मध्ययुगांतील रानटीपणा 31
स्वर्गांतील देवदूतांचा चांगुलपणा व फ्रान्सची अगतिक दयामय स्थिती या दोन गोष्टी त्या लहान किसानकन्येच्या जीवनांत जणूं जळजळीतपणें लिहिल्या गेल्या होत्या. या दोनच गोष्टी तिला दिसत होत्या. बाकी सार्याचा तिला जणूं विसर पडला होता ! 'फ्रान्स-माझा हा फ्रान्स-देवाचा लाडका आहे. माझ्या भूमीवर देवदूतांचें प्रेम आहे' असें तिच्या आईनें तिच्या मनावर सारखें बिंबविलें होतें. फ्रान्सच्या पवित्र भूमीवरून लुटारू इंग्रज डाकूंस घालवून देण्यासाठीं देवदूत शक्य तितकें सर्व करतील अशी तिची श्रध्दा होती; आणि अशी एक भविष्यवाणी सर्वत्र प्रसृत झाली होती कीं, एक तरुण कुमारी फ्रान्सला वांचवील. जादूगार मर्लिन व 'मी देवदूतांशीं बोलतें' असें सांगणारी अॅव्हिगनॉनची पवित्र बाई मेरी या दोघांनीं हें भविष्य केलें होतें.
आणि जोन आकाशाकडे दृष्टि लावून देवदूत फ्रान्समधून इंग्रजांना घालवून देणारा उध्दारकर्ता कधीं पाठवितात याची वाट पाहत बसे. ती या स्वप्नांतच जणूं मग्न असे.
- ३ -
आणि उन्हाळ्यांतील तो पवित्र दिवस आला होता. सारे श्रध्दाळू लोक त्या दिवशीं उपवास करीत होते. पूर्वी कधीं आलीं नव्हतीं इतकीं स्वर्ग व पृथ्वी हीं जवळ आलीं होतीं व जोनला भास झाला कीं, आसपासच्या निस्तब्ध व पवित्र शांततेंतून आपणास कोणी तरी हांक मारीत आहे. मुख्य देवदूत मायकेल याचा तो आवाज होता. मायकेल काय सांगत होता ? तो म्हणाला, ''जोन, तूं चांगली मुलगी हो व नेहमीं चर्चमध्यें जात जा.''
तिला जरा भीति वाटली, पण आश्चर्य वाटलें नाहीं. देवदूत इतरांशीं बोलतात असें तिनें ऐकिलें होतें. मग आपणाशीं तो कां नाहीं बोलणार, असा विचार तिच्या मनांत आला. सेंट मायकेल हा तिला कांही परका नव्हता. त्याची गोष्ट तिला माहीत होती. त्याचें चित्रहि तिनें पाहिलें होतें. गांवांतील धर्मोपाध्यायानें सांगावें त्याप्रमाणें मायकेलनें आपणास सांगितलें असें तिला वाटलें. 'चांगली मुलगी हो व चर्चमध्यें जात जा' असें मायकेलनें सांगितलें यात आश्चर्य तें काय ?
देवदूत आपणाशीं बोलतात हा भ्रम तिला दिवसेंदिवस अधिक सत्य वाटूं लागला. तिला आणखी देवदूत भेंटूं लागले. मायकेलनंतर सेंट मार्गराईट व सेंट कॅथेराइन यांनीं तिला भेटी दिल्या. जोनला त्यांचा परिचय होताच. तिला त्यांच्या मूर्ती वर हवेंत दिसतांच त्यांच्या चित्रांवरून तिनें त्यांना पट्करून ओळखलें.
जोनला देवदूत प्रथम भेटले त्या वेळीं ती केवळ तेरा वर्षांची होती. ते तिच्याशीं रोज बोलत. कधीं कधीं ते दिवसांतून अनेकदां येत व बोलत. तिला ते स्पष्टपणें दिसत व त्यांचे आवाज स्पष्ट ऐकूं येत. चर्चमधील घंटा वाजत; तिला त्यांच्या मूर्ती दिसत व आवाज ऐकूं येत. प्रथम प्रथम हे देवदूत तिच्याशीं सामान्य गोष्टींबाबतच बोलत. एके दिवशीं देवदूत मायकेल तिला म्हणाला, ''फ्रान्सच्या राज्याविषयीं मला करुणा वाटते, दया येते. हे ईश्वराच्या कन्ये, आपला गांव सोडून फ्रान्सच्या साह्यार्थ जाण्याची तुझी पाळी आली आहे.'' मायकेलनें तिला 'ईश्वराची कन्या' हें नांव दिलें होतें. पुन: दुसर्या एका वेळीं 'तूं फ्रान्सचें राज्य योग्य राजाला—ज्या राजाचा कायदेशीर हक्क आहे त्याला-परत दे' असें त्यानें तिला आग्रहानें सांगितलें.
मर्लिनचें भविष्य खरें होणारसें दिसूं लागलें. डॉमरेमी गांवची किसान-कन्या जोन 'फ्रान्सची संरक्षणकर्ती' म्हणून प्रभूकडून निवडली गेली व हळूहळू जोनलाहि तेंच आपलें जीवितकार्य असें वाटूं लागलें. ती शाळेंत शिकलेली नव्हती. तिचें जीवन श्रध्दामय होतें. तिची स्वत:ची उत्कट इच्छा तिला जणूं स्वच्छ, स्पष्ट व मूर्त अशी दिसत होती. तिच्या मनांतील विचारांनी जणूं मूर्तरूप घेतलें, त्यांना जणूं पंखच फुटलें ! तिला आपलेंच विचार देवदूतांच्या स्वरूपांत वर आकाशांत दिसूं लागले व ते प्रभूची आज्ञा तिला समजावून देऊं लागले. प्रभूची कोणती आज्ञा ? प्रभूचा कोणता आदेश ?