जबाबदारी 5
आपल्याकडे मठ आहेत, महंत आहेत. युरोपियन मठ व आपल्याकडचे मठ यांत काय फरक आहे बरे ? युरोपातील मठवासी संन्याशात संघटना आहे, कार्यपध्दती आहे, सेवेची नितांत आवड आहे; विशिष्ट जबाबदार्या त्यांनी स्पष्टपणे आपल्या शिरावर घेतल्या आहेत. त्यांच्या मठात एक पुरुष मुख्य असतो. त्याच्या हाताखाली आणखी दोन असतात. यातील एक जण नवशिक्यांना शिकवितो, दुसरा आलेल्या अतिथिअभ्यागतांचे स्वागत करतो. मठात किती का लोक असत ना; प्रत्येकाला काम नेमून दिलेले. याचा त्याच्या कामाशी घोटाळा नाही. सारे व्यवस्थित व शांतपणे चाललेले असते. गडबड नाही, घोटाळा नाही. धावपळ नाही, अव्यवस्थितपणा नाही. अशी एकही घटका जात नाही, असा एकही क्षण जात नाही, की ज्या वेळेस कोठले ना कोठले तरी नियुक्त कर्म प्रत्येक जण करीत नाही. सर्व आखून दिलेले. आळसाला, विलासाला स्थान नाही. गडबडीला अवसर नाही. त्रागा नाही, तंटा नाही. अशा रीतीने या मठरूपी देहातील सारे अवयव आपापली कामे नीट करीत असतात, सहकार्याने चालवीत असतात आणि मठाचे ध्येय वाढवीत असतात. त्या ध्येय-हृदयातील रक्त सार्या अवयवांतून वाहत असते. ‘सूत्रबध्द, व्यवस्थित कर्म कर’ अशी प्राणमय घटना तेथे असते. शत्रूवर स्वारी करणार्या लष्करांतही तितकी शिस्त व आज्ञाधारकता नसेल, जितकी सेवा करणार्या या मठवासीयांत असते.
अशा संस्थांचा विकास व्हावयास अनेक शतके लागली. ह्या संस्थांच्या विकासातच अर्वाचीन अवाढव्य जो युरोपियन व्यापार, त्याची बीजे आहेत. प्रचंड व्यापारी मंडळ्या, लाखो मजूर काम करीत असलेले कारखाने- परंतु सारे कसे रेखीव व आखीव चाललेले असते. गडबडगुंडा कोठेच नाही. एक शब्द ऐकू येणार नाही. सारे आपआपल्या कामात चूर. सारी घडी बसलेली, लष्करात, व्यापारात, राज्यकारभारात- सर्वत्र शिस्त, संयम, व्यवस्थितपणा यांचे बी पेरले गेले आहे. डोंगराच्या मध्यावर एखादा वृक्ष प्रयत्नाने मोठा व्हावा, त्याला फुले, फळे यावीत व त्या फळातील बीजे वार्याने सर्वत्र पेरावी- मग तसा तो डोंगर त्याच प्रकारच्या वृक्षांच्या जंगलाने नटून जातो- मलयगिरी चंदनाच्या वृक्षांनीच जसा सजून गेला- तसे युरोपमध्ये झाले. सुसंघटित संन्याशांच्या संस्थांनी- शतकानुशतके त्या विशिष्ट गुणांचा विकास करीत असलेल्या ह्या संस्थांनी संघटनेची बीजे सर्व युरोपभर सर्व कर्मक्षेत्रात पेरली व ती सर्वत्र रुजून आज मोठी झाली आहेत- त्या बीजांचे प्रचंड वृक्ष झाले आहेत. समाज तिकडे एकरूप आहे. संन्यासी समाजापासून वेगळा नाही. एकाने केलेल्या उद्योगाचे फायदे- एकाने केलेल्या प्रयोगाचे फायदे सार्या समाजास मिळतात.
विचाराच्या पाठीमागे अनुभव असतो व अनुभवापोटी ज्ञान असते. नाना प्रकारच्या अनुभवांतून आपण शहाणपण शिकतो. विचारांचा पूर्ण विकास व्हावयास अनुभव लाभतो. मग तो विचार व्यक्तिगत असो वा सर्व समाजाचा असो. असा कोणता प्रत्यक्ष अनुभव होता की, ज्यामुळे युरोपातील लोकांच्या अगदी रक्तांत, अगदी हाडामासांत ही कार्यकुशलता, ही कार्यकारी एकता, ही शिस्त व ही संघटना इतर देशांतील लोकांपेक्षा अधिक बिंबली ? कोणत्या अनुभवामुळे हा इतर देशांतील लोकांपेक्षा त्यांचाच विशेष झाला ?
समाजशास्त्रज्ञ म्हणतात की, समुद्रावरील वर्चस्व याच्या मुळाशी आहे. समुद्रावर विजय हा तो अनुभव होय. युरोपातील अनेक देशांना समुद्रकिनारा आहे. समुद्रकाठी लाखो लोक राहतात. त्या लोकांच्या संघटनेच्या मुळाशी गलबत व गलबताचे ध्येय आहे. गलबतावर कोणते खलाशाचे मंडळ असे ? प्रत्येक गलबतावरचे खलाशी म्हणजे सारे कुटुंबातलेच असत. पिता मुख्य नायक असे. मुलगा मुख्य तांडेल धाकटा मुलगा त्याचा सहकारी. इतर मुलगे, भाचे, पुतणे- सारे खलाशी अशा प्रकारचे गलबतावरचे कार्यमंडळ असे. त्यांचे संबंध ठरत, कामे वाटली जात व गलबत हाकारले जाई. आता वादळ झाले तरी कोणीही आपआपले काम सोडावयाचे नाही. बापाने रडत मुलाकडे जावयाचे नाही; मुलाने बापाला हाका मारावयाच्या नाहीत. सारे आपापल्या कामात दक्ष. आपापल्या ठिकाणी गाडून घेतल्याप्रमाणे उभे. गलबतावरची संघटना सार्या युरोपाने उचलली परंतु पुढे मासे मारावयाचे सोडून राष्ट्र मारू लागण्याचे या गलबती संघटनेचे ध्येय, तेही युरोपने उचलले.