हिंदुधर्म व संघटना 1
हिंदुधर्माची वाढ अत्यंत सुंदर रीतीने व सुसंबध्दपणे झालेली आहे. हिंदुधर्मात ज्या उणिवा आहेत, त्या तो वाढता असल्यामुळे आलेल्या आहेत. हिंदुधर्म यंत्र नसून, वृक्षाप्रमाणे वाढता आहे. आजचे युग यंत्राचे आहे. यंत्रयुगात तंतोतंतपणा, काटेकोरपणा, हिशेबीपणा, व्यवस्थितपणा, चोखपणा या गोष्टी आवश्यक असतात. हे गुण नसतील तर यंत्रदेवता प्रसन्न होणार नाही. यंत्राच्या बाबतीत बिनचूकपणा पाहिजे. अशा या यंत्रयुगात जी वस्तू वाढत आहे, जिचा अजून विकास होत आहे, जिला अजून व्यवस्थितपणा पूर्णपणे प्राप्त झालेला नाही, अशा वस्तूच्या मार्गात अडचाणी उभ्या राहतात. हिंदुधर्मवृक्षाला आजपर्यंत जी फळे लागली ती अपूर्व आहेत, अमोल आहेत, परंतु ज्या गोष्टींचा लाभ व्यवस्थित कार्यपध्दतीने होतो, ज्या गोष्टी मिळविण्यासाठी हेतुपुर:सर प्रत्येक पाऊल टाकावे लागते, विचारपूर्वक प्रत्येक क्रिया करावी लागते, कार्यकारणभाव ओळखावा लागतो, योजना आखाव्या लागतात, अशा गोष्टी हिंदुधर्माच्या पध्दतीने आपणास मिळणार नाहीत. जगातील इतर धर्मांत न दिसणारा जो सत्याशी सहकार, तो हिंदुधर्मात आहे. सत्याजवळ हिंदुधर्माचा कसलाच वाद नाही. विचारवंत
मनाला अनंतात वाटेल तितकी खोल बुडी मारण्यास हिंदुधर्मात प्रत्यवाय नाही. वाटेल तो शोध लावण्यासाठी अंधारात असलेले जे वस्तूंचे स्वरूप ते प्रकट करण्यासाठी शास्त्रीय वृत्तीच्या माणसाने वाटेल तेथे उड्डाण घ्यावे; तत्त्वज्ञान्यांनी आपापले विचार खुशाल मांडावे, आपापली दर्शने दाखवावी; हिंदुधर्मात या गोष्टीला मुभा आहे. भोळेभाविक लोक मात्र या खोल पाण्यात न जाता, आत्मानात्मविचारात न शिरता आपल्या श्रध्देला चिकटून राहतात. हिंदुधर्मात ही स्वतंत्रता आहे, ही गोष्ट खरी. हिंदुधर्माला आज पुढील प्रश्न विचारण्यात येत आहे, “आपल्या मुलांबाळांस उच्च असे शास्त्रीय शिक्षण मिळावे म्हणून काय सोय करण्यात आलेली आहे ? शास्त्रीय ज्ञानात पुढे घुसण्यासाठी हिंदुधर्माने आपल्या मुलास प्रोत्साहन दिले आहे का? समाजसेवा करण्यासाठी हिंदुधर्माने आपल्या अनुयायांस स्फूर्ती दिली आहे का? संघटनेचे, सहकार्याचे महत्त्व हिंदुधर्माने ओळखले आहे का ?”
या गोष्टी संपादन करण्यास हिंदुधर्म मज्जाव करीत नाही. विवेकानंद म्हणत असत की, ‘हिंदुधर्माने आता जयिष्णू झाले पाहिजे.’ विवेकानंदांच्या म्हणण्याचा भावार्थ हा की, हिंदुधर्माने अत:पर एकांगी असून चालणार नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रात अनिरुध्दपणे संचार करावयाचा; एकाच गोष्टीला वाहून घेऊन चालणार नाही; सर्वांगीण विकास आता करून घेतला पाहिजे; दक्ष राहून उत्साहाने सारा संसार साजरा करावयाचा; सर्व कारभार पाहावयाचा; सामुदायिक विचार करावयाचा; सामुदायिक जीवन वाढवावयाचे; सहाकार्य करावयाचे. हिंदुधर्माने जियिष्णू व्हावयाचे, याचा अर्थ परदेशात स्वधर्मप्रचारक पाठवावयाचे एवढाच नाही; तर स्वत:ची सुधारणा करावयाची, स्वत:चे सामुदायिक जीवन उत्कृष्ट व बलिष्ठ करावयाचे. मत-प्रचार करून हिंदुधर्मात नवीन भरती करणे एवढाच जयिष्णू हिंदुधर्माचा अर्थ नाही; तर कार्यावर, कर्मशक्तीवर, व्यापावर भर देऊन आध्यात्मिकताही त्याचबरोबर वाढवावयाची. आज धर्माला, सामाजिक कार्य करण्याची जी हौस, तिची जोड दिली पाहिजे. समाजसेवा हे धर्माचे प्रधान अंग आज झाले पाहिजे. मी म्हणजे मी एकटाच नाही, तर मी म्हणजे माझा सर्व समाज, अशी प्रगल्भ व विशाल भावना आपल्या हृदयात बिंबवून घेतली पाहिजे. शिक्षणाच्या प्रांतात आज वर्गमहत्त्व राहिले नाही. तेथे सर्वांना मुक्तद्वार आहे. ज्याला ज्याला म्हणून बुध्दी आहे, त्याने बुध्दिमान व्हावे, विचारवान् व्हावे, बौध्दिक कार्य करावे. ज्याला ज्याला म्हणून शिकण्याची हौस आहे, त्याने शिकावे. ज्याप्रमाणे शिक्षणप्रांतात कोणास अडथळा नाही, मज्जाव नाही, त्याप्रमाणे प्रत्येक सामाजिक बाबतीत, प्रत्येक सार्वजनिक कार्यात झाले पाहिजे. समाजसेवा कोणीही करावी. ती ती सेवा करण्यास लायक व्हा व ती ती सेवा करा. विद्यालये, रुग्णालये, संशोधनसंस्था, अनाथसंगोपनगृहे, सूतिकागृहे, अनाथ वनिताश्रम-नाना संस्थांची जरूरी आहे व या संस्थांतून ज्याला जे काम येत असेल, ज्याला ज्या कामाची हौस व आवड असेल त्याने त्या कामाला वाहून घ्यावे.