ध्येय 1
आज आपले मन कार्योन्मुख होत आहे. ते दुसर्यांच्या हुकुमतीखाली आता राहणार नाही. मनाच्या या बदललेल्या वृत्तीमुळे आपल्या विचारपध्दती व कार्यपध्दती यांच्यातही बदल होईल. आता ध्येयाशिवाय आपणास काहीही दिसेनासे झाले आहे. ध्येयाला गाठण्यासाठी आपण अधीर झालो आहोत. साधनांचीच साध्ये झाली, साध्याची साधने झाली. वैभवाने धर्म मिळवावयाचा, धर्माचे वैभव मिळवावयाचे. किती किंमत द्यावी लागेल, खर्च किती होईल, जावे की न जावे, करावे की न करावे असे आता रडगाणे, हे लंबकाचे हेलकावणे राहिले नाही. काहीही होवो, आता पुढे जावयाचे हे निश्चित. क्षुद्र आशा फेकून देऊन नवीन ध्येयाकडे आपण जाणार; नवीन वस्तू शोधणार, नवीन निर्माण करणार. पुन्हा एकदा भारत महाभारत होऊ दे. भारत शूरांचा व वीरांचा होऊ दे. भीष्मद्रोणांचा, भीष्मार्जुनांचा, कर्णदुर्योधनांचा होऊ दे. मरण म्हणजे खेळ वाटू दे. भूतकाळापेक्षाही भविष्यकाळांत त्यागाला अधिक वाव आहे. शौर्य- धैर्य दाखवावयास भरपूर अवकाश आहे. आमचे पूर्वज मोठे होते, त्यापेक्षा आम्ही भावी पिढी अधिक मोठी करू. आमच्या मुलाबाळांना आमच्या आजोबा-पणजोबांपेक्षा अधिक वैभवशाली करू.
आमची दृष्टी निराळी झाल्यामुळे, मन कार्योन्मुख झाल्यामुळे शब्दांचे अर्थ आता निराळे दिसू लागले आहेत. दिव्य दृष्टीला दिव्य अर्थ, दुबळ्या दृष्टीला दुबळा अर्थ. कर्म याचा अत:पर दैव असा अर्थ नसून ‘कर्म म्हणजे काम करण्यास मिळालेली संधी’ असा अर्थ झाला आहे. मला समाजात अन्याय दिसतो का ? जाऊ दे मला धावून. अन्याय दूर करण्याचा माझा हक्क आहे, तो मला बजावू दे. कर्म करण्याची संधी मला मिळाली आहे. कोण मला मज्जाव करणार ? निर्भय व निष्कंप छातीवर वीराच्या सात्त्वि संतापाला पाहून सारी अवडंबरी माया थरथर कापते व निघून जाते. दैव माझे काय करणार ? माझ्यासमोर दैव दुबळे आहे, हात जोडून उभे आहे. देवावर मी स्वार होईन व त्याला मला वाटेल तेथे दौडवीत घेऊन जाईन. ज्या जीवनाचा आपण सुंदर विकास केला असे विशुध्द व बलवंत जीवन, जरुर पडेल तेव्हा फेकून देण्याची तयारी, यालाच सामर्थ्य म्हणतात. हे सामर्थ्य आता आपणास आले आहे; या सामर्थ्याने संपन्न असे आपण बलभीम आहोत. मारुतीच्या पुच्छांत सारी शक्ती असे व ती त्याला उड्डाण करण्यास स्फूर्ती देई. आपल्याही पाठीमागे अशीच शक्ती उभी राहू दे व ती आपणास पुढे लोटू दे, मग द्रोणागिरी आपण चेंडूसारखे खेळवीत आणू. लीलेने सागर ओलांडून जाऊ, चंद्रसूर्याची फळे फराळास मागू. अशा अभिनव बलाने अजिंक्य झालेले आम्ही पृथ्वी आता पादाक्रांत करू. ज्याला पराजयाचे कधीही स्वप्न पडत नाही, पराजयाची कल्पना ज्याच्या मनाला कधी शिवत नाही, तो अजिंक्य आहे, दुर्धर्ष आहे. त्याला विजयाचीही पर्वा नसते; कारण विजयाच्याही पलीकडचे जग त्याला मिळावयाचे असते. विजयाला तो तृणासमान मानतो. यामुळेच विजय त्याच्या पाठीस लागून येतो. “न मागे तयाची रमा होय दासी-” ज्याला इच्छाच नाही त्याची लक्ष्मी दासी होते. फळ सोडले की ते नेमके जोडले जाते.
आपल्या महत्त्वाकांक्षा आज अमर्याद आहेत, अनंत आहेत. परंतु त्या सार्या उदार आहेत; त्या देण्यासाठी आहेत, घेण्यासाठी नाहीत; त्या तारण्यासाठी आहेत, मारण्यासाठी नाहीत; पोषणाच्या आहेत, रक्त शोषणाच्या नाहीत. आपण आनंदाने जिंकू. मोठ्या मोदाने मिळवू. आपल्यापाठीमागून येणार्यांना ते देऊन आपण निघून जाऊ. या देण्यासाठी जीव तडफडत आहे. भावी पिढीला काहीतरी दिव्य ठेवा देता यावा म्हणून आपण अधीर झालो आहोत, जीव होमावयासही सिध्द झालो आहोत जोपर्यंत सर्वार्पण करण्याची वेळ जवळ येत नाही, तोपर्यंत अधिकच नेटाने व जोमाने काम करणार- हेतू हा की, येऊ दे लौकर ती धन्य वेळ व सर्वस्व अर्पण करून होऊ दे माझ्या जीविताचे सोने. एक दिवस ते सर्वस्वसमर्पण करता यावे यासाठी आपण आपले काम करीत राहिले पाहिजे, सेवेने उत्तरोत्तर शुध्द होत गेले पाहिजे. जे बलिदान करावयाचे ते शुध्द असले पाहिजे. देवाने आपल्या सेवेने प्रसन्न होऊन त्या सेवेने परिपूत झालेल्या आपल्या जीवनाचा हविर्भाग शेवटी मागितला पाहिजे. आजन्म मरणालाच धुंडीत राहू. मरण म्हणजेच विकास. परिपूर्ण विकास म्हणजे मरण. आपण जी संकटे सोसतो, ज्या लढाया लढतो, जे झगडे करतो, ज्या चळवळी चालवितो, त्या सर्वांशी आपल्याभोवती असलेल्यांचाही परिचय होतो. ते आपली ध्येये पाहतात, आपली तळमळ जाणतात. त्यांच्या कल्याणार्थच आपण झटत आहोत, प्राणांतिक प्रयत्न करीत आहोत, ही गोष्ट ते समजून घेतात. बुध्ददेवांनी यशोधरेचा त्याग केला, परंतु त्या त्यागात तिचेही अपरिमित कल्याण होते. त्यांनी आपल्या त्यागाचे तेजोवलय तिच्या मुखाभोवतीही पसरविले. संन्यासाची देणगी तिलाही मिळाली.