खर्या संस्कृतीचा प्रारंभ 45
या सुखाच्या वातावरणांत त्यानें दोन अत्यंत मोठ्या कादंबर्या लिहिल्या : १ युध्द व शांति (ही म्हणजे विश्वव्यापक दु:खाचें गद्य महाकाव्य आहे.) २ ऍना कॅरेनिना--वैयक्तिक वासनाविकारांची शोकान्त कथा. पण या कलासेवेमुळें त्याला अद्यापि शांति-समाधान लाभलें नाहीं. आपल्या हातून कांहीं तरी अधिक चांगलें व्हावें असें त्याला वाटत होतें. निर्दोष कादंबर्या लिहिण्यापेक्षां अधिक दात्त कांहीं तरी आपल्या हातून व्हावें अशी अत्यंत उत्कट इच्छा-उत्कंठा त्याच्या मनांत होती. 'युध्द व शांति' या कादंबरींतील नायक प्रिन्स अन्ड्रेई हा जेव्हां ऑस्टर्लिट्झ्र येथें जखमी होऊन पडतो, तेव्हां त्याला जगाच्या आंतरिक शांतिमयतेचें अंधुक दर्शन होतें. त्याला वर पसरलेलें अनंत आकाश दिसतें. पृथ्वीवर चाललेल्या हिंसेकडे, दुष्टपणाकडे व नीचतेकडे आकाश जणूं विचारमग्न दृष्टीनें पाहत असतें आणि तें आकाश पाहून अन्ड्रेईचें मन एकदम अपरंपार व अवर्णनीय आनंदानें उचंबळून येतें. जीवनाच्या अंधारांतून ही जी अंतर्यामींची शांति मधूनमधूंन आढळते, हा जो प्रकाश मधूनमधून दिसतो, तो प्रकाश आपल्या मानवबंधूंना देण्याची चिंता टॉल्स्टॉयला होती. कलेच्या माध्यमाच्या द्वारा आपणास हें करतां येईल असें त्याला वाटेना.
तो एका नवीन प्रकारच्या कलेचा विचार करूं लागला. माणसांमाणसांत सहानुभूतीचा बंध स्थापनण्यासाठीं एक निराळीच कला हवी असें त्याला वाटूं लागलें, लोकांना प्रकाशाकडे घेऊन जाण्याची इच्छा त्याला होती; पण कोणता प्रकाश ? सनातरी धर्मावरची त्याची श्रध्द तर उडून गेली होती. रुसोनें त्याला थोडे दिवस धार्मिक आनंद--निसर्गाचा आनंद--दिला होता. पण अत:पर तेवढ्यानें त्याचें समाधान होईना. खरा धर्म मिळावा म्हणून तो पुन: चर्चकडे वळला. चर्चचीं मतें, चर्चचे आचार, सारें तो पुन: तपासूं लागला. तीन वर्षे त्यानें रोमन कॅथॉलिकांचे सर्व आचार व विधिनिषेध पाळले, पण व्यर्थ. त्याचा कांहींहि उपयोग झाला नाहीं. त्याची ख्रिस्तावर इतकी दृढ भक्ति होती कीं, या रूढ सांप्रदायिक ख्रिश्चन लोकांप्रमाणें बाह्याचारी होणें त्याला शक्य झालें नसतें. ते विधी, ते समारंभ, तीं प्रायश्चित्तें, सारें कर्मकांड त्याला मूर्खपणाचें, पापात्मक, धर्माची निंदा करणारें असें वाटते. तो लिहितो, ''चर्चची शिकवण केवळ कापट्यमय व असत्यमय आहे, यासंबंधीं माझी खात्री झाली आहे. मूर्खपणाच्या रूढींचा, जादूटोण्यांचा, चेटकाचा आचार ! यांच्या बुजबुजाटांत खरा ख्रिश्चन धर्म लुप्त होऊन गेला आहे. जो धर्म मुळांत शांति व प्रेम यांच्यावर आधारलेला होता, पण जो आतां युध्द व असहिष्णुता यांचा प्रचार करीत होता, त्या धर्मापासून तो आतां कायमचा दूर गेला. टॉल्स्टॉय आतां नवधर्माचा प्रणेता झाला. किंवा नवधर्म म्हणण्याऐवजीं बुध्दाचाच विस्मृत धर्म, इसाया, कन्फ्यूशियस व ख्रिस्त यांचाच धर्म तो नव्यानें विवरून सांगत होता. तो या नव्या धर्माचा निरहंकारी प्रस्थापक, नेता होता. या धर्मांत विधि-निषेधांचें अवडंबर नव्हतें, भट-भिक्षुक-उपाध्याय यांचेंहि बंड नव्हतें. यांत चर्चची अडगळ नव्हती. कांहीं साध्या आदेशांवर हा धर्म उभारण्यांत येणार होता. कोणते हे आदेश ? कोणत्या या आज्ञा? कोणाचेंहि वैर करूं नका, क्रोधाच्या आहारीं जाऊं नका, कधींहि हिंसा करूं नका. श्रीमंतांचीं कर्मशून्य विलासलोलूप्ता, शासनसंस्थेचा जुलूम, चर्चची दुष्टता, या गोष्टींविरुध्द त्याच्या नवधर्माचें बड होंते. ''तो समाजवादी, अराजवादी व चर्च न मानणारा झाला. थोडक्यांत म्हणजे तो ख्रिस्ताचा खरा अनुयायी झाला.'' मानव-जातीच्या सेवेसाठीं आपली कीर्ति, आपली प्रतिष्ठा, आपलें स्थान, आपली संपत्ति, फार काय, पण आपले प्राणहि द्यावयास तो तयार होता.