मानवजातीचें बाल्य 5
मंत्रतंत्रांवर, जादूटोण्यांवर हा जो विश्वास होता, त्यांतून ती पहिली सौंदर्याची जाणीव जन्माला आली. परंतु पुढें लौकरच म्हणजे आणखी दहा हजार वर्षांनीं कलेसाठीं म्हणून कला तो उपासूं लागला. हिमयुगाच्या आरंभीं स्वसंरक्षणार्थ हत्यारें व साधनें त्याला शोधावीं लागलीं हें आपण पाहिलेच. पुढें जेव्हां त्याचीं संकटें कमी झालीं तेव्हां त्याला फुरसत मिळाली. आपलीं हत्यारें तो भुषवूं लागला. त्यांच्यांत सौंदर्य व सुभगता आणूं लागला. त्याच्या त्या दगडी कुर्हाडीला हातांत धरण्यासाठीं दांडा तर हवाच, परंतु तो दांडा सुंदरहि असला पाहिजे. त्या दांड्याचा आकार त्यानें हातासारखा केला ; इतकेंच नव्हे, तर त्यानें त्याला घांसून घांसून गुळगुळीत केलें. त्याच्यावर सुंदर आकृति त्यानें काढल्या. मनुष्य केवळ भाकरीनें जगत नाहीं ही गोष्ट आपल्या पूर्वजांनीं मानवी जीवनाच्या अगदीं आरंभींच जणूं ओळखली. आजचा सौंदर्योपासक मानव हा कांही नवीन प्रकार नव्हे. मी सुंदर आहें म्हणून मीं जगावें. सौंदर्यासाठीं म्हणून सौंदर्य, ही भावना पंचवीस हजार वर्षांची तरी जुनी आहे.
आपले पूर्वज दुसरी एक कला लौकरच शिकले व ती वाढवते झाले. ही कला म्हणजे युध्दाची कला. त्या वेळेस अन्न फार कमी असे. अन्नप्राप्तीचीं साधनें अपुरीं होतीं. अशा वेळेस एका जमावाला दुसर्या जमावाशीं, एका व्यक्तिला दुसर्या व्यक्तिशीं अन्नासाठीं लढावें लागे. आपलें जीवन मोठ्या मुष्किलीनें त्यांना टिकवावें लागे. तशा प्रकारच्या संहाराची वास्तविक आतां जरूर नाहीं. परंतु संहाराची लालसा मानवी हृदयांत पूर्वीइतकीच आजहि तीव्र आहे. प्रत्येक सुधारलेल्या देशांत युध्द ही अत्यंत लोकप्रिय कलांपैकीं एक कला अद्याप मानिली जात आहे.
प्राचीन इतिहासाच्या या संक्षिप्त वर्णनावरून आपणांस दिसून येईलच कीं, जे गुण वा दुर्गुण आजच्या अर्वाचीन माणसांत आहेत तेच बहुतेक सारें पंचवीस हजार वर्षांपूर्वीच्या आपल्या वानरसदृश पूर्वजांमध्येंहि होते. गुणांच्याविषयीं म्हणायचें झालें, तर त्या बाबतींत आपण कांहीं अधिक प्रगति केली आहे असें नाहीं. आणि दुर्गुणहि आपण दूर केले आहेत असें म्हणतां येणार नाहीं. मनुष्य हा होतां होईतों आपली मूर्खता टाकूं इच्छीत नसतो.