मध्ययुगांतील रानटीपणा 49
पण तो या रोजच्या करमणुकी वगैरेंतच रमणारा नव्हता. तो त्या काळचा एक अतिप्रतिभावान् व स्वप्नसृष्टींत वावरणारा महापुरुष होता. तो नवयुगांतील नवीन नगरी बांधीत होता. ही नवीन नगरी कशी बांधावी, सजवावी, उदात्त व सुंदर दिसणारी करावी याच्या योजना तो मांडी. सुरक्षितपणें जातां यावें म्हणून त्यानें निरनिराळ्या उंचीचे रस्ते तयार करविले. त्यानें एकाखालीं एक असे रस्ते केले. स्वच्छता व आरोग्य अधिक राहावीं म्हणून रस्ते रुंद असावे असें तो म्हणे. मिलन शहर सुंदर दिसावें म्हणून ठायीं ठायीं चर्चे, धबधबे, कालवे, सरोवरें व उपवनें यांची योजना तो मनांत मांडी. त्याच्या मनांत अशी एक योजना होती कीं, शहरें फार मोठीं नसावीं, पाच हजारच घरें प्रत्येक शहरांत असावीं व कोणत्याहि घरांत सहांहून अधिक माणसें नसावीं. तो म्हणे, ''माणसें फारच गर्दी करून राहतात, मग ती सुखी कशीं होणार ? एके ठिकाणीं दाटी करून शेळ्यांमेंढ्यांप्रमाणें राहणार्या या माणसांना जरा अलग अलग राहावयाला शिकविलें पाहिजे. गर्दी करून राहिल्यानें सगळीकडे घाणच घाण होते, दुर्गंधी सुटते व साथींचीं आणि मरणाचीं बीजें सर्वत्र पसरतात.''
त्यानें स्वत:चें मिलन शहर तर सुंदर केलेंच, पण भविष्यकालीन सुंदर शहराचीहि निर्दोष योजना त्यानें आंखून ठेविली. जरी तो अनेकविध कार्यांत सदैव मग्न असे, तरी तो चित्रकला व मूर्तिकला या आपल्या आवडत्या दोनच कलांस सारा वेळ देई. इ.स. १४९८ मध्यें त्यानें Last Supper हें चित्र संपविलें. त्यानें हें चित्र एका मठांतील भिंतीवर रंगविलें आहे. तो मठ सँटा मेरिया डेले ग्रॅझी येथील होता. भिंतीवरचें तें चित्र आतां जरा पुसट झालें आहे. त्याला भेगा व चिरा पडल्या आहत. लिओनार्डोनें रंगांत तेल मिसळलें. भिंतींवरील चित्रांसाठीं रंगांत तेल मिसळणें हा शोध घातक होता. या चित्रांतील रंग कांहीं ठिकाणीं निघून गेला आहे. येशू व त्याचे शिष्य यांचे चेहरे दुय्यम दर्जाच्या कलावंतांकडून पुन: सुधारून ठेवण्यांत आले आहेत. तरी त्या जीर्णशीर्ण झालेल्या चित्रामधूनहि सौंदर्याचा आत्मा अद्यापि प्रकाशत आहे. डिझाइन भौमितिक आहे, चित्राची कल्पना अव्यंग आहे, चित्रांतील बौध्दिक भावदर्शन गूढ व गंभीर आहे. मानवी बुध्दि व प्रतिभा यांची ही परमोच्च निर्मिती आहे. या चित्रांत शास्त्र व कला यांचा रमणीय संगम आहे. आणि शास्त्रकलांच्या निर्दोष व परिपूर्ण मीलनावर तत्त्वज्ञानानें घेतलेल्या चुंबनाचा ठसा उमटला आहे.
हें चित्र रंगवावयाला लिओनार्डो याला किती तरी दिवस लागले. परिपूर्णतेकडे त्याचे डोळे सारखे लागले होते. आदल्या दिवशीं झालेलें काम पुन: दुसर्या दिवशीं तो पाही आणि त्यांत सुधारणा करी. तें चित्र हळूहळू फुलत होतें. तें अत्यंत काळजीपूर्वक तयार होत होतें. चरित्रकार लोमाझ्झो लिहितो, ''चित्र काढावयाला आरंभ करतांना लिओनार्डोचें मन जणूं भीतीनें भरून जाई. ... त्याचा आत्मा कलेच्या उदात्त भव्यतेनें भरलेला असे. तो आदर्श सारखा समोर असल्यामुळें स्वत:च्या रेषांमधल्या रंगांतील चुका त्याला दिसत व चित्र नीट साधलें नाहीं असें त्याला सारखें वाटे. त्याची जीं चित्रें इतरांना अपूर्व वाटत, त्यांत त्याला दोष दिसत.'' त्याचा दुसरा एक चरित्रकार सिनॉर बॅन्डेलो लिहितो, ''पुष्कळ वेळां तो मठांत अगदीं उजाडतां उजाडतां येई. ... शिडीवर चढून तो चित्र काढीत बसे. सायंकाळीं अंधार पडेपर्यंत तो काम करीत बसे. आतां चित्र काढतां येणें शक्य नाहीं, दिसत नाहीं, असें होई तेव्हांच तो नाइलाजानें काम थांबवी. तो तहानभूक विसरून जात असे. तो तन्मय होऊन जाई. परंतु कधीं कधीं तीन तीन/चार चार दिवस तो नुसता तेथें येई व केवळ बघत बसे. तो चित्राला हातहि लावीत नसे. छातीवर स्वस्तिकाकार हात ठेवून तो भिंतीवरील आकृति पाहत उभा राही. तो त्यांतील गुणदोषच जणूं पाही.''
स्वत:च उत्कृष्ट टीकाकार व दोषज्ञ असल्यामुळें संपूर्ण अशी एकादी कलाकृति त्याच्या हातून क्वचितच पुरी होई. पण तो अविश्रांत कर्मवीर होता. थकवा तर त्याला माहीतहि नव्हता. बँडेल्लो लिहितो, ''तो किल्ल्यांत मोठ्या घोड्याचा पुतळा तयार करीत होता. तेथल्या कामावरून मोठ्या लगबगीनें भरदुपारीं येतांना मीं त्याला कधीं कधीं पाहिलें आहे. मिलनच्या रस्त्यांत दुपारच्या उन्हांत चिटपांखरुंहि नसे. डोळे दिपविणारें प्रखर ऊन तापत असे; पण सांवलीची कल्पनाहि मनांत न आणतां लिओनार्डो धांवपळ करीत मठाकडे जाई, तेथल्या 'शेवटचें भोजन' या चित्रावर ब्रशाचे कांहीं फटकारे मारी व पुन: किल्ल्यांतील घोड्याच्या पुतळ्याकडे जाई.''