विवेक 2
श्रीरामकृष्ण सांगत असत, “काहीही करून वस्तूंचे खरे स्वरूप ओळखण्यास शिका. त्यालाच विवेक म्हणतात. ह्या विवेकाच्या साधनानेच जगातून मार्ग काढता येईल.” वस्तूंचे खरे अंतरंग ओळखणे, वस्तूची खरी किंमत ओळखणे, हे शब्द फार मोलाचे व महत्त्वाचे आहेत; हे शब्द आपण कधीही विसरता कामा नये, मनुष्याजवळ सारासारविवेक, सदसद्विवेक असला पाहिजे. आमचे वर्तन कसेही असले म्हणून जगाचे काय जाते, असे धर्मशील माणसाने तर कधीच म्हणता कामा नये. धर्म म्हणजे ‘स्नानसंध्या करणे’ एवढाच अर्थ नाही. धर्म फक्त देवघरातच असतो, तपस्या देवघरातच करावयाची असते, असे नाही. तुमच्या तुमच्या मर्यादित कार्यक्षेत्रात, तुमच्या तुमच्या मर्यादित जगात जो जो मोठा विचार तुम्हाला सुचेल ते ते ईश्वराचे स्वरूप समजून, त्या विचाराच्या द्वारा ईश्वरच आपणास हाक मारीत आहे असे समजून, त्या विचाराची तुम्ही पूजा करा. जो जो थोर विचार तुम्हाला दिसतो व सुचतो, त्या विचाराच्या विरूध्द जाणार का त्या विचाराची बाजू घेणार ? त्या विचाराला अव्हेरणार का त्याची पूजा करणार ? त्या विचाराच्या पाठोपाठ जाणार का त्या विचाराला पराङमुख होणार ? तुम्ही उत्तर काहीही द्या. त्या तुमच्या होकारार्थी व नकारार्थी उत्तराने सत्याची किंवा ईश्वराची किंमत कमी होणार नाही किंवा वाढणार नाही. परंतु स्वत:च्या मात्र अध:पाताचा किंवा उध्दाराचा तो क्षण असतो यात मात्र शंका नाही. त्या उत्तरावर, तो जो निकाल आपण देऊ त्यावर, आपले स्वर्ग-नरक अवलंबून आहेत; जग बरे दिसावे की बुरे दिसावे ते अवलंबून आहे; जगाचे मंगल व अमंगल अवलंबून आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक कर्म, प्रत्येक प्रश्न आपणाजवळ ‘हे का ते ?’ याचे उत्तर मागत असतात. पदोपदी आपणास ‘हे का ते ?’ याचा निकाल द्यावा लागत असतो आणि जो निकाल आपण देत असतो त्यावर आपण व आपली सृष्टी यांचे पतन वा उत्थान ही अवलंबून असतात. सारे जीवन म्हणजे कसोटी आहे. या जीवनात पदोपदी सत्त्वपरीक्षा आहे. प्रत्येक लहानसहान गोष्टीवर सारे चारित्र्य अवलंबून आहे. कोणत्याही लहान किंवा मोठ्या गोष्टीचा स्वीकार किंवा तिरस्कार करताना आपले शील, आपले चारित्र्य यांना डोळ्यांआड करता कामा नये. मनोबुध्दीवर शीलाचे दडपण घालून मग काय करावयाचे ते केले पाहिजे. केलेल्या प्रत्येक कृत्याने आपले बळ वाढते तरी किंवा घटते तरी. काही तरी एक होणारच. केले तसे घेतले, पेरले तसे पिकले. आपल्या पात्रतेत आपण भर तरी घालतो, किंवा ती कमी करून घेतो. आध्यात्मिकता म्हणजे एकदम कोठून तरी आकाशातून पडणारी चीज नाही. ती एकाएकी अनायासे मिळत नाही. आपल्या अनंत सत्कृत्यातील तिळतिळ पवित्रता एकत्रित होऊन आध्यात्मिकतेची दिव्य मूर्ती बनत असते. पाथरवटान छिन्नीने कानेकोपरे फोडून साफ केलेल्या निर्मळ व स्वच्छ पाषाणांनी बांधलेले अत्यंत काळजीपूर्वक उभारलेले जे मंदिर असेल त्या मंदिरातच मंगल महादेवाची मूर्ती अधिष्ठित होते, तेथेच विश्वव्यापक सनातन सत्यनारायणाची मूर्ती शोभू लागेल. सर्व वस्तूंमध्ये जो सत्य शोधतो, वस्तुमात्रामध्ये जो सारभूत काय आहे हे पाहतो व ते घेतो त्याच्याच अंतरंगात सत्याचा न विझणारा व बुझणारा दीप तेवू लागतो. जीवनाच्या प्रत्येक कर्मात जो विवेक दाखविल, सारे जीवन म्हणजे सत्याची प्रयोगशाळा जो मानील व विवेकाच्या साधनाने त्याचे संशोधन चालवील, त्या माणसाचा विवेक विकसित होत जाईल व एक दिवस त्या विवेकाचे मुक्तीत परिणमन होईल. परिपक्व झालेला, पूर्ण विकास पावलेला विवेक म्हणजे मोक्षच होय.