ध्येय 4
माझ्या जीवितांचे ध्येय हाच वणवा ध्येयपूजकाच्या हृदयात पेट घेतो. त्याच्या सर्व जीवनाचा नुसता आगडोंब उडून राहतो. हृदयाची होळी पेटलेली असते. जीवनाचे होमकुंड धडधडत असते. ध्येयासाठीच ध्येय. अतिथी उजवी शरीराची बाजू कर्वतून मागतो म्हणून मयूरध्वज तयार होतो. परंतु डाव्या बाजूचे ते भाग्य नाही म्हणून डावा डोळा भरून येतो ! शिबी राजा कपोताचा सांभाळ करण्यासाठी मांडीचे मांस कापून ससाण्याला देतो, परंतु त्याच्या शरीराचे इतर अवयव आपले असे भाग्य नाही म्हणून दु:खी होतात ! दधीचि असुरसंहार व्हावा म्हणून स्वत:ची हाडे देण्यास तयार होतो व प्राणार्पण करतो ! नायट्रोजनचे गुणधर्म शोधून काढताना मायर या जर्मन रसायनशास्त्रज्ञाचा स्फोट होऊन एक हात तुटला व एक डोळा फुटला; परंतु त्याचक्षणी गुडघे टेकून, “देवा, अजून एक हात व एक डोळा तू ठेवला आहेस- थोर तुझे उपकार” अशी त्याने प्रार्थना केली ! अशा दिव्य कर्मवीरांकडून ‘ कर्म ’ हा शब्द जेव्हा उच्चारला जातो, तेव्हा दुसर्यांच्या हृदयात ज्ञानाची चित्कलाच संचारल्याचा भास होतो. असे दिव्य कर्म म्हणजे परमोच्च मोक्षच होय. खरे ज्ञान, खरे कर्म, खरी शक्ती ही अभिन्नच आहेत !
नवभारतातील संन्याशाच्या संन्याशाचा अर्थ दुसर्याची सेवा करणे हाच असला पाहिजे. हा नवसंन्यासी वज्राप्रमाणे कठोर, ब्रह्मचर्याप्रमाणे प्रखर तेजस्वी, सागराप्रमाणे विशाल हृदयाचा, सर्वस्व देणार्या मेघाप्रमाणे नि:स्वार्थ असा असला पाहिजे. लढावयास उठलेल्या झुंझार हिंदुधर्माला याहून कमी दर्जाचे, याहून कमी सत्त्वाचे पुत्र चालणार नाहीत. ज्याची अशी तयारी असेल तोच खरा धर्मपुत्र.