मध्ययुगांतील रानटीपणा 28
चौदाव्या शतकाच्या मध्याला उच्चारलेले हे क्रान्तिकारक शब्द जणूं काय मार्क्सचे, एंजल्सचे किंवा यूजेनडेब्सचेच आहेत असें वाटतें. जॉन बॉल जें सांगत होता तें लोकांना, विशेषत: वरिष्ठ वर्गांतल्या लोकांना, जरी विचित्र वाटे, तरी त्यांत खरोखर विचित्र असें कांहीच नव्हतें. ख्रिस्ताची शिकवणच तो जणूं पुन: नव्यानें सांगत होता. पण ती खरी ख्रिस्ताची शिकवणं ऐकून कँटरबरीचा आर्चबिशप दांतओठ खाऊं लागला. तो अत्यंत संतप्त झाला. युरोपांतील एकतृतीयांश जमीन चर्चच्या मालकीची होती. जॉन बॉल ख्रिस्ताची शिकवण शिकवूं लागल्यापासून पांच वर्षांनीं म्हणजे इ.स. १३६६ मध्यें त्याला धर्मबाह्य ठरविण्यांत आलें. त्याचें प्रवचन वा व्याख्यान कोणाहि इंग्रजानें ऐकूं नये असें फर्मान काढलें गेलें. पण त्या वटहुकुमामुळें जॉन बॉल डरला नाहीं; शेतकरीहि घाबरले नाहींत. त्यानें आणखी पंधरा वर्षे आपली चळवळ सुरुच ठेवलीं. शेवटीं १३८१ मध्यें त्याला अटक करून मेडस्टन येथील तुरुंगांत ठेवण्यांत आलें. पण या वेळपर्यंत शेतकरी चांगलेच उठले होते. ते चांगलेच जागृत झाले होते. त्यांनीं तुरुंग फोडला व आपल्या पुढार्यास वांचविलें. जॉन बॉलनें पुन: आपलें काम सुरू केलें. तो पुन: गिरफदार केला गेला. १३८१ च्या जुलैच्या पंधराव्या तारखेस बड्या सरदारवर्गाच्या लोकांसमक्ष त्याला फांशी देण्यांत आलें. त्याची ती शिक्षा पाहण्यास दुसरा रिचर्ड राजाहि हजर होता.
शेतकरी व कामकरी यांचेंबंड तात्पुरतें शमलें; पण पुढें तें फ्रान्समध्यें, जर्मनींत, बोहेमियांत तसेंच रशियांतहि पेटलें. हें पुस्तक लिहिण्यांत येत असता तें चीनमध्येंहि पेटत आहे. जॉन बॉलचें बंड म्हणजे मानवजातीच्या इतिहासांतला एक नवीनच म्हणजे नवयुगाचा, नवक्रान्तीचा प्रारंभ होता. तो श्रमजीवी व कामगार वर्गांच्या पुरस्काराच्या युगाचा प्रारंभ होता. ऐतिहासिक चळवळीचीं बीजें रुजण्यास, वाढण्यास व फोंफावण्यास बराच काळ लागतो. जॉन बॉल यानें पेरलेलीं बीजें आज विसाव्या शतकांत मूळ धरूं लागलीं आहेत असें दिसत आहे. मानवजात संस्कृतीच्या मार्गावर एक पाऊल टाकायला कधीं कधीं कित्येक शतकें घेते. चौदाव्या शतकापासून एक नवीनच शक्ति जगांत प्रादुर्भूत झाली. पददलित लोकांना स्वत:च्या शक्तिचा साक्षात्कार झाला. स्वत:च्या हक्कांच्या रक्षणार्थ व समर्थनार्थ ते आपली शक्ति दाखवूं लागले. या श्रमजीवी वर्गाला जागें होण्यास शेंकडों वर्षे लागलीं, तशींच आतां शक्तिसंपन्न व्हावयाला आणखी कित्येक शतकें लागतील. पण भविष्यराज्य निश्चितपणें त्याचें आहे. त्याचा भाग्याचा दिवस निश्चितपणें जवळ येत आहे. मानवी मनाची जागृति, मानवी आत्म्याचें मुक्त होणें, अशा अर्थाचें जें हें नवयुग उजाडलें तें इतिहासांतलें सर्वांत मोठें युग होय, इतिहासांतील चळवळींत ही अत्यंत महत्त्वाची चळवळ होय. या नवयुगाचा आरंभ चौदाव्या शतकांत झाला. तें नवयुग आज पांचशें वर्षे होऊन गेलीं तरी अद्यापि बाल्यावस्थेंत आहे. ज्या वेळेस मानवकुटुंबांतील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधि लाभेल, ज्या वेळेस पक्षपात नाहींसा होईल, जेव्हां आवडता-नावडता हा भेद निघून जाईल, जेव्हां या धनधान्यसंपन्न वसुंधरेचीं फळें सर्वांना नीटपणें मिळतील व सर्वांना सुखी, सुंदर व निरामय जीवन कंठितां येईल, तेव्हांच हें नवयुग विजयी, कृतार्थ झालें असें म्हणता येईल. जेव्हां युध्दें, अज्ञान, जुलूम, असहिष्णुता, द्वेष व मत्सर पृथ्वीवरून निघून जातील तेव्हांच नवयुगाची संपूर्ण कथा सांगण्याचा योग्य प्रसंग आला असें म्हणतां येईल.