीय धर्म 3 राष्ट्रीय धर्म 4 जबाबदारी 1 जबाबदारी 2 जबाबदारी 3 जबाबदारी 4 जबाबदारी 5 जबाबदारी 6 ध्येय 1 ध्येय 2 ध्येय 3 ध्येय 4 मृत्यूवर विजय 1 मृत्यूवर विजय 2 मृत्यूवर विजय 3 भूत व भविष्य 1 भूत व भविष्य 2 प्रपंच व परमार्थ 1 प्रपंच व परमार्थ 2 प्रपंच व परमार्थ 3