मानवजातीची जागृती 18
हा कार्डिनल माझारिन मॉकिआव्हिलीच्या राजनीतीवर पूर्ण विश्वास ठेवणारा होता. त्यानें आपल्या या छात्राला या सैतानी विद्येंत तरबेज केलें. मॅकिआव्हिलीच्या वचनांनीं भरलेली एक वहीच्या वही त्याच्याजवळ होती. तींतील सर्वांत प्रमुख वचन हें होतें :- ''राजांची पूजा केली पाहिजे. त्यांची इच्छा म्हणजेच कायदा !'' शुध्दलेखन लिहावयास शिकविणार्या त्याच्या पंतोजींनीं हें वाक्य त्याच्याकडून पुन: पुन: घोटून घेतलें होतें.
बाळपणीं लुईची बुध्दिमत्ता सामान्य मुलांच्या बुध्दिमत्तेहून कमी दर्जाची होती. पण माझारिननें लुईच्या हृदयांत सुंदर वस्तूंविषयींची प्रीति निर्मिली. माझारिन हा इटॅलियन होता. त्याचें शिक्षण स्पेनमध्यें झालें होतें आणि आतां तो फ्रेंच संस्कृतीहि आत्मसात् करूं पाहत होता. तो सौंदर्योपासक होता. संगीत व मृर्तिकला यांच्यावर त्याची भक्ति होती. रेशीम व फिती, आरसे व रत्नें, चित्रें व पुस्तकें या सर्वांचा तो षोकी होता. तो जरा डँडी म्हणजे नबाबी वृत्तीचा होता. इटॅलियन भिक्षुणींना तो स्वत:साठीं नाना सुगंधी उटणीं व तेलें तयार करावयास लावी. या सुगंधी उटण्यांचा व तेलांचा उपयोग तो केवळ स्वत:साठींच नव्हे तर आपल्या दोन आवडत्या माकडांसाठींहि करी. पण त्याच्यामध्यें असला नबाबीपणा असला, तरी एकंदरींत तो सौंदर्याचा प्रेम होता यात शंकाच नाहीं. सौंदर्योपासना हा त्याचा जणूं धर्म होता ! जगांतील अत्यंत सुंदर असा कला-संग्रह त्याच्याजवळ होता. मरतांना 'हा सारा कला-संग्रह सोडून जाण्याची पाळी आपणावर येणार' हें एकच दु:ख त्याला वाटत होतें.
माझारिन मेला तेव्हां राजा लुई तेवीस वर्षांचा होता. तो या कार्डिनलजवळच सौंदर्य-प्रेम शिकला होता. सारा फ्रान्स देश त्यानें जणूं म्यूझियन बनविला ! ठायीं ठायीं त्यानें बागा, राजवाडे व सन्त-मंदिरें निर्माण केलीं. देशभर एक प्रकारचें कृत्रिम सौंदर्य दरवळूं लागलें ! राजदरबारांत स्त्री-पुरुष पॉवडरी पचंसून, रंग लावून, उंची पोषाख घालून, आढ्यतनें व आदबीनें हिंडत, खातांपितांना अत्यंत नाजूक हावभाव करीत, साधें वाक्य बोलावयाचें असलें तरी त्यांत मोठमोठे शब्द योजीत. साधेपणा जणूं संपला व कृत्रिमता म्हणजेच जणूं कला व जीवन असें झालें ! राजानें उत्तमोत्तम कवी व नाटककार, तत्त्वज्ञानी व शास्त्रज्ञ, तसेंच उत्कृष्ट आचारी आपल्या दरबारीं बोलावले. एकादा प्रेमळ धनी आपल्या कुत्र्यांशीं वागतो तसा तो सर्वांशीं वागे. आपल्या भोजनाच्या टेबलावरील तुकडे तो त्यांना प्रेमानें देई व त्यांचा कंटाळा आला म्हणजे कचरा फेंकावा त्याप्रमाणें त्यांना दूर फेंकी.
ज्याप्रमाणें पंडितांना व कलावंतांना त्याचप्रमाणें राजशाही वारांगनांनाहि तो वागवी. त्याच्या पुष्कळच वारांगना होत्या. क्षणभर तो त्यांना चढवी आणि मग लाथ मारी. लुईला देव मानणारे त्याचे कांही चरित्रकार तो स्त्रियांच्या बाबतींत असा बेछूट वागणारा नव्हता असें दाखविण्याची खटपट करीत असतात व त्याचीं प्रेमप्रकरणें पुष्कळ असलीं तरीहि तो विवेकी पति होता असें सांगत असतात. त्याचा चरित्रकार बरट्रांड लिहितो, ''अगदीं खासगी बाबतींतील बारीकसारीक गोष्टींबद्दल वाचक क्षमा करणार असतील तर मी सांगतों कीं, आपल्या एकाद्या प्रिय पात्राजवळ अत्यंत कामासक्तीनें रंगलेला असतांहि तो आपल्या पत्नीपासून सर्व रात्र कांहीं दूर राहत नसे. त्या रमणीला सोडून शेवटीं संयमानें तो पत्नीकडे येईच.'' केवढा उदार व उदात्त राजा !