हिंदुधर्माची श्रेष्ठता 2
पाश्चिमात्य लोकांच्या धार्मिक क्षितिजावर ज्या नाना प्रकारच्या चाली व जे कल्पनांचे अवडंबर दिसते, ते पाहून हसावेसे वाटते. एखादा मोठा शास्त्रज्ञ देव आहे असे म्हणतो, म्हणून इतरांनी देव आहे असे म्हणणे म्हणजे शुध्द पोरकटपणा आहे. ज्या धर्माचे अनुयायी स्वधर्माची अशी हेटाळणी करतात, त्यांना हा आपला धर्म आपण इतरांस देऊ, अशी अपेक्षा खरोखर असणे शक्य आहे का ? आपला हा धर्म इतर स्वीकारतील असे यांना मनापासून वाटते का ? हिंदुमात्राला धर्म याचा अर्थ ‘ स्वानुभव ’ असा वाटतो. धर्म म्हणजे स्वानुभव; दुसरे-तिसरे काही नाही. शास्त्र म्हणजेही जर स्वानुभव असेल तर हिंदू त्याला नाकारणार नाही. माझा अनुभव, तसाच शास्त्राचाही अनुभव. दोन्ही सत्यच. ईश्वर काही फक्त माझ्या स्वाधीन नाही. माझ्या या क्षणींच्या तुटपुंज्या अनुभवावर काही विश्व उभारलेले नाही, त्यावर विश्वाची वासलात लावू नये. एखादा साधा न्यायाधीशसुध्दा नम्रपणे सर्वांचे म्हणणे ऐकून घेतो. तू तर ईश्वराचा न्याय करावयास बसला आहेस, जगाचे - विश्वाचे- कोडे उलगडण्यास बसला आहेस; मग किती नम्रपणे, व धीराने तुला वागले पाहिजे बरे ?
केवळ विश्वास ठेवणे, केवळ लिहिणे-वाचणे, यावर हिंदुधर्माचा जोर नाही. या गोष्टीकडे हिंदुधर्म तादृश लक्ष देत नाही. बोलण्याचा अधिकार प्राप्त होण्यास प्रथम मनुष्याला स्वानुभव पाहिजे. खोटे नाणे, नकली नाणे चालणार नाही. नाण्याचा आवाज ऐकताच ते खरे की खोटे याची शहानिशा होऊन जाते. अधिकारयुक्त वाणी कोणाची व ओठापुरती लाक्षणिक वाणी कोणाची, हे ताबडतोब समजून येते. हिंदुधर्मात अथपासून इतिपर्यंत अनुभवावर भर आहे. व्यक्तीला स्वत:ला काय मिळाले आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. व्यक्तीला जे तत्त्व मिळाले त्या तत्त्वासाठी, जो विचार स्फुरला त्या विचारासाठी, व्यक्ती किती झीज सोसते, किती झीज सोशील, या गोष्टीला हिंदुधर्म महत्त्व देतो. तोंडदेखील श्रध्दा, ओठापुरते तत्त्वप्रेम आपल्या डोळ्यांत भरत नाही. आंतरिक जिव्हाळा पाहिजे, त्याशिवाय सारे फोल होय. त्या जिव्हाळ्याशिवाय कोणी बोलले काय किंवा न बोलले काय, कोणी आला काय, न आला काय सारे सारखेच आहे. आपली सर्व संस्कृती उद्या धुळीत मिळाली तरी आपण पुन्हा निर्मू; कारण आपल्या संस्कृती पुन्हा उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा तळमळीतूनच ती उत्पन्न झाली आहे.