मानवजातीचें बाल्य 62
आईबापांनीं आपले लैंगिक अनुभव त्या त्या ठरीव व्यक्तिपुरतेच मर्यादित ठेवावें असें नाहीं. मुलें सरकारच्या स्वाधीन केल्यावर त्यांना स्वेच्छाविलास करण्याची इच्छा असेल तर त्यांनीं खुशाल तसें करावें. परंतु त्यांनीं अशा संभोगांतून मुलें जन्माला येऊं देतां कामा नये. त्यांनीं गर्भपात करण्याची दक्षता घ्यावी. अशा रीतीनें अनिर्बंध प्रेमाची गोष्ट व्यक्तिच्या सारासारविवेकावर सोंपवून दिली आहे. या बाबतींत स्त्रियांना व पुरुषांना सारखीच मोकळीक. नागरिकांच्या खासगी जीवनांत सरकारनें लुडबूड करूं नये. आतां आपण त्या मुलांकडे वळूं या. जन्मतांच मुलांस सरकारी संगोपनगृहांत पाठवायचें. या सर्व मुलांना तीं वीस वर्षांची होईपर्यंत एकत्र शिक्षण द्यावयाचें. या प्राथमिक शिक्षणांत संगीत आणि शरीरसंवर्धक व्यायाम यांचा अन्तर्भाव व्हावा. व्यायामानें शरीर प्रमाणबध्द व सुंदर असें होईल. संगीतानें आत्म्याचें सुसंवादीपण वाढेल, मनाची प्रसन्नता वाढेल. ''ज्या माणसाच्या आत्म्यांस संगीत नाहीं, तो विश्वासार्य नाहीं.'' अशा माणसाचें मन खुरटलेलें असतें, पंगू व विकृत असतें ; अशाचे वासनाविकार असंयत असतात ; तेथें ताळ ना तंत्र ; संयम ना विवेक ; सदसतांबद्दलच्या अशा माणसाच्या कल्पना सदैव दुषित व विकृत असतात. त्याची सद्सद्विवेक शक्तिच जणूं भ्रष्ट होते. संगीत म्हणजे प्लेटोला परम ऐक्य वाटे, परम सुसंवादिता वाटे. संगीत ऐकूं येणारें असो वा ऐकूं न येणारें असो, तें बाह्य असो वा आंतरिक असो, ध्वनीचें असो वा आकाशांतील तार्यांचे असो, सर्व विश्वाच्या पाठीमागें संगीताचें परम तत्त्व आहे ; तें नसतें तर या जगाचे, या विश्वाचे, कधींच तुकडे झाले असते व जगांत साराच स्वैर गोंधळ माजला असता, सर्वत्र अव्यवस्थेचें साम्राज्य पसरलें असतें. संगीत म्हणजे विश्वाचा प्राण, विश्वाचा आत्मा. ग्रह व तारे म्हणजे विश्वाचें शरीर. हें संगीत जर या विश्वशरीरांत नसेल, संगीताचा प्राण जर या पृथ्वींत नसेल, तर ही पृथ्वी म्हणजे नि:सार वाटेल. मग पृथ्वी म्हणजे केवळ जळून गेलेला कोळसा, केवळ नि:सार राख ! स्वर्गांत व अंतरिक्षांत जर संगीत नसेल, या अनंत तार्यांत व ग्रहांत जर संगीत नसेल, तर हे तारे, हे सारे तेजोगोल, म्हणजे चिमूटभर राखच समजा.
म्हणून प्रत्येकाच्या शिक्षणांत संगीत हा महत्त्वाचा व अवश्यक भाग असला पाहिजे. मुलगा व मुलगी वीस वर्षांचीं होण्यापूर्वी त्यांना संगीताचें सम्यक शिक्षण दिलें पाहिजे. तसेंच व्यायामाचेंहि. ज्या शाळांतून हें शिक्षण द्यावयाचें त्या शाळा मुलांमुलींसाठीं अलग नकोत. एकत्रच शिक्षण असावें. मुलांमुलींनीं एकत्र काम करावें, एकत्र खेळावें. व्यायाम करतांना मुलगे व मुली यांनी कपडे काढले पाहिजेत. प्लेटो म्हणतो, 'माझ्या आदर्श राज्यांतील स्त्रियांना सद्गुणांचीं भरपूर वस्त्रें असतील.'' खोटी लज्जा करायची काय ? मूर्खपणाचें लाजणें नको. मानवी शरीर उघडें दिसलें म्हणून त्यांत लाजण्यासारखें किंवा अश्लील वाटण्यासारखें काय आहे ? तेथें असमंजसपणें हंसण्याची, थट्टामस्करी करण्याची, जरूरी नाहीं.
मुलांच्या शिक्षणांत घोकंपट्टी नको, कंटाळवाणेपणाहि नको ; केवळ पढीकपणा नको, कवेळ हमालीहि नको ; केवळ बैठेपणा व पुस्तकीपणा नको, केवळ शारीरिक श्रमहि नको. शिक्षणाचा बोजा न वाटतां तें परम आनंदप्रद वाटलें पाहिजे. शिक्षण म्हणजे आपला छळ असें मुलांमुलींना वाटतां कामा नये. योग्य अशा गुरुजनांच्या देखरेखीखालीं सर्वसाधारण मुलाला मनाची व शरीराची योग्य वाढ करून घेतां येईल, तें भरपूर खेळत व भरपूर ज्ञानानंदहि मिळवीत. शाळा म्हणजे मनोबुध्दींचा आखाडा, बौध्दिक क्रीडांगण. तेथें विचारविनिमयाचा मनोहर खेळ खेळण्यांत मुलें सुंदर स्पर्धा करतील, ज्ञानांत व विचारांत एकमेकांच्या पुढें जाण्यासाठीं पराकाष्ठा करतील, स्वत:मधील उत्कृष्टत्व प्रकट करण्यासाठीं धडपडतील.