ध्येय 2
ब्रह्मचर्याचा आपला अर्थ आता निराळा आहे. ब्रह्मचर्य हे फक्त संन्याशालाच आहे असे नाही. ब्रह्मचर्य हे केवळ कायिक नसून ते वाचिक व मानसिकही असते. थोर हेतूशिवाय पाळलेले ब्रह्मचर्य हे अर्थशून्य. असले ध्येयहीन ब्रह्मचर्य म्हणजे आत्मशक्तीचा नाश होय. ब्रह्मचर्यही आज परिणामकारक, दुसर्यांच्या जीवनांवर हल्ले चढविणारे, व प्रभावशाली असे करावयाचे आहे, जगातील नारीनरांना परब्रह्माची रूपे म्हणून पाहणे, त्यांच्या ठिकाणी दिव्यत्व पाहणे, केवळ चिन्मयमूर्ती या दृष्टीने त्यांच्याकडे पाहणे, हे ब्रह्मचर्याचे प्रभावी ध्येय असते व या ध्येयासाठी संसारात न पडणे, अविवाहित राहणे हे एक साधन असते. केवळ अविवाहित राहणे याला अर्थ नाही. ते विवाहित राहणे दिव्य ध्येयाचे साधन झाले पाहिजे. विवाह-खरा विवाह-म्हणजे दोन मनांची मैत्री, दोन हृदयांचा संगम, दोन जीवांची भेट एवढाच आहे. विचारांचा विनिमय, आणीबाणीच्या वेळी दोघांनी एकरूप होणे, एकमेकांनी एकमेकांचा विकास होण्यास प्रेमाने व सहानुभूतीने मदत करणे हाच खरा विवाह होय. दोघांनी ध्येयदेवाची पूजा करावी. एकानेच उन्नत न होता उभयतांनी उन्नत होणे, हेच विवाहाचे ध्येय. एकमकांनी एकमेकांस वैषयिक सुख देण्यापेक्षा, परस्परांची भोगसाधने होण्यापेक्षा हे केवढे उदात्त ध्येय ! विवाहात क्षुद्र सुखाला थोडीफार जागा द्या वाटली तर परंतु ते शारीरिक सुख विवाहाचे ध्येय करू नका. या चिखलांत सदैव, रुतून बसू नका. या चिखलांतून ध्येयाची कमळे वर येऊ दे. ती ध्येयकमळे घेऊन पतिपत्नींनी परमेश्वराची पूजा करावी. पतिपत्नींनी एकरूप होणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. एकरूप होऊन सुखदु:ख भोगा, एकरूप होऊन ध्येयपूजा करा. असे झाले म्हणजे मुलेही त्यांच्या पाठोपाठ येतील. आईबाप ध्येयाची पूजा अविरोधाने करीत आहेत, हे नित्य दिसून आल्यामुळे मुलेही ध्येयपूजक होतात. हरिश्चंद्र व तारामती यांच्या पाठोपाठ बाळ रोहिदास निघतो. विवाहाला उन्नत करणे म्हणजे वीरपुरुषाचे ब्रम्हचर्य होय. वीरपुरुषांच्या ब्रम्हचर्यात दुसर्याचे कल्याण चिंतलेले असते. खर्या ब्रम्हचर्यात पत्नीच्या शिक्षणाचाही अंतर्भाव होतो. केवळ पत्नीपासून दूर राहणे म्हणजे पतीचे ब्रम्हचर्य नव्हे. त्याने पत्नीचा विकास केला पाहिजे. त्या उभयतांचे ब्रम्हचर्य उभयतांच्या उत्कर्षाला कारणीभूत झाले पाहिजे. पतिपत्नींनी परस्परांपासून दूर राहणे एवढ्याने खरी विशुध्दता येत नाही. खरी विशुध्दता ही विचारात, ज्ञानात व अनुभवाच्या एकीकरणात फलद्रूप होत असते. ज्ञानेशिवाय खरी विशुध्दता, खरे पावित्र्य नाही. अशा रीतीने संन्यासिनीच्या ब्रम्हचर्याप्रमाणे पत्नीही ब्रम्हचरिणी होईल.
