खर्या संस्कृतीचा प्रारंभ 44
- ३ -
१८५६ सालीं टॉल्स्टॉयनें सैन्यांतून राजीनामा दिला व तो सेंटपीटर्सबर्ग उर्फ लेनिनग्राड येथें परत आला. तो येण्यापूर्वीअच 'शिपाई व लेखक' म्हणून त्याची कीर्ति तेथे येऊन धडकली होती ! तो येतांच त्याला लोक साहित्य-सम्राट्-साहित्यांतील सिंह समजूं लागले. शहरांतील प्रमुख लेखकांनीं व कलावंतांनीं त्याचा सत्कार केला, त्याला आपल्या बैठकींतहि घेतलें; पण ते सारे दांभिक आहेत असें त्याला आढळून आलें. त्यांना स्वत:चीं मतें नव्हतीं. तें संपत्तीचे गुलाम होते. 'जो देईल पोळी, त्याची वाजवावी टाळी' असे ते होते. आपण म्हणजे मानवजातीचीं वेंचक माणिक-मोतीं असें ते समजत. ते स्वत:ला आपल्या काळांतील बौध्दिक पुरुष श्रेष्ठ मानीत. आपण सृष्टीचें भूषण आहों, वैभव आहों, असें ते समजत. ते जें कांहीं लिहीत, तें वरिष्ठ वर्गासाठीं लिहीत. आपल्या उदात्त विचारात सहभागी होण्यास बाकीची मानवजात अपात्र आहे असें त्यांना वाटे. पण टॉल्स्टॉयची वृत्ति नेहमी याच्या उलट होती. वाङ्मय हा त्याचा धर्म होता. साहित्यसेवा त्याला पवित्र वाटे. सौंदर्य व शहाणपण यांचें उपनिषद् म्हणजे वाङ्मय, सार्या मानवजातीनें त्यांत सहभागी व्हावें असेसं त्याला वाटे. 'सत्साहित्य ही सर्वांची मिळकत, सर्वांचा साहित्यावर वारसा' असें त्याचें मत असे. तो मूठभर लोकांची करमणूक करण्यासाठी लिहीत नसे, तर बहुजनसमाजाला सुशिक्षित करण्यासाठीं लिही.
तो बहुजनसमाजासाठीं लिही, याचा अर्थ त्याला त्याच्या बुध्दिमत्तेची यथार्थ कल्पना नव्हती असा नव्हे. बहुजनसमाजाच्या क्षुद्र व तुच्छ जीवनाची बाजू त्याला ठाऊक होती. बहुजनसमाज जणूं गुरांढोरांप्रमाणें वागे, हें टॉल्स्टॉय जाणून होता. पण 'तेखलडोव्ह' नायकाप्रमाणें हे शेतकरीहि प्रकाशासाठीं धडपडत आहेत ही गोष्टहि तो पाहत होता. आंतरिक वृत्तीनेंच ते प्रकाशाकडे चाचपडत येत आहेत हें त्याच्या दृष्टीस दिसत होतें. शेतकर्यांना, बहुजनसमाजाला कोणी तरी नेता वा मार्गदर्शक हवा होता. ''लोकांना काय पाहिजे