मध्ययुगांतील रानटीपणा 7
ख्रिस्ताच्या नांवानें युध्दें पुकारणार्या ख्रिश्चनांच्या हृदयांत अशी ही दैवी धीरोदात्त प्रेरणा होती. एच. जी. वेल्स या इतिहासलेखकाला ज्या ध्येयामुळें व युरोपांतील ज्या आत्मदर्शनामुळें उचंबळून आलें तें ध्येय व तो आत्मा यांचे स्वरूप एवंविध होतें. इ.स. १०९६ मध्यें पहिल्या क्रूसेडची ही भीषण लाट अशा प्रकारें युरोपभर पसरली.
भिक्षु पीटर याचे सैनिक केवळ ज्यूंनाच मारीत असें नव्हे, तर ते आपल्या ख्रिश्चन बांधवांनाहि लुटीत. या सैनिकांपैकीं पुष्कळ तर जेरुसलेमपर्यंत गेलेहि नाहींत. त्यांनीं आपले लहान लहान जथे केले. हे जथे युरोपभर प्रार्थना व लूटमान करीत आपलीं जीवनें पवित्र करते झाले. याच ध्येयाला त्यांनीं सारें जीवन वाहिलें. कांही मूठभर लोक जेरुसलेमकडे गेले ; पण तुर्कांनीं त्यांचा फन्ना उडविला !
पहिल्या क्रूसेडची दुसरी तुकडी आली. तींत जरा अधिक वरच्या दर्जाचे व कडक शिस्तीचे लोक होते. पण हृदयांतील दुष्टता मात्र तीच होती. त्यांनीं मुसलमानांपासून जेरुसलेम जिंकून घेतलें. ब्रिटिश ज्ञानकोशांत 'क्रूसेड्स्' बाबत लिहितांना अर्नेस्ट बार्क म्हणतो, ''ख्रिश्चनांनीं केलेली कत्तल केवळ अमानुष होती ! रस्त्यांतून रक्ताचे पाट वाहत होते. रक्तप्रवाहांतून घोडेस्वार दौडत होते. रात्रीच्या वेळीं आनंदानें अश्रू ढाळीत क्रूसेडर्स तेथील ख्रिस्ताच्या थडग्याजवळ गेले व त्यांनीं आपले रक्तानें माखलेले हात प्रार्थनेसाठीं जोडले. त्या दिवशीं १०९७ च्या जुलैमध्यें पहिलें क्रूसेड संपलें.
यानंतर आणखी आठ क्रूसेड्स् म्हणजे धर्मयुध्दें जवळजवळ दोनशें वर्षे चाललीं होतीं. नेहमीं तेच ते रानटी व राक्षसी प्रकार ! ज्यू, ख्रिश्चन, मुसलमान यांच्या कत्तली व लुटालुटी ! या क्रूसेडरांपैकीं कांही थोडे उदात्त ध्येयवादानें प्रेरित झाले असतील, नव्हे, होतेहि. त्यांच्या मनांत कांहीं तरी गूढ आंतरिक प्रेरणा स्फुरलेली होती. या जगांत ख्रिश्चन धर्माला कोठेंहि अडथळा होऊं नये असें त्यांना वाटे. प्रत्येक युगांत कांही मूर्ख पण ध्येयवादी लोक असतातच ; त्याचप्रमाणें गूढ वृत्तीचे व उत्कट भावनांचे सारासीन मुसलमानांसाठीं जग निष्कंटक करूं इच्छीत होते. कत्तली केल्यामुळें इतर माणसें सुधारतात, अधिक चांगलीं होतात असें या वेडपटांना वाटत असते. पण हे स्वप्नांत वावरणारे ध्येयवादी लोक महत्त्वाकांक्षी व स्वार्थी लोकांच्या हातचीं बाहुलीं बनतात. हे ध्येयवादी लोक युध्दाभोंवतीं एक तेजावलय निर्माण करतात व घाणेरड्या कर्मांवर पावित्र्याचा पोषाख चढवितात ! युध्द धार्मिक असो वा व्यापारी असो, त्यांत असे कांहीं ध्येयात्मे असल्यामुळें एकादा कवि मग त्या युध्दावर महाकाव्यहि लिहितो. पण अशीं काव्यें वा असे पोवाडे होऊनहि लाखों निरपराध लोकांची कत्तल कांही थांबत नाहीं. घरेंदारें लुटली जातातच ! मग तीं काव्यें काय चाटावयाचीं ? त्यांमुळें एकाद्या धर्मवेड्या माणसाच्या हातांतील तरवारीनें छिन्नविच्छिन्न झालेल्या बालकाला काय कमी वेदना होतात ? केवळ स्वार्थी व हडेलहप्प माणसानें मारलेल्या मुलाला होणार्या वेदनांइतक्याच वेदना गूढ धर्मवृत्तीनें भारलेल्या माणसानें मारलेल्या मुलाला देखील होतात ! क्रूसेड्समध्यें मूठभर धर्मवेडे गूढवादी लोकहि होते, येवढ्यामुळेंच कांहीं त्या युध्दांना पावित्र्य येत नाहीं. तीं युध्दें माणुसकीस काळिमा फांसणारीं, निंद्य व लाजिरवाणींच ठरतात ! ख्रिश्चन चर्चलाच नव्हे तर सार्या मानवजातीलाच या लांछनास्पद युध्दांचा कलंक लागतो.