तपस्येच्या जीवनात उत्साह व प्रकाश उत्तरोत्तर वाढतच असतात. सरस्वतीच्या भक्ताला सर्व काही सोपे व सहज-सुलभ वाटते. तो सुखविलासाला लाथाडतो. त्याच्या जीवनात प्रत्येक क्षणागणिक अमूर्त मूर्तावर विजय मिळवीत असते, चैतन्य जडावर विजय मिळवीत असते, आत्मा देहावर विजय मिळवीत असतो. त्याचे ध्येय प्रज्वलित ज्वालेप्रमाणे सारखे वर वर जात असते, चढत असते. प्रत्येक गिरकी ज्वालेला आणखीनच वर नेते, त्याप्रमाणे त्या पुरुषाचे प्रत्येक पाऊल त्याला वर चढवीत असते. जसजसे वर जावे, तो तो निराळी सृष्टी त्याला दिसते व तो आणखी वर जातो. याप्रमाणे विकास अखंड चाललेला असतो. पतिपत्नींच्या संयममय जीवनात असाच आनंद वाढत जातो. पत्नी पतीच्या ध्येयात समरस होते. पतिसेवा म्हणजे पतीच्या ध्येयाची सेवा, पतिपूजा म्हणजे त्याच्या ध्येयाची पूजा. पतीची ध्येये हीच तिची बाळे होतात. त्यांना ती खेळवते, मांडीवर घेते, सांभाळते, वाढवते. तिला दुसर्या मुलाबाळांची मग इच्छा राहात नाही. ह्या ध्येयबाळांना ती सर्वस्व देते. एखादे वेळेस पती जर ह्या ध्येयबाळांवर रागावून त्यांना फेकून देऊ लागला, त्यांना मारून टाकू लागला, तर ती त्या बाळांना आपल्या पदराखाली घेते, त्यांना आपल्या पाठीशी लपविते व पतीचा क्रोध आपणावर ओढवून घेऊन तो शांत करते. पतीचा खचलेला उत्साह, त्याला ती पाणी घालून वाढविते, त्याच्या अस्तास जाणार्या आशेला पल्लवित करते आणि अशा रीतीने धीर देऊन त्याला पुन्हा ध्येयाकडे वळविते. श्रियाळाला ऐन वेळी चांगुणेनेच धीर दिला. स्वत:च्या मुलाचे मांस खाण्यास तो कचरत होता व सत्त्व गमावण्याची वेळ आली होती. परंतु धैर्याचे मुसळ हातात घेऊन मुलाला कांडणारी चांगुणा पुढे होते व म्हणते-
नवमास वाहिला म्यां उदरांत । तुम्हां जड नव्हे चौ प्रहरांत ।। मी नऊ महिने पोटात बाळ ठेवला, तुम्हांला चार प्रहर ठेवता येणार नाही का ? तिच्या शब्दांनी श्रियाळाला नवचैतन्य मिळते. तिने पतीचे ध्येयबळ मरू दिले नाही. पतीनेच ते तिला दिले होते. परंतु ते एकदा तिचे झाल्यावर ते ती मरू कसे देईल ? मुलांची जोपासना कशी करावी, हे माताच जाणतात. समाजात पुरुष ध्येये निर्माण करतात, परंतु ती मरू न देण्याचे काम स्त्रिया करीत असतात. पुरुष मिळवून जे आणतील ते नीट जपून ठेवणे, त्याला कीड लागू न देणे हेच तर स्त्रियांचे कर्तव्य. त्या पालन करणार्या आहेत, ठेव जिवेभावे सांभाळणार्या आहेत. पतीच्या ध्येयाची पूजा करून त्यालाही निजध्येयप्रवण करणारी, ध्येयापासून च्युत होऊ न देणारी, पतीला धीर देणारी पत्नी ही त्याची जणू सांभाळ करणारी माताच होते. उभयतांनी ध्येयाचा कितपत साक्षात्कार करून घेतला, यावरूनच ती उभयतांचे यश कीर्तिमान मापीत असते. दोघांचे पतन वा दोघांचा उध्दार. सावित्री म्हणते, “पतीशिवाय मला मोक्षही नको, मग स्वर्गाचे तर बोलूच नका.” मिळेल ते दोघांचे. त्यात उभय वाटेकरी. अशा रीतीने दोघे यात्रा करीत जातात. जे जे मार्गात भेटेल व दिसेल ते ते “हे नव्हे. हे नव्हे. आपले ध्येय यांच्यापलीकडे आहे. यांच्यापुढे आहे. नेति नेति” अशा रीतीने डावलीत परस्परांस जागवीत हे ध्येयपूजक दांपत्य जात असते. स्वत:चे शारीरिक सुख त्यांना वमनवत् वाटू लागते व ती श्रेष्ठ सुखाचा शोध करीत जातात.