मध्ययुगांतील रानटीपणा 39
- २ -
जे कॅथॉलिक पंथी ख्रिश्चन नसत त्यांचाच छळ इन्क्विझिशनपुढें केला जात असे असें नाहीं, तर मुसलमान, ज्यू, सर्वांनाच या न्यायासनापुढें उभें करण्यांत येई. ख्रिश्चन युरोपांत जे मुसलमान व ज्यू राहत, विशेषत: स्पेनमध्यें जे राहत, ते तर या पवित्र होमासाठीं चांगलें जिवंत जळणच होते. त्यांचीं हृदयें पापमय होतीं म्हणून नव्हे, तर त्यांच्या तिजोर्या भरलेल्या होत्या म्हणून त्यांचा बळी घेण्यांत येई. प्रथम, त्यांनीं ख्रिश्चन व्हावें म्हणून त्यांना छळण्यांत येई आणि ते ख्रिश्चन झाल्यानंतर ते चांगले ख्रिश्चन नाहींत म्हणून त्यांना जिवंत भाजण्यांत येई.
मुसलमान व ज्यू यांच्या होळ्या करण्यांत परमानंद मानून पुढाकार घेणारा थॉमस ऑफ टर्रेक्रेमाटा किंवा थॉमस ऑफ टॉर्कीमीडा हा होय. तो दुसर्या नांवानेंच अधिक माहीत आहे. नववा ग्रेगरी हा इन्क्विझिशन या संस्थेचा जनक होता. पण या संस्थेच्या ध्येयाप्रमाणें जर कोणी निष्ठेनें वागला असेल तर तो टॉर्कीमीडाच होय. टॉर्कीमीडा इन्क्विझिशनचा सत्पुत्र होता. प्रार्थना, पैसा व खून या तीन गोष्टींचेच त्याला वेड होतें. तो प्रामाणिक धर्मवेडा होता. मानवप्राण्यांतील अत्यंत भयानक अशी ही व्यक्ति होती. आपल्या बांधवांना मारण्यांत खरोखरच आपण देवाची इच्छा पुरी करीत आहों असें त्याला वाटे. पोप त्याच्यावर पूर्णपणें खुष होता. आपल्या वेडेपणाच्या लहरीनुसार वागण्याची सत्ता पोपनें त्याला दिली होती. तो इन्क्विझिशनचा अध्यक्ष होता. आपल्या कारकीर्दीत त्यानें दोन हजार लोक जिवंत जाळले (कोणी हा आंकडा आठनऊ हजार असा सांगतात.) आणि छळाच्या यंत्रावर घालून हजारोंचीं, लाखोंचीं हाडें भरडून काढलीं ! तो स्वत:च आरोप लादी, स्वत:च साक्षीदार होई, स्वत:च न्यायाधीश होई; येवढेंच नव्हे तर जेथें छळ केला जाई तेथेंहि तो भाग घेई. त्यानें इन्क्विझिशन ही एक अत्यंत अमानुष अशी संस्था बनविली. मानवी बुध्दीनें आजवर निर्मिलेल्या छळाच्या साधनांत व यंत्रांत इन्क्विझिशन केवळ अद्वितीय होय ! टॉर्कीमीडा याच्या नेतृत्वाखाली या इन्क्विझिशनचें काम कसें चालें तें आपण पाहूं या.
पहिली गोष्ट म्हणजे या संस्थेचा अधिकारी कॅथॉलिक नसणार्या सर्व शहरवासीयांना तीस दिवसांच्या आत हजर होऊन क्षमा मागण्याचें फर्मान काढी. तीस दिवसांच्या आंत येऊन 'आम्ही चुकलों' असें म्हणणें जरूर असे. पण फारच थोडे आपण होऊन येत व कबुली देत. तीस दिवस संपले म्हणजे सर्व कॅथॉलिकांस 'तुम्हांला ज्यांची ज्यांची शंका असेल त्यांचीं त्यांचीं नावें जाहीर करा' असें सांगण्यांत येई. एकाद्यावर खटला चालवून त्याला सजा देण्यासाठीं दोन साक्षीदार बस्स होत असत. हे साक्षीदार खुनी, डाकू असले तरी चालत; फक्त ते नांवानें ख्रिश्चन असले म्हणजे पुरें असे ! आरोपीला वकील देण्याची किंवा साक्षीदार बोलावण्याची मुभा नसे. आरोपीच्याविरुध्द जे साक्षीदार असत, ज्यांनीं त्याचें नांव सांगितलेलें असे, त्या सर्वांचीं नांवे आरोपीपासून लपवून ठेवण्यांत येत असत. अशा रीतीनें सारेच स्वत:च्या विरुध्द उभे केलेले असल्यामुळें आरोपीला स्वत:चा बचाव करणें अवघड जाई—नव्हे, अशक्यच असे. त्यानें आरोप कबूल केला तर त्याला तुरुंगांत टाकण्यांत येई. 'मी निरपराध आहें' असेंच तो म्हणत राहिल्यास त्याला छळ-भवनांत नेण्यांत येई. प्रभूच्या सेवेसाठीं म्हणून शोधून काढण्यांत आलेल्या या छळ-यंत्रांवर एक ग्रंथच लिहितां येईल; पण तें माणूसघाणें काम आहे. तरीहि दोनतीन प्रकार सांगतोंच. एक म्हणजे दोरी-कप्पीचा : इन्क्विझिशनचें समर्थन करणारा अर्वाचीन इतिहासकार व्हॅकॅन्दार्ड लिहितो, ''अपराध्याला त्याचे हात पाठीमागें बांधून उभा करीत, नंतर त्याला कप्पीनें वर उंच नेत व थोडथोडें खालीं सोडीत सोडीत एकदम खालीं सोडून देत. हा प्रकार पुन: पुन: करण्यांत येई. पडण्याचा धक्का जोरांत बसावा म्हणून निर्दय छळक अपराध्यांच्या पायांना पुष्कळदां वजनें बांधीत.'' दुसरा विस्तवानें छळण्याचा : अपराध्याचे पाय निखार्यांवर ठेवीत. आगीला आणखी जळण मिळावें आणि पायहि चांगले भाजावे यासाठीं पायांना मेण वगैरे फांशीत. इन्क्विझिटर्स शेजारीं उभे राहून हें भाजणें बघत व पुन: पुन: अपराध्याला विचारीत, ''ज्या ख्रिस्ताच्या नांवानें तुला आम्ही इतक्या सौम्यतेनें व दयेनें वागवीत आहों त्या ख्रिस्ताची शिकवण—कॅथॉलिक शिकवण—मान्य कर.'' विस्तवांत जाळण्याच्या शिक्षेप्रमाणेंच पाण्यांत बुडविण्याचीहि शिक्षा असे. पीळ असलेल्या दोरीनें अपराध्याचे हातपाय इतके करकचून बांधीत कीं, ती दोरी शरीरांत घुसे; नंतर त्याचें तोंड खूप उघडून त्यांत सारखें भराभरा पाणि ओतीत. हे प्रकार आरोपी कबूल होईपर्यंत अगर गुदमरून मरेपर्यंत चालत.
डान्टेनें आपल्या कल्पनाशक्तिनें वर्णिलेल्या नरकांतल्या सार्या शिक्षा इन्क्विझिशनवाल्यांनीं या पृथ्वीतलावर प्रत्यक्ष अमलांत आणल्या. इन्क्विझिटरांच्या कोमल करुणेवर विश्वास नसणार्या सर्वांचीं शरीरें भाजण्यांत वा शीर्णविदीर्ण करण्यांत आलीं. त्यांचीं हाडें भरडण्यांत आलीं !