मानवजातीचें बाल्य 33
बुध्द निर्वाण या शब्दानें निश्चित काय समजत असत तें त्यांनीं कधीं स्पष्ट केलें नाहीं. कदाचित् त्यांना तें शब्दांत सांगतां येत नसेल. किंवा त्यांनाहि नीट कळलें नसेल. शिष्यांनीं निर्वाणाविषयीं पुष्कळदां विचारलें. परंतु बुध्द उत्तर देण्याचें टाळीत. अशा वेळेस ते नेहमीं गंभीर असें मौन पाळीत. या मौनाची शिष्य क्षमा करीत. तें मौन त्यांना जणूं पूजाहि वाटे, पवित्र वाटे. स्वर्गाची, त्या निर्वाणाच्या अंतिम दशेची कल्पना बुध्द शब्दांत कशी आणून देणार असा त्या मौनाचा अर्थ शिष्य करीत. जेव्हां जीव निर्वाणाप्रत जातो तेव्हां त्याला स्वत:ची जाणीव कोठून उरणार ? त्या वेळेस त्याला सतहि म्हणतां येत नाहीं, असतहि म्हणतां येत नाहीं ; जणूं तो मृतहि नाहीं, सजीवहि नाहीं. ती अत्यंत परमकोटीच्या आनंदाची स्थिति असते. जीवनाहून वा मरणाहून पर, दोहांहूनहि श्रेयस्कर अशी ती स्थिती असते. बुध्दांचे शिष्य निर्वाणाचा अशा प्रकारचा कांही तरी अर्थ लावीत. जेव्हां बुध्द मरण पावले तेव्हां शिष्य म्हणाले, ''बुध्द आतां अपरंपार अनंत सागराप्रमाणें गंभीर झाले आहेत ; सदसतांच्या पलीकडे ते गेले आहेत. सदसतांच्या संज्ञा, ही परिभाषा त्यांना आता लावतां येणार नाहीं.''
म्हणजे बुध्दांचा जीवात्मा जणूं अवर्णनीय अशा अनंताचें स्वरूप धारण करिता झाला. अनाकलनीय अशा शाश्वततेचें चिंतन करणारे ते जणूं अनंत परब्रह्मच झाले. शाश्वत नि:स्तब्धतेच्या, अखंड शांतीच्या संगीतांत शून्यत्वाचा डंका ते वाजवीत राहिले.
माझ्या समजुतीप्रमाणें निर्वाणाचा खरा अर्थ हा असा आहे.
- ६ -
बुध्दांनीं कल्पिलेल्या स्वर्गाची कल्पना जरी बालिश वाटली तरी चांगल्या जीवनाची त्यांनी केलेली कल्पना, चांगल्या जीवनाविषयींची त्यांची शिकवण अति उदात्त आहे. ते म्हणतात, ''या दु:खमय संसारांत आपण सारे भाऊ-भाऊ आहों. जणूं आपण एका कुटुंबांतील आहों.'' या आपल्या विशाल कुटुंबांत बुध्द केवळ मानवप्राण्यांचाच अंतर्भाव करीत असें नव्हे, तर सर्व सजीव सृष्टीचा ते अंतर्भाव करीत. जे जे जीवन जन्मतात, दु:खें भोगतात, मरतात, ते ते सारे एकाच कुटुंबांतले. बुध्दांना प्रत्येक प्राणमय वस्तु, प्रत्येक जीव म्हणजे करुणेचें काव्य वाटे. मानवी वेदनांची भाषा जितक्या कोमलतेनें ते जाणत तितक्याच कोमलतेनें पशुपक्ष्यांचीहि अस्पष्ट वेदना त्यांना कळे. मूसाप्रमाणें बुध्दांनींहि वागण्याचे दहा नियम दिले आहेत. त्या दहा आज्ञांतील पहिली व सर्वांत महत्त्वाची आज्ञा ''कोणत्याहि स्वरूपांत जीवाची हिंसा करूं नका'' ही आहे. ज्याअर्थी आपणांस जीव निर्माण करतां येत नाहीं, त्या अर्थी त्याची हिंसा करण्याचाहि हक्क आपणांस नाहीं. त्यांच्या सर्व शिकवणीचा हा मुख्य बिंदु आहे, हा मुख्य आधार आहे.
बुध्दांच्या नीतिशास्त्रांतील दुसरीं महत्त्वाचीं तत्त्वें म्हणजे नेमस्तपणा, सहनशीलता, प्रेम, इत्यादि होत.