स्वप्न !
"मी स्वप्न असे देखिले सये मैत्रिणी
की आपण गेलो एका बागेमधि दोघीजणी
वेलींच्या मांडीवरी झोपल्या कळ्या
उघडून पाकळ्या त्यांना करि बालरवी गुदगुल्या !
गुजगोष्टि कुणा, तर जो जो गाई कुणा
तो झुळझुळ मंजुळ वारा हालवी डोलवी कुणा !
गोजिर्या फुलांचे खेळगडी गोजिरे
कशि गुंगत होती बाई बहुरंगी फुलपाखरे !
या लीला देखुनि मति माझी हर्षली
जणु ’जिवती’ लेकुरवाळी, फुलबाग मला भासली !
मज गोड भास जाहला कशाचा तरी
मी मधेच थबकुनि पाहे लागून ओढ अंतरी
जाहल्ये उताविळ-मन गेले लोभुनी
मी लालजर्द ’झेंडूचा’ घेतला गेंद तोडुनी
तान्हुल्यास जणु का घेत माय उचलुनी
तो हृदयी धरिला बाई हुंगिला चुंबचुंबुनी
चिमुकल्या झेंडुची बहीण जणु चिमुकली
ती ’मखमल’ गोजिरवाणी तू कुरवाळुनि चुंबिली
लावून नजर मी हसत बघे तुजकडे
तू वदलिस उसन्या रागे, ’ही कसली थट्टा गडे !’
स्वप्नात कोणत्या गुंग मती जाहली !
दोघींना ऐकू आल्या कसल्या ग गोड चाहुली !"