खर्या संस्कृतीचा प्रारंभ 58
या अभिनव व विचित्र युध्दपध्दतीशीं कोणत्या रीतीनें लढावें, हें गांधींच्या शत्रूंना प्रथम कळेचना. त्यांनीं हिन्दी लोकांची कत्त केली, हजारोंना तुरुंगांत डांबलें, गांधींचा छळ केला. एकदां तर ते गांधींना दगडाधोंड्यांनीं ठार करणार होते. तरीहि गांधी व त्यांचे अनुयायी शांतच राहिले. त्यांनीं हातहि उगारला नाहीं. त्यांनीं अन्यायाची परतफेड क्षमेनें, अत्याचाराची परतफेड करुणेनें व व्देषाची परतफेड प्रेमानें केली. आणि गांधींचीं शस्त्रें प्रभावी ठरलीं. गांधी व त्यांचे अहिंसक सैनिक यांनीं शत्रूला लाजविलें, पराभूत केलें. जनरल स्मट्सच एक सेक्रेटरी या सत्याग्रह्यांशीं निर्दयपणें लढत होता. तो शेवटीं गांधींना म्हणाला, ''मला तुमचे लोक आवडत नाहींत. त्यांना साह्य करावेंसें मला मुळींच वाटत नाहीं. पण मी करूं काय ? आम्ही अडचणींत असतों तेव्हां तुम्ही साह्यास येतां ! मग तुमच्यावर हात कसा टाकावा ? तुम्हीं हिंसेचा अवलंब करावा असें मला कितीदां तरी वाटतें. इंग्रज संपवाले असें करतात. तुम्हीहि हिंसक बनाल, तर तुमचा प्रश्न कसा मिटवावा हें आम्हांस माहीत आहे. पण तुम्ही तर शत्रूलाहि अपाय करीत नाहीं, आत्मक्लेशानेंच विजय मिळवूं इच्छितां. स्वेच्छेनें घालून घेतलेल्या सुजनतेच्या व उदारतेच्या मर्यादा तुम्ही कधीं उल्लंघीत नाहीं, त्यामुळें आम्ही केवळ अगतिक व किंकर्तव्यमूढ होऊन गेलों आहों.''
शांतिमय अहिंसक प्रतिकारानें हिंसेवर पूर्ण विजय मिळविता. जनरल स्मट्स् गांधींना शरण आला. १८१४ सालीं दक्षिण आफ्रिकेंतील हिंदी लोक मुक्त झाले.
- ६ -
१९१९ सालीं गांधींनीं दक्षिण आफ्रिकेंत यशस्वी झालेला हा दिव्य प्रयोग हिंदुस्थानांत सुरू केला. या वेळीं तीस कोटी लोकांचें संबंध राष्ट्र त्यांनीं अहिंसक झगड्यासाठीं उभें केलें. स्त्रिया, पुरुष, मुलें, सर्वच अहिंसक बंडासाठीं उठलीं. १९१४ सालच्या महायुध्दांत हिंदुस्थाननें नऊ लक्ष पंचाऐंशीं हजार सैनिक दिले, या राजनिष्ठेचें बक्षीस म्हणून स्वराज्य देण्याचें इंग्रजांनीं दिलेलें अभिवचन युध्द संपतांच ते विसरले व हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याऐवजीं त्याचें असलेलें पारतंत्र्यच त्यांनीं अधिक दृढ केलें, त्यामुळें हिंदुस्थान संतापला. १९१९ सालच्या फेब्रुवारीच्या अठ्ठाविसाव्या तारखेस सात्त्वि संतापाचा अहिंसक संग्राम सुरू झाला. प्रिन्स ऑफ वॉल्स हिंदुस्थानला भेट देण्यास आले. पण ते कलकत्त्यांत आले तर सारे रस्ते निर्जन होते ! जिकडे तिकडे शुकशुकाट ! त्यांच्या स्वागतासाठीं एकहि मनुष्य बाहेर आला नाहीं.
देशभर सार्वत्रिक धरपकड झाली. पंचवीस हजार स्त्री-पुरुषांची तुरुंगांत रवानगी करण्यांत आली ! ते तुरुंगांत जाताना आनंदानें गाणीं गात होते. शेवटीं बांधींनाहि अटक झाली. ''ब्रिटिश सरकारविरुध्द बंड पुकारून मीं जाणूनबुजून उघडपणें कायदा मोडला आहे'', असें गांधींनीं कबूल केलें. खटल्याच्या वेळीं ब्रूम्स्फील्ड हे न्यायाधीश होते. गांधी म्हणाले, ''मी दयेची याचना करीत नाहीं, केलेलीं कर्मे सौम्यहि करून दाखवूं इच्छीत नाहीं. मीं कायद्याप्रमाणें जाणूनबुजून गुन्हा केला आहे. पण नागरिक या नात्यानें तसें करणें हें माझें परमोच्च कर्तव्यच होतें. म्हणून देतां येईल ती जास्तींत जास्त शिक्षा मला द्या, ती मी आनंदानें स्वीकारीन व भोगीन. न्यायाधीशमहाराज, तुमच्यासमोर दोनच मार्ग आहेत : न्यायाधीशाची जागा तरी सोडा, नाहीं तर मला कठोरतम शिक्षा तरी फर्मावा.''