प्रचीति
इथून पश्चिमेकडे भरारि घे मनोविहंग
तिथेच दंग होत तो, नका करु समाधि-भंग !
म्हणाल दृश्य कोणते
तयास भूल पाडिते
समोर पाहिलेत का विशाल विश्व नीलरंग !
अथांग सिंधु होत हा निळया नभात एकरुप
परेश याच दर्पणी बघे स्वरुप विश्वरुप
विलीन जीव हो शिवात
उमा जशी सदाशिवात
अशी प्रचीति येउनी अमूप ये मना हुरुप
लुटून घेति लोचने प्रसन्न नीलिमा प्रशांत
गमे शरीर न्हाउनी बने तजेल नीलकान्त !
किती पहा पुढे पुढे
किती पहा पलीकडे
असीम जे, अगाध जे, कुठून ते असेल सान्त ?
मऊ नि आर्द्र सैकती उभा न मीच दीर्घकाल
उभ्या सदाच नारळी, सदा उभेच उंच ताल !
बुडी हळूच घे जळी
कसा रवी, कसा शशी !
सहर्ष हे न्यहाळिती अशी सुरम्य हालचाल !
जिथे नभात मीनला समुद्र त्या कडेवरुन
धरुन ओळ चालली सलील तारचे दुरुन !
सरोवरात राजहंस
सफेत हालवून पंख
मजेत पोहती जणू, हरेचि भान हे बघून !
कुठून चालली कुठे ? मनास होत गूढ भास
त्यजून या जगा सुरु नव्या जगाकडे प्रवास
बघा शिडेच पांढरी
अदृश्य नाखवे परी
बसून तारवात त्या अधीर मी फिरावयास !
अलीकडील बंदरा कशास खुंटवून नाव
मुशाफिरा विरामसी, तुझे पलीकडेच गाव
हळू हळू पुढे पुढे
तुझेहि तारु जाउ दे
अनंत नीलिमेत त्या कधीतरी मिळेल ठाव !