चारित्र्य 2
आज साम्राज्याची सूत्रे हालवणारा लहापणाचेच खेळ मोठ्या प्रमाणात खेळतो, दुसरे काय ? नेताजी व बाजी लहानपणी काटेरी झुडुपांनाच शत्रू समजून त्याच्याबरोबर लढत व त्यांना झोडपून काढीत. वेलिंग्टन लाकडी शिपायांबरोबर लहानपणी लटोपटीच्या लढाया खेळे. पुढच्या आयुष्यांतील लढाया माणसे लहानपणीच लढवीत असतात. जे लहानपणी असते त्याचाच विस्तार होतो. ज्या पुरुषाच्या दृष्टीला एक क्षण का होईना एकत्वाचा दिव्य अनुभव आला, तो पुरुष ते एकत्व आजूबाजूच्या सर्व विश्वात भरलेले अनुभवीपर्यंत शांत बसणार नाही. तो एकत्वाचा अद्वैताचा अनुभव दिक्कालांत वाढतीतच राहील व एक दिवस दिक्कालातीत होईल. तो पर्यंत अनंत जन्म घेऊन तो प्रयत्न करीत राहील.
मानवजातीचे सामर्थ्य अपरंपार आहे, आश्चर्यकारक आहे. मनुष्य कितीही दुबळा व नेभळा दिसो, कितीही हतपतित व हीनदीन भासो, त्याच्या अंत:करणात अनंत होण्याची शक्ती लपलेली असते. अनंत परमात्म्यांचा प्रवाह सर्वांतून वाहत आहे. त्या सृष्टींतील सर्वश्रेष्ठ वस्तू म्हणजे मनुष्य; व मनुष्यामधील अंतिम सत्य, श्रेष्ठ तत्त्व म्हणजे त्याच्यामधील परमेश्वर. म्हणून सर्वांनी आत्मश्रध्द व्हा. स्वत:चे हातपाय तोडून घेऊन पंगू बनू नका. स्वत:चे पंख छाटून शेणात लोळू नका. अपणा सर्वांस मोठे व्हावयाचे आहे. ते आपले नियत ध्येय आहे. ईश्वराला मिठी मारण्यासाठी आपले जीवन आहे, त्यासाठी आपला जन्म आहे. आपणाला भेटण्यासाठी दोनच नव्हे तर चार भुजा घेऊन तो परमेश्वर उभा आहे, कधीचा उभा आहे. आपली पूजा करावयास हातात कमलपुष्प घेऊन तो विश्वंभर उभा आहे. कधीचा युगे अठ्ठावीस उभा आहे. चला तर सारे निघू. विश्वंभराला भेटण्यासाठी निघून सर्वांनी बलवान् व धृतिमान व्हावे. आपण नरासारखे वागावयास लागताच नारायण आपली सेवा करावयास आपण होऊन धावत येईल. नरनारायणाची जोडी कोण फोडील ? जेथे नर, तेथे त्याचे घोडे खाजविण्यास, त्याच्या घोड्याचा खरारा करण्यास नारायणास यावेच लागेल. नर होणे एवढेच आपले काम.
तुमच्या आत जो परमेश्वर आहे, त्याला बाहेर प्रकट करा. तुमची दिव्यता अनुभवू घ्या. अंतरीचे बाहेर धावू दे. भूमीतील अंकुर वर नाचू दे. शिक्षणाचा हाच अर्थ. Education म्हणजे काय ? बाहेर काढणे- बाहेर प्रकट करणे. जे लपलेले आहे ते उघड करणे. तुमच्यातील दिव्यता बाहेर आणा. स्वत:वर विश्वास ठेवा. स्वत:ला दुबळे समजून स्वत:चा व स्वत:बरोबर त्या परमेश्वराचा अपमान नका करू. जो जे मागेल ते त्याला मिळेल. जो जे शोधील ते त्याला दिसेल; जो जे पेरील ते त्याला पिकेल; जो दार ठोठावील त्याला ते उघडेल. सारा भूतकाळ आपणांमध्ये साठलेला आहे. लहानशा बीजात वटवृक्षाचा विस्तार आहे. कोणत्याही क्षणी ती परज्योती आपणामधून प्रकट होण्यासाठी येईल. माझे हातपाय, माझे डोळे, माझे ओठ, माझे सारे जीवन तो वाटेल तेव्हा हातात घेईल व दिव्य कर्म प्रकट करील, दिव्य संगीत निर्माण करील.
तू दुबळा नको होऊ, निराश नको होऊ. घाव दे. घाव घे. लाभा-लाभ छोड दे. अनंत परमेश्वरच जर मुळी मी आहे, तर मी कुणाची काय म्हणून भीती धरावी ? आजपासून, ह्या क्षणापासून अर्ज, विनंत्याना याची, भीक यांना मी झुगारून देतो. श्रीमंतांचे लेकरू भीक मागत दारोदार हिंडत नाही, दीनवाणे होऊन वणवण करीत नाही. सिंहाचा छावा लपत छपत जात नसतो, तो निर्भय सर्वत्र संचार करतो. आजपासून, ह्या क्षणापासून, मी माझ्या सार्या क्षुद्र कामना, सार्या आसक्ती, सारे भय, सारी लाजलज्जा फेकून देतो. धीट होऊनच अवीट सुख मिळवावे लागते. मला नर होऊ दे, म्हणजे बस्स. नर होणे, खरा पुरुष होणे, खरा पुरुषार्थ संपादन करणे- यात मला समाधान आहे. मी खरा मनुष्य नसेन, नर या नावाला जर लायक नसेन, तर या जगातील मोठमोठ्या राजेमहाराजांचे भरजरी पोषाख जरी मला घातलेत, हिर्यामोर्यांनी मला नटविलेत, सोन्याचांदीने मढविलेत तरी माझी लाज झाकली जाणार नाही. माझी क्षुद्रता लपविली जाणार नाही. आणि मी जर खरा नर नसेन, तर माझ्या अंगावर जरी लक्तरे असली, फाटक्या चिंध्या जरी असल्या तरी त्यामुळे माझे दिव्यत्व जगात छपले जाणार नाही.