धर्म 2
ही दृष्टी जर नीट समजली, हा वर सांगितलेला विचार जर पूर्णपणे पटला, तर आपणास जुन्या धर्मग्रंथांकडे नवीन दृष्टीने पाहावे लागेल. ज्या वचनांमुळे आपल्या या सभोवतालच्या जगातील नाना प्रकारची सेवेची कर्मे करण्यास उत्साह वाटेल, स्फूर्ती मिळेल, अशा प्रकारची वचने आपण शोधून काढली पाहिजेत. त्या वचनांवर जोर दिला पाहिजे, भर दिला पाहिजे. ती वचने आज जीवनाला वळण देणारी झाली पाहिजेत. त्या वचनांचा जयजयकार सर्वत्र केला पाहिजे. कर्मत्यागाने जो मोक्ष मिळतो, तोच कर्म सतत केल्यानेही मिळतो, असे शिकविणारी शेकडो वचने आहेत. परंतु संन्यासावरचे सारा भर आजपर्यंत दिला गेला व त्यामुळे कर्मयोगाच्या आचरणाकडे संन्यासावरच सारा भर आजपर्यंत दिला गेला व त्यामुळे कर्मयोगाच्या आचराणाकडे लोकांनी लक्ष दिले नाही. लोकसंग्रहरूप धर्माचरणाची उपेक्षा केली गेली. लोकसंग्राहक धर्माची महती दाखवली गेली नाही. पाश्चिमात्य समाजरचनेत संन्यासाला स्थान नाही ही उणीव आहे खरी, परंतु हिंदुधर्मांतही नागरिकत्वाची कर्तव्ये, सामाजिक कर्तव्ये यांवर जोर दिला जात नाही. ही उणीव आहे, ही पण गोष्ट तितकीच खरी. ज्या वेळेस हिंदुधर्मग्रंथ रचले गेले, त्या वेळेस आध्यात्मिक संपत्तीबरोबर आधिभौतिक संपत्तीही येथे भरपूर होती, हे या वरील उणिवेचे कारण असणे शक्य आहे. परंतु देशातील ऐहिक वैभव कमी होताच आध्यात्मिकताही लोपली; प्रपंच रोडावताच सत्त्वाचाही र्हास झाला. एकाचा विनाश होताच दुसर्याचा विनाश थांबणे अशक्य होते. आज संपत्ती व सद्गुण, ऐहिक व पारमार्थिक, अभ्युदय व नि:श्रेयस दोन्ही गोष्टी आपणास मिळवून घ्यावयाच्या आहेत, हे विसरून चालणार नाही.
म्हणून आज श्रमांची महती शतमुखांनी गायली पाहिजे. आज कर्माची पूजा केली पाहिजे, कर्माला सिंहासनावर बसविले पाहिजे. “कर्मदेवी भव” हे आज आपले जीवनसूत्र झाले पाहिजे. ‘जग म्हणजे पाठशाळा आहे.’ या शाळेत एकेक धडा शिकत शिकत खालच्या वर्गातून वरच्या वर्गात जावयाचे असते. आपण चाकाला स्वत: खांदा दिला पाहिजे व डोळ्यांसमोर जे प्राप्तव्य आहे, ते प्राप्त होईपर्यंत अविश्रांत श्रम केले पाहिजेत. कष्टेविण कीर्ती कदापि नाही. हे ओळखून वागले पाहिजे. व करंटेपण दूर झुगारले पाहिजे. उत्कट व भव्य जे जे आहे हे घेण्यासाठी अदम्यपणे उठविले पाहिजे. सांसारिक जीवनात परिपूर्णता अशक्य आहे. निर्दोष व अव्यंग असे परमपद प्राप्त होणे अशक्य आहे, असे आपले तत्त्वज्ञान जरी सांगत असले तरी - मुळीच प्रगती होणार नाही, परिपूर्णतेकडे मुळीच जाता येणार नाही- असे ते म्हणत नाही; परिपूर्णतेच्या जवळ जाणे शक्य आहे. या सापेक्ष जगात कर्म करीत असताना, पुढच्याच पावलाला कदाचित् परिपूर्णता मिळेल, अशा दृढतम श्रध्देने आपण पुढे जात राहिले पाहिजे.
साध्या साध्या अशा रोजच्या कर्मातही ध्येयवादित्व सोडता कामा नये. एका कारखान्यातील कोण एका मजुराला “तू चांगले स्क्रू करतोस का ?” असा कोणी प्रश्न केला. त्या मजुराने उत्कटतेने व तेजाने उत्तर दिले, “चांगलेच नाही तर जितके उत्कृष्ट करता येणे शक्य असेल, तितके उत्कृष्ट स्क्रू मी तयार करीत असतो.” हीच दृष्टी आपली असली पाहिजे. शक्य तितके उत्कृष्ट स्क्रू तयार करा. जे हातात घ्याल ते उत्कृष्ट करा. कोणत्याही कार्यक्षेत्रात जा, कोणतेही समाजसेवेचे कर्म उचला, परंतु “उत्कृष्ट स्क्रू तयार करीन” हे सूत्र विसरू नका. उत्कृष्ट करणे, परमोच्च संपादणे, त्या त्या कर्मात पराकाष्ठा करणे- हे कठीण नाही, पराकाष्ठा पाहिजे. पराकाष्ठा हीच कसोटी- हीच परीक्षा. पराकाष्ठेपेक्षा कमी नको. कसे तरी मेंगुळगाड्यासारखे मिळमिळीतपणे केलेले, वेठ मारलेले, झटपटरंगार्याप्रमाणे केलेले नको. सोपे, स्वस्त नको. संन्यास घेणार्या संन्याशाला जी तीव्रता असेल, जो उत्साह व जी उत्कटता त्याच्या ठिकाणी असेल, ती मजूर होण्यातही असू दे. मजूर होण्याने जर मातेची सेवा आज उत्कृष्टपणे करता येत असेल, तर आज आपण उत्साहाने मजूर होऊ या आणि मातेचा संसार साजरा करू या.