राष्ट्रीय धर्म 4
हे बंधो ! जरा थांब, तू कामासाठी ना निघालास ? ठीक. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेव. आज मातेला आपणा सर्वांची फार जरूरी आहे. अशा वेळेस सवेचे शस्त्र घेऊन कामास जा. कामामध्ये स्वार्थ नको ठेवू. कामामध्ये शरीर व मन विसरून जा. प्रत्येक स्नायू, प्रत्येक अवयव कामात दमू दे, झिजू दे. ध्येयाला गाठण्यासाठी, शारीरिक, बौध्दिक, हार्दिक सर्व शक्तीची जरुरी आहे. हात, हृदय, डोके तिघांना एकत्र कर व मग काम कर. जे काम हातात घेणार आहेस त्याचाच जागृतीत वा सुषुप्तीत विचार चालू ठेव. जा. थांब पण. आणखी एक सांगायचे आहे, तेही लक्षात ठेव. निर्दोष चारित्र्य. त्याची जरुरी फारच आहे. तोच तुझा मार्गदर्शक. निर्दोष सेवा हे तुझे ध्येय. अशा प्रकारे श्रम कर. मग एक दिवस आपोआप ज्ञानप्रभा तुझ्या अंतरंगात फाकेल. भारतवर्षाच्या संतांत आपण नवीन प्रकारच्या संतांची भर घालू. आज शेतात, मळ्यात, कारखान्यात, शाळेत, प्रयोगालयात- सर्वत्र संतांची जरुरी आहे. प्रत्येक कर्म पवित्र आहे हे दाखविण्यासाठी, पटविण्यासाठी समाजसेवेचे कोणतेही लहान वा मोठे कर्म मोक्ष आणून देते हे फिरुन एकदा दाखविण्यासाठी, गोर्या कुंभारासारखे व मोमीन-कबीरासारखे, दळणार्या जनाबाईसारखे व दुकान चालविणार्या तुलाधार वाण्यासारखे- कर्मवीर संत, सेवासाधन संत पुन्हा निर्माण होऊ देत. भारतवर्षाचा हा आजचा संदेश आहे. समाजाच्या हिताचे कोणतेही कर्म- जोडे शिवण्याचे वा सूल हरण करण्याचे, ज्ञानदानाचे वा ज्ञानसंशोधनाचे- पवित्र आहे, मुक्ती देणारे आहे, प्रभूची भेट करविणारे आहे.