आत्म-प्रौढी 1
अज्ञानाचे अनेक प्रकार आहेत. परंतु आत्मश्लाघेइतका निंद्य प्रकार दुसरा कोणताच नसेल. ह्या प्रकाराने पतन जितके सुलभ आहे तितके दुसर्या प्रकाराने नाही. आपण आपल्या जीवनात कितीदा तरी मागे पाहतो व सुस्कारा सोडतो. आपल्या भूतकाळाची आपण पूजा करतो, परंतु भविष्यकाळात वर चढण्याची हिंमत बाळगीत नाही. पुष्कळशा सत्प्रवृत्त माणसांचे बालपण भक्तिमय व भावनामय असते. ते त्यांना पुढे चिखलात बरबटल्यावर पुन्हा पुन्हा आठवते. पुन्हा पुन्हा ते मागे मुरडून बघतात. जीवनाच्या आरंभी जो आकार त्यांच्या जीवनाला होता, तो त्यांना अत्यंत मोहक व रमणीय दिसतो. कोणीही येवो त्याच्यासमोर ‘मी असा होतो, मी असे करीत असे, मी उपवास करीत असे, मी जप करीत असे.’ वगैरे आत्मविकत्थन ते सुरू करतात. असे करण्यात स्वत:च्या अहंकाराचे समाधान होत असते. समोरच्या श्रोत्याला आपले हे पूर्वीचे आत्मपुराण आवडते आहे की नाही, हेही तो पाहत नाही. तो आपली कथा त्याच्यावर लादीतच असतो. दुसर्याचे स्वातंत्र्य म्हणजे काय ह्याची आपणांमधील फारच थोडयांना कल्पना असते. आपण सारे दुसर्यावर लादू पाहणारे सुलतान असतो.
आजकाल “मी असा होतो व आम्ही असे होतो.” असे सांगण्याचा रोगच जडला आहे. आत्मप्रौढी, आत्मश्लाघा सर्वत्र अमर्यादपणे दिसून येत आहे. ह्या गोष्टीचा आरंभ सद्हेतून झाला. परंतु झाला तो सध्देतू लोक विसरून गेले आहेत. प्राचीन ध्येये फिरून हस्तगत करण्याचा आजचा काळ आहे. आपल्या भूतकाळाच्या समुद्रात पुन: पुन्हा बुड्या मारून, विशाल अशा गतेतिहासात फिरून फिरून शिरकून आपल्या विकासाच्या हातांतून सुटलेले टाके हातात घेऊन पुढे जाण्याच्या खटपटीत आहोत. याचा परिणाम नाना रूपांनी दिसत आहे. आपण आपल्या वंशावळी पाहू लागलो आहोत, आडनावे शोधू लागलो आहोत. आपण थोरामोठ्यांना यांचे वंशज आहोत, असे दाखविण्याच्या खटपटी सुरू झाल्या आहेत. आम्ही ‘ पवार ’ म्हणजे परमार घराण्यांतील, असे संबंध जोडण्यात येऊ लागले आहेत. काहीतरी करून आपली परंपरा थोर अशा पूर्वजांजवळ नेऊन जोडावयाची असे सुरू झाले आहे. आपली पूर्वजांची स्तूतिस्तोत्रे गाऊ लागलो. आम्ही असे होतो, आम्ही शिवाजी- बाजींचे, समर्थ-तुकारामांचे वंशज- अशा प्रकारचे वाक्संप्रदाय कानी सर्वत्र पडू लागले. आपण आपल्याला आकाशाइतके उंच करू लागलो. जणू स्वर्ग दोनच बोटे आता उरला ! परंतु हे सारे जे सुरू झाले, त्याच्यातील हेतू विसरलो. आपणास पुढे जाण्याला उत्तेजन मिळावे, पुढे जाण्यासाठी हुरूप यावा, आपली निराशा जाऊन आपण जोराने कार्यास लागून पूर्वजांप्रमाणे पुन्हा आजच्या जगात मोठे व्हावे हा यात हेतू होता. पूर्वजांची स्तुती करून त्यांच्या मोठेपणावर मिरवत राहणे हा यात हेतू नव्हता. पूर्वज मोठे होते- तूही मोठा होऊ शकशील, हा त्यात संदेश होता. पूर्वज मोठे होते, एवढ्यानेच मी मोठा होत नाही. मी काही न करता पूर्वजांच्या गादीवर आहे, एवढ्यानेच मी मोठा आहे असा अहंकार निर्माण व्हावा हा त्यात हेतू नव्हता. ज्या वेळेस एखादा वक्ता म्हणतो, “हे ऋषिमुनींच्या वंशजाने !” त्या वेळेस जर एखादा श्रोता स्वत:ला वसिष्ठ-वामदेव समजू लागले तर तो त्याचा तमोगुण आहे. दुसरे काय ? वक्त्याच्या म्हणण्याचा आशय हा की, अशा थोरांच्या कुळातील तुम्ही आज असे नादान कसे झालात ? काही लाज धरा व उठा.
तसेच दुसरे एक सांगावयाचे ते हे की, हिंदुस्थानातील कोटयावधी लोकांना तुम्ही चैतन्य व्हा, तुम्ही तुकाराम व्हा, तुम्ही ख्रिस्त व्हा, तुम्ही बुध्द व्हा, असे वक्तृत्वाच्या भरात वक्ते सांगत असतात. ते म्हणतात, “आमच्याने असे सांगितल्याशिवाय राहावतच नाही.” राहावतच नाही! आपणातील प्रत्येक जर ख्रिस्त, चैतन्य असेल तर कसे राहवेल ? महंमद पैगंबर येशूख्रिस्ताबद्दल एकदा म्हणाले, “अंगावरील लोकर कापणार्या माणसासमोर मेंढी जशी गप्प बसते, तसे का ख्रिस्ताचे खुळेपण होते ? ख्रिस्ताचे मौन असे रडके, दीनवाणे नव्हते. त्याचे ते मौन दिव्य व अनंत सामर्थ्याने संपन्न असे होते.” ख्रिस्ताच्या दिव्य व वक्तृत्वपूर्ण मौनाप्रमाणे आपले आजचे मौन आहे का ? आपण तोंड उघडीत नाही ते भीतीमुळे का आतील निर्भय अलोट सामर्थ्यामुळै ? ख्रिस्त झाल्याशिवाय ख्रिस्ताला ज्या साधनांनी विजय मिळाला, त्या साधनांनी आपणास मिळणार नाही. ख्रिस्ताने जे शस्त्र वापरले ते वापरावयाचे असेल तर आधी ख्रिस्त झाले पाहिजे. परंतु आपला मुकेपणा आहे मेंढरांचा. असला मुकेपणा काय फळ आणून देणार ? आपणांतील तमोगुणामुळे अशा ह्या चुका आपण करीत आहोत; काहीतरी भलभलते भकत आहोत, मनात मानीत आहोत. ख्रिस्त व्हा व मग त्याची साधने घ्या.