लिंबोळ्या
एकटा एकटा अगदी एकटा
अज्ञात बेटात अज्ञातवासात
दिवस कंठीत दिवस मोजीत
आहे मी दुर्भागी अगदी अभागी
घरदार दूर आईबाप दूर
मुलेबाळे दूर माय त्यांची दूर
इथे मी एकटा अगदि एकटा !
अशाच तंद्रीत अशाच भ्रांतीत
घरच्या स्मृतीत होऊनिया रत
बसलो होतो मी ’जीवन-आश्रमी’
एका सायंकाळी लिंबतरुखाली !
आकाशी मोठाले ढग काळे काळे
ढग वळवाचे मृग पावसाचे
अचानक आले खाली कोसळले
आले तसे गेले पुन्हा लख्ख झाले !
लिंब झाला चिंब भिजलो मी चिंब
जरी माझ्यावर होते त्याचे छत्र
कितीतरी वेळ मृगाचा हा खेळ
उभा मी पाहत परी शून्य चित्त !
मधून मधून अंग हालवून
जलबिंदूसर माझ्या शिरावर
सोडी ओघळून मजेत तो लिंब !
आणिक आपल्या पिकल्या लिंबोळ्या
टाकून दे खाली टपटप खाली
मजेत तो लिंब !
हातात घेतली एक मी लिंबोळी
वाटले चोखोनी चव तिची घ्यावी
कडवट गोड करावया तोंड !
परी न चाखिली टाकून ती दिली
माझा प्रौढपणा तसे करु दे ना
आणि माझे मन पंख पसरुन
भूतकाळामध्ये बाळपणामध्ये
गेले ते उडून मजला घेऊन !
माझ्या वाडीतील छोटी ती पडळ
पुढे रुंद ओटा शेजारीच गोठा
विहीरीजवळ थोराड तो लिंब !
ज्येष्ठ सुरु झाला मृगपावसाचा
आणि पावशाचा ’पेर्ताऽहो पेर्ताऽहो’
टाहो फोडण्याचा
पिकल्या लिंबोळ्या खाली गळण्याचा !
भाऊ नी बहिणी मित्र नी मैत्रिणी
मिळुनी सगळे वेचल्या लिंबोळ्या
होते ते ’हापूस’ किंवा ’राजहंस’
पिवळे धमक आंबे नामवंत
आणि पडवीत तृण पसरुन
आम्ही त्या आंब्यांच्या लावियेल्या आढया
आंबराई होती पाडला लागली
घरामधी होत्या आढया लागलेल्या
पण त्या आढयांची पाडाच्या आंब्यांची
शुद्धही नव्हती गोडीही नव्हती !
आम्ही आढीतल्या शेलक्या पिवळ्या
काढिल्या लिंबोळ्या भरल्या टोपल्या
आणि ओटीवर मांडिला बाजार
खरेदीविक्रीचा झाला व्यवहार
चिंचोक्यांचा गल्ला केला मग गोळा
रुपये आण्यांचा हिशोब तो साचा !
कमाई पाहून गेलो हरखून
मग सगळ्यांनी मिळून चाखिल्या
पिवळ्या लिंबोळ्या !
आणिक म्हणालो, ’काय आंबे गोड !’
पुन्हा परतून आले माझे मन
आणि लिंबाखाली नव्हते ते आंबे
लिंबोळ्यांचा खच घ्यावया वेचून
पुन्हा तो संकोच !
मग मी बाळांना माझ्या सोनुल्यांना
मनच्या मनात घातलीसे साद
होती ती पुण्यात आपुल्या घरात
हासत खेळत नाचत डोलत !
’यारे इंदू, सिंधू शाम आणि नंदू
ये ग बाळ मंदा तान्हुल्या आनंदा !’
माझ्या भोवताली नाचा थयथय !
मोठयाने मोठयाने आरडा ओरडा
येथला एकांत भयाण एकांत
पिटूनिया टाळ्या पिटाळून टाका !
घ्यारे वेचूनिया येथल्या लिंबोळ्या
आंबे समजून सारे खा चोखून
मिटक्या मारुन म्हणा, ’हे हपूस
किती गोड गोड !’
हातात माझिया देऊन लिंबोळ्या
करा ना एकदा खाण्याचा आग्रह
होऊ द्या एकदा मुलामध्ये मूल
तुम्हा छोटयांमध्ये एक मोठे मूल !
माझिया वंशाचे माझिया रक्ताचे
माझिया बाल्याचे माझिया भावांचे
तुम्हा आहा अंश !
तुमच्यात माझा तुमचा माझ्यात
भरलेला आहे माझ्या ममत्वाचा
काही एक अंश !
गेलेल्या वाल्याचा गेलेल्या काळाचा
उगीच का शोक ?
गेलेच जे नाही हरपले नाही
अशा त्या श्रेयाचा उगीच का शोक ?
कल्पने, आवर आपली पाखर
पुन्हा वास्तवात चित्त आहे येत
अरेरे ! पुन्हा मी उरलो एकटा
अगदी एकटा
एका सायंकाळी लिंबतरुखाली !
डोळ्यांतून माझ्या गळून पडल्या
अश्रूंच्या लिंबोळ्या !
सहानुभूतीने आणि त्या लिंबाने
वरुन गाळिल्या आपल्या लिंबोळ्या !