Get it on Google Play
Download on the App Store

तळमळ 2

दिखाऊपणा, अवडंबर, दंभ या गोष्टी तळमळीच्याविरुध्द आहेत. ज्याला ध्येयाशिवाय काही सुचत नाही, रूचत नाही, त्याला दंभ, दिमाख कोठून दिसणार ? नेहमी आपल्या नावाच्या जाहिराती फडकविणे, गाजावाजा करणे, कार्यपध्दती न विचारता सारखी फळाचीच विचारपूस करणे, ह्या गोष्टी म्हणजे तळमळीचा आंतरिकतेचा खून होय. असल्या गोष्टी विजयाचा मनोरा न बांधता अपयशाचा खड्डाच खणतात; जीवनपथ न दाखविता मरणपंथच दाखवितात. असल्या क्षुद्र गोष्टीची पाळेमुळे मनातून उपटून काढून दूर फेकून दिली पाहिजेत. जे जे नीरस व नि:सत्त्व आहे, क्षुद्र व हीन आहे, त्याला मनात कधीही थारा देता कामा नये. आपल्या मुलाबाळांसही या गोष्टीचे त्यांनी निर्मूलन करावे म्हणून आपण सदैव सल्ला व सहाय्य देत राहिले पाहिजे. ह्या दुर्गुणांची आपणास किळस आली पाहिजे. नरकाप्रमाणे त्याच्यापासून सदैव दूर राहिले पाहिजे. या दुर्गुणांचे नाव ऐकताच अंगावर काटा उभा राहिला पाहिजे. त्यांचे दर्शन होताच ‘शिव शिव’ असे म्हणून डोळे झाकून घेतले पाहिजेत. आपण आपले कार्य गाजावाजा न करता निसर्गाप्रमाणे, मुकेपणाने अहोरात्र करू या. कळीचं सुंदर फूल हाते, परंतु किती शांतपण रात्रंदिवस झगडून ते होते ! काहीतरी करून प्रसिध्द होण्याची जी वृत्ती, आत्मश्लाघेची ही जी फाजील आवड त्यांना आपण झगडून फेकून देऊ या. आपले कार्यच शब्दापेक्षा थोर आपण करू या.

आजकालचे जग गाजावाजाच फार करते. आजच्या जगाला ती सवयच लागत आहे. आपल्या पूर्वजांची गंभीर व धीरोदात्त वृत्ती, निरहंकारी परंतु तेजस्वी स्वाभिमान ..... यांपासून आपण दूर जात आहोत. आपल्या पूर्वजांना अहंकार नसे. ही अहंकारशून्यता, स्वत:ची जाणीवही विसरणे...... याची आपणास आज फार जरूरी आहे. निरहंकारी होण्याचा मार्ग एकच आहे. त्यासाठी आपले विचार व आपली ध्येये स्वत:च्या जीवनाहून आपणास थोर वाटली पाहिजेत. अशा थोर व उदात्त ध्येयांना वाढविण्यासाठी आपल्या जीवनाचे पाणी आपण घातले पाहिजे. त्या ध्येयासाठी आपले जीवन, आपले सर्वस्व, असे झाले पाहिजे. कुडी पडेपर्यंत आत्म्याचे हेच व्याप्तव्य व गंतव्य. दिव्य ईश्वरी तत्त्वाचा प्रचंड पूर सर्वत्र येऊ दे. जीवनात ती दिव्यात भरून राहू दे. म्हणजे आपला हा क्षुद्र अहं याची आपणास आठवणही होणार नाही. ईश्वरी तत्त्वाच्या पुराला पुष्कळ नावे आहेत. ह्या नावांतील काही नावे आपणास अपरिचित असतील. कोणत्याही कार्यासाठी झिजा. ते कार्य तुम्हाला स्वत:चा विसर पाडण्याइतके थोर असले म्हणजे झाले कारण अहंची विस्मती म्हणजेच परमात्मादर्शन होय.

राष्ट्रीय हिंदुधर्म

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
धर्म 1 धर्म 2 धर्म 3 हिंदुधर्माची श्रेष्ठता 1 हिंदुधर्माची श्रेष्ठता 2 हिंदुधर्माची श्रेष्ठता 3 हिंदुधर्म व संघटना 1 हिंदुधर्म व संघटना 2 हिंदुधर्म व संघटना 3 त्यागवृत्ती 1 त्यागवृत्ती 2 त्यागवृत्ती 3 त्यागवृत्ती 4 माणसांप्रमाणे वागा 1 माणसांप्रमाणे वागा 2 तळमळ 1 तळमळ 2 * सामर्थ्य 1 * सामर्थ्य 2 खरी महत्वकांक्षा 1 खरी महत्वकांक्षा 2 खरी महत्वकांक्षा 3 खरी महत्वकांक्षा 4 चारित्र्य 1 चारित्र्य 2 विवेक 1 विवेक 2 पात्रता 1 पात्रता 2 पात्रता 3 आत्म-प्रौढी 1 आत्म-प्रौढी 2 आत्म-प्रौढी 3 अनुभव 1 अनुभव 2 कर्मद्वारा साक्षात्कार 1 कर्मद्वारा साक्षात्कार 2 श्रध्देचे सामर्थ्य 1 श्रध्देचे सामर्थ्य 2 कमळ व भ्रमर 1 कमळ व भ्रमर 2 कमळ व भ्रमर 3 कमळ व भ्रमर 4 विचारांचा विकास 1 विचारांचा विकास 2 राष्ट्रीय धर्म 1 राष्ट्रीय धर्म 2 राष्ट्रीय धर्म 3 राष्ट्रीय धर्म 4 जबाबदारी 1 जबाबदारी 2 जबाबदारी 3 जबाबदारी 4 जबाबदारी 5 जबाबदारी 6 ध्येय 1 ध्येय 2 ध्येय 3 ध्येय 4 मृत्यूवर विजय 1 मृत्यूवर विजय 2 मृत्यूवर विजय 3 भूत व भविष्य 1 भूत व भविष्य 2 प्रपंच व परमार्थ 1 प्रपंच व परमार्थ 2 प्रपंच व परमार्थ 3