त्यागवृत्ती 2
कोणतेही हाती घेतलेले कार्य हे नेहमीच आरंभापासूनच फायदेशीर होऊ लागते असे नाही. फारच थोड्या गोष्टी अथपासून इतिपर्यंत पैसे देणार्या असतात- फायदा करून देणार्या असतात. उदाहरणार्थ, समाजाच्या हिताच्या दृष्टीने शिक्षणाइतके महत्त्वाचे दुसरे काही नाही. परंतु कोणत्याही देशात जा, कुठल्याही समाजात जा, ज्ञानदानाचे काम करणारा गुरु- त्याला जेमतेम पोटापुरते वेतन मिळते. शिक्षक कसा जगता, ह्याचा लाजिरवाणा व शरमेचा इतिहास कोणाला माहीत नाही ? आज जगात कितीतरी ठिकाणी रोमन कॅथोलिक पंथाच्या धार्मिक संस्था शिक्षणाचे काम करीत आहेत. जेथे त्यांचा धर्म नाही, त्यांचा पंथ नाही, अशा देशातील शिक्षणाचा केवढा थोरला भार त्या संस्थांनी शिरावर घेतलेला आहे ! हा बोजा तो कसा घेऊ शकतात ? कारण रोमन कॅथोलिक विद्वान मनुष्य मोफत काम करावयास तयार असतो, आपल्या पंथाची इभ्रत वाढावी म्हणून विनावेतन शिक्षणाचे काम करावयास पुढे येतो. याने त्या माणसाचा व्यक्तिश: पैशाच्या रूपात फायदा होत नाही, परंतु त्याची जात, त्याचा पंथ यांचा जगात विजय होतो, यांना जगात तेज चढते, महत्त्व प्राप्त होते. त्यांच्या समाजाची प्रतिष्ठा वाढते. संस्थामधून काम करावयास येणार्यांच्या ज्ञानावर त्या संस्थांची व संस्था चालवणार्या पंथांची किर्ती अवलंबून असते; त्या काम करावयास येणार्यांच्या त्यागावर त्या संस्थांचा व पंथांचा विजय अवलंबून असतो. विद्वान व त्यागी स्त्री-पुरुष रोमन कॅथोलिक धर्मसंस्थांद्वारे शिक्षणाचे काम करावयास पुढे येतात व म्हणून रोमन कॅथोलिक पंथाला विपंथीय व विधर्मीय देशांतूनही महत्त्व प्राप्त झाले आहे. ही आजच्या शिक्षण प्रांतांतील गोष्ट झाली. परंतु कित्येक शतकांपूर्वी मध्य युरोपात इतर महत्त्वाच्या कर्मक्षेत्रांतही अशाच गोष्टी घडून आलेल्या दिसतील. इंग्लंडमध्ये फ्रायर नावाचे संन्यासी इ.स. १२२४ मध्ये युरोपमधून सेंट फ्रान्सिसने पाठविले व ते आले, त्यांच्याबद्दल जे. आर्. ग्रीन पुढीलप्रमाणे लिहितो :
“या ‘फ्रायर ’ संन्याशाचे काम इंग्लंडमध्ये दोन प्रकारचे होते. त्यांना लोकांची मने सुधारावयाची होती व शरीरेही सुधारावयाची होती. शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारचे रोग, दोन्ही प्रकारची गलिच्छता व अमंगलता त्यांना दूर करावयाची होती. अंतर्बाह्य जीवन झडझडून टाकावयाचे होते. रस्ते झाडणे व मने झाडणे या दोन्ही कामांना ते लागले. लहान-लहान खेडयांतून लोकसंख्या भरपूर वाढली होती. लोकसंख्या वाढली होती त्या मानाने आरोग्याची साधने वाढली नव्हती, म्हणून फारच वाईट स्थिती होती. गावातील आरोग्याच्या सोयी तुटपुंज्या व भिकारड्या आणि सरकारचे आरोग्यासंबंधीचे कायदेही अपुरे व बेताबाताचेच होते. यामुळे जिकडे तिकडे सांदीकोपर्यात, गल्ल्याकुच्यांत नाना प्रकारच्या रोगांचा नुसता बुजबुजाट झाला होता. ताप, प्लेग हे तर होतेच; परंतु त्यांहूनही भयंकर असा महारोग तोही भरपूर होता. साधू फ्रान्सिसने आपल्या शिष्यांना या रोगपीडित दुर्गंधिमय भागांकडे आधी बोट करून ‘तिकडे जा’ असे सांगितले व आज्ञेप्रमाणे ते तेथे आले. या फ्रायर संन्याशांनी या गलिच्छ रोगव्याप्त ठिकाणी वसती केली, या रुग्णशीर्ण लोकांच्या शेजारी आपल्या झोपड्या उभारल्या. प्रथम त्यांनी महारोग्यांची शुश्रूषा करण्याचे काम अंगावर घेतले. त्यांच्यातच राहणे त्यांनी पसंत केले; त्यांच्यात ते नांदू लागले. लंडन शहरातील कसाईखाने वगैरे ज्या बाजूला असत व जेथे फार घाण होई तेथेही त्यांच्यातील काही गेले व तेथे वसती करून आरोग्य व स्वच्छता तेथे प्रकाशवू लागले; काही ऑक्सफर्डच्या जवळ ज्या दलदली होत्या व डासांचे मारक, अमर संगीत जेथे सतत सुरू असे, तेथे जाऊन राहिले व त्यांनी तेथे सेवाश्रम काढिले; दलदली बुजवल्या; आजूबाजूच्या गोरगरिबांच्या चंद्रमौळी झोपड्याप्रमाणेच साध्या पर्णकुटी त्यांनी उभारल्या व त्यातच ते राहू लागले.”