आत्म-प्रौढी 2
“तर मग आम्हांला प्रथम होऊ दे ख्रिस्ताप्रमाणे. ख्रिस्त झाल्यावर मग तर विजय मिळेल ना ? थांबू तोपर्यंत-” असो तो तमोगुणी मनुष्य उत्तर देतो. फार चांगले आहे, बाबा. परंतु काय रे, पदोपदी स्वत:चा विचार करून तू कसा रे ख्रिस्त होणार ? स्वत:चा अहं सारखा सबळ बाळगणे हा थोर पुरुष होण्याचा, महात्मा होण्याचा मार्ग नव्हे. महात्म्याकडे जाण्याचा हा रस्ता नव्हे. विजय मिळविण्यासाठी जो स्वत:ला विसरतो, तोच विजयी होतो. लहान लहान गुण आपलेसे करून घेण्यासाठी बुध्दांनी ५०० जन्म घेतले. तेव्हा कोठे ते शेवटी बुध्द झाले, सिध्दार्थ झाले. प्रत्येक जन्मात ते स्वत:ला विसरले, जीवनाला विसरले, मरणाला विसरले, फक्त साधनेतच निशिदिन रमले. तळमळ व धडपड याच्याशिवाय त्यांना काही माहीत नव्हते. ज्वारीचा दाणा खापरात खाली वर तडफडतो, तेव्हा त्या दाण्याची शुभ्र व स्वच्छ लाही होते. बुध्दांना असेच अनेक जन्म भट्टीत घालून घ्यावे लागले, देहभान विसरावे लागले, अपार श्रम करावे लागले. आणि असे करून एक दिवस विश्वाचे साम्राज्य त्यांनी मिळविले; परंतु तेही क्षणभंगुर मानून, ज्या परम सत्याने तृषित जीवांना दयारस पाजण्यासाठी त्यांना दयेचे भरलेले पात्र बनविले त्या परम सत्याच्या प्रकाशात ते मिळून गेले.
ही मायानदी तरून जाण्यासाठी प्रत्येकाची साधने निराळी, प्रत्येकाचे मार्ग निराळे. ज्या दगडावर ह्या क्षणी मी पाय ठेवीन त्या दगडावर त्या क्षणी तुम्ही ठेवावयाचा नसतो. प्रत्येकजण आपापल्या दगडावर पाय ठेवून नदी ओलांडीत आहे. प्रत्येक वेळी एकच पाऊल, या दगडावर तोल सांभाळून आधी नीट उभे राहावयाचे व मग पुढल्या दगडावर अचूक सावधपणे उडी मारावयाची. त्या पुढच्या दगडावर जी उडी मारावयाची त्या क्रियेत सारे हृदय, सारा आत्मा ओतलेली असली पाहिजेत. आपणापैकी बहुतेक सर्वांना ह्या जन्मात परमतत्त्व नाही; ह्या जन्मात परतीर नाही. पुढचा गड गाठला तरी पुष्कळ झाले. लहानसे ध्येय, लहानसे काम, त्यासाठी आज आपणास जगावयाचे आहे, त्या लहान कर्तव्यासाठीच स्वत:ला विसरून जाण्याचे शिकावयाचे आहे. अशा रीतीने लहान लहान कर्मे उत्कृष्टपणे करीत, अशा रीतीने लहान लहान पाऊले मन:पूर्वक एकाग्रतेने टाकीत आपणास परतीर गाठावयाचे आहे. अशा मार्गानेच मोठे गेले, अशा मार्गानेच भगवान् बुध्द गेले. कर्मे करीत कर्मातीताकडे जाऊ; कला शिकत शिकत कलातीताकडे जाऊ; बंधने पाळून पाळूनच बंधनातीत होऊ. ह्या जगात अशा शेकडो लहानसहान गोष्टी आहेत की, ज्यांच्यासाठी आपणास आपली जीविते अर्पण करता येतील. जगात अशा गोष्टींचा दुष्काळ नाही. साक्षरताप्रसार, स्वदेशीप्रसार, व्यायामप्रसार, ज्ञानप्रसार, रानटी लोकांत जाऊन त्यांची सेवा करणे, मद्यपानबंदी, आपल्या देशाचा साराच संसार फाटला आहे. हजारो कामे पडली आहेत. ह्या कामात सर्वस्व अर्पण करून पडू या. जगात अशी मौल्यवान कामे पडली आहेत, त्यासाठी आज प्राणाचे मोल द्या. एकदम शेवटच्या परीक्षेस बसण्याची ऐट आणू नका. तशी नसती ऐट आणाल तर फसाल, पस्तावाल. आजच काही तुम्ही गरुड नाही. एकदम विहंगम मार्गने परमेश्वराकडे तुम्हाला उडता येणार नाही. तुमचा आमचा शेकडा ९९ लोकांचा पिपीलिका मार्गच आहे. आजचे तुमचे जीवन इतके मौल्यवान नाही की, ते देऊन परमेश्वर विकत घेता येईल. ते मोल एक दिवस येईल. परंतु अधीर होऊ नका. आज मुक्ती दूर आहे. परंतु एकेक पायरी चढत चढत ती आपण शेवटी गाठू. ही अनंत कर्माची शिडी एक दिवस मोक्षाच्या दिवाणखान्यात आपणास सोडल्याशिवाय राहणार नाही. नाना जीव नाना भूमिकेवर असतात. कोणी शिडीच्या फार वरच्या पायरीवर आहेत, कोणी खालच्या आहेत. परंतु एक दिवस सारेच चढून जाऊ. आपण ज्ञानाच्या शिडीवर चढणारी सारी बाळे आहोत. सर्व एकाच पयरीवर नाहीत. सर्वांना एकच उपदेश नाही. एकच कर्म नाही. अधिकार तैसा करू उपदेश. परंतु एक कायदा मात्र सर्वांना सारखाच लागू आहे. हा सर्वव्यापक असा नियम कोणता ते माहीत आहे का ? तो हा की, त्यागानेच, स्वत:चा पूर्ण विसर पडल्यानेच परमपदप्राप्ती करून घेता येते. हा तो सार्वभौम नियम होय.