जबाबदारी 2
नागरिकांच्या जीवनात कोणकोणत्या गोष्टी येतात, हे जर आपण तपासावयास लागलो तर भिन्न भिन्न वृत्तीचे लोक भिन्न भिन्न गुणांवर व गोष्टींवर जोर देतील. शिष्टाचार, चांगली चालचलणूक, सभ्यता यांना नागरजीवनात महत्त्वाचे स्थान आहे. आपण आपल्याच ओळखीच्या लोकांच्या व आप्तेष्टांच्या सहवासात असताना या गोष्टीत जे काही महत्त्व असते, त्यापेक्षा शतपटीने अधिक महत्त्व शहरात- जेथे हिंदुस्थानातील प्रत्येक भागांतून आलेल्या लोकांचा समुदाय बनलेला असतो तेथे आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. जेथे नाना ठिकाणचे, नाना जातीचे, नाना पंथाचे लोक असतात तेथे सभ्य रीतिरिवाज फारच कसोशीने पाळणे अगत्याचे आहे. सामुदायिक जीवनात, सामाजिक व्यवहारात सभ्य चालचलणुकीस कमी लेखून चालणार नाही. गाडीच्या चाकाला जसे तेलाचे ओंगण, त्याप्रमाणे समाजाच्या गाड्याला सभ्य चालचलणुकीचे, गोड शिष्टाचाराचे ओंगण अवश्य असते. अशानेच गाडी नीट चालेल, नाही तर खटाखट व कुरकुरी सुरू होतील. बरे बोलावयास, बरे चालावयास, बरे बघावयास, बरे हसावयास कोणाचे काही खर्च होते, असे थोडेच आहे ! परंतु ह्या दिसावयास क्षुद्र गोष्टी जरी असल्या तरी त्यांचे परिणाम फार चांगले होतात. जबान मिठास असणे ही गोष्ट फार जरूरीची आहे. या जिभेने, गोड जिभेने जगमित्र होता येते. आणि आपल्या या सभ्यतेच्या पाठीमागे, गोड बघण व गोड बोलणे यांच्या पाठीमागे सुकुमार व कोमल अशा सामाजिक भावनाही जर असतील तर तीच सभ्यता दंभ न राहता सत्यरूप होईल. अशी ही हार्दिक सभ्यता- देखल्या देवा दंडवत नव्हे, वरवरची हस्तिदंती नव्हे- मानवजातीला मिळालेला बहुमोल देणगी होय. आपण बाहेर वागतानाच सभ्यता पाळावी असे नाही, तर घरातसुध्दा ती पाळावी. आपली आई, आपले भाऊ, आपल्या बहिणी, आपली भार्या ही आपली झाली म्हणून काय झाले? त्यांच्याशी का आदराने वागावयास नको ? मर्यादेने वागावयास नको? मी लोकांशी बाहेर चांगले वागावे आणि माझ्याच घरातील माझ्याजवळच्या प्रिय माणसांशी मी पशूसारखे करावे, त्यांच्याशी तुसडेपणाने व तिरस्काराने वागावे, हे बरे आहे का, भले दिसते का? जे माझ्या ओळखीचेही नाहीत, ज्यांचे माझे ना सोहेरसुतक, त्यांच्याजवळ मात्र सुष्टात्मा आणि घरात मात्र मी दुष्टात्मा बनावे का ? बाहेरच्याजवळ साळसूद, घरात मात्र भूत, असे वागावे का ?
दुसरे काही लोक वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा, नियमितपणा या गुणांवर जोर देतील. सामुदायिक जीवनात, सार्वजनिक जीवनात वक्तशीरपणा व व्यवस्थितपणा हे गुण अत्यंत आवश्यक आहेत. ते जर नसतील तर फार गोंधळ होतो व अनेकांच्या गैरसोयी होतात. खरोखर नियमितपणा हा आपला धर्म झाला पाहिजे. सूर्य-चंद्र ठरल्या वेळी येतात, ऋतू ठरल्या वेळी येतात. नियमितपणाचा अभाव म्हणजे संयमाचा अभाव होय व संयमाचा अभाव म्हणजे सामर्थ्याचा नाश होय. आपण नियमित नसणे म्हणजे आपण आपल्या आसक्तींना व मोहांना बळी पडणे हाच त्याचा अर्थ होय. दुसर्यांची गैरसोय होऊ नये म्हणून, दुसर्याचा थोडा विचार म्हणून तरी आपण आपला आळस व इतर सुख दूर ठेवून नियमित व वक्तशीर झालेच पाहिजे.
तिसरी गोष्ट-दुसर्याजवळ वागताना सदैव विश्वासार्ह राहिजे पाहिजे. दुसर्याने आपणांवर बिनधोकपणे विसंबावे अशी आपली पत व दानत हवी. नाही तर सांगावे एखाद्याला की, टाकतो पत्र पेटीत व पत्र आपल्या कोटाच्या खिशातच महिना महिना पडून राहावे ! ‘आठ वाजता येतो म्हणून सांगावे व दहा वाजले तरी पत्ता नसावा!’ ‘या महिनाअखेर पगार होताच पैसे देतो’ म्हणून कबूल करावे, परंतु पगार होऊन तो खलास होण्याची वेळ आली तरी देण्याची आठवण मात्र होऊ नये ! ‘पुस्तक आठदिशी परत करतो’ म्हणून सांगावे. परंतु महिना महिना घरी ठेवून शेवटी ते आपणच जुन्या बाजारात नेऊन विकावे व त्या पैशांनी नाटक व सिनेमा पाहून घ्यावीत ! आपणास या लहान व क्षुद्र गोष्टी वाटतात. परंतु या बारीक गोष्टींनीच राष्ट्रीय चारित्र्य बनत असते. जो बारीकसारीक व्यवहारात विश्वासार्ह नाही, तो मोठ्या व्यवहारात तरी कसा राहील ? विश्वासभंगासारखे पाप नाही. वचनभंगासारखा दोष नाही, ह्या भरतभूमीत वचन पाळण्याचे महत्त्व सांगण्याची जरुरी पडावी का? हरिश्चंद्र व रामचंद्र यांच्या या भूमीत ‘विश्वासार्ह बना’असे उपदेशण्याची पाळी यावी का ?