मानवजातीचें बाल्य 51
पेरिक्लिसनें हें सारें पाहिलें. लोकप्रियता मिळविण्याच्या युक्त्या त्यानें ओळखल्या. तोहि तसेंच करूं लागला. अत्यंत विपन्न व निराधार लोकांना तो पैशांच्या देणग्या पाठवूं लागला. लोकसभेला जे हजर रहातील त्यांनाहि तो पैसे देई. राज्यकारभारांत जे प्रत्यक्ष भाग घेतील त्यांनाहि तो बक्षिशी देई. लोकप्रियतेचा कांटा लवकरच पेरिक्लिसच्या बाजूला झुकला आणि जवळजवळ चाळीस वर्षेपर्यंत—मरेपर्यंत—त्यानें लोकांवरील आपलें प्रभुत्व व वजन राखलें.
पेरिक्लिसशीं कसें वागावें तें त्याच्या विरोधेकांस समजत नसे. प्रक्षुब्ध अशा वादविवादाच्या प्रसंगीं सारे हमरीतुमरीवर आले असतांहि तो मनाचा तोल सांभाळू शके, विनोदी वृत्ति राखूं शके. तो कधीं प्रक्षुब्ध होत नसे. स्वत:च्या मनावर त्याचा अपूर्व ताबा होता. प्ल्युटार्कनें पेरिक्लिसविषयींचीं एक आख्यायिका दिली आहे. त्या आख्यायिकेनें पेरिक्लिसच्या स्वभावावर चांगलाच प्रकाश पडतो. एकदां तो मुख्य बाजारपेठेंतून—फोरममधून—जात होता. रस्त्यांत विरुध्द पक्षाचा एक राजकारणी पुरुष त्याला भेटला. तो पेरिक्लिसला भरबाजारांत शिव्या देऊं लागला. पेरिक्लिसनें त्याला उत्तर दिलें नाहीं. उत्तर देणें त्याला कमीपणाचें वाटलें. पुढें न जातां तो परत माघारा वळला, घरीं जायला निघाला. परंतु तो शिवराळ प्रतिपक्षी त्याच्या पाठोपाठ शिव्यांची लाखोली देत येतच होता. अत्यंत कटु व नीच अशी ती वाग्बाणवृष्टि होती. घरीं पोंचेपर्यंत पेरिक्लीस शांत होता. जणूं त्या शिव्यांकडे त्याचें लक्षच नव्हते ! घरीं पोचला तों बाहेर चांगलाच अंधार पडला. पेरिक्लीस आपल्या गुलामाला म्हणाला, ''मशाल पेटवून त्या सद्गृहस्थांना घरीं पोंचव. बाहेर अंधार आहे.''
खासगी आचरणांत पेरिक्लीस जरा अहंमन्य होता, जरा शिष्ट व फाजील प्रतिष्ठित होता. तो फारसें कधीं कोणाचें आमंत्रण स्वीकारीत नसे. क्वचित् प्रसंगींच तो सार्वजनिक सभासंमेलनांस, मेजवान्यांस उपस्थित राही. आपल्या आप्तष्टांच्या घरींहि तो क्वचितच जाई. त्याच्या स्वभावांत अशी ही दूर रहाण्याची वृत्ति होती. परंतु ही उणीव भरून काढण्यासाठींच कीं काय तो हाताचा उदार होता. त्याची पिशवी दुसर्यासाठीं सदैव मोकळी असे. नागरिकांचें जीवन अधिक सुखमय व्हावें म्हणून सार्वजनिक फंडांना तो सढळ हातानें वर्गणी देई. नागरिकांचें जीवन म्हणजे जणूं त्याचें खेळणें ! तो त्यांच्यासाठीं प्रदर्शनें भरवी, खाने देई, कवायती व खेळ करवी. जगांतील उत्तमोत्तम कलावंतांना तो अथेन्सला बोलावी आणि अथीनियम जनतेला कलात्मक आनंद देई. सर्व प्रकारच्या खेळांना व कसरतींना त्यानें उत्तेजन दिलें. त्यानें सार्या ग्रीस देशाचें जणूं अखंड क्रीडांगण केलें. त्यामुळें लोकांची भरपूर करमणूक होई, सर्वांना मजा वाटे.
उधळपणाचा आरोप त्याचे शत्रू त्याच्यावर करीत. लष्करी सामर्थ्य वाढावें म्हणून योग्य खर्च न करतां हा या खेळांवर व कलांवरच भरमसाट खर्च करीत बसतो असें ते म्हणत. विरोधी पक्षाचे लोक म्हणत, ''आमची ही अथेन्स नगरी अलंकारांनीं व सुंदर वस्त्रांनीं नटलेल्या एकाद्या स्त्रीप्रमाणें दिसावी हें आम्हांला लज्जास्पद आहे. आमच्या आत्म्याचा, आमच्या शौर्याचा हा अपमान आहे.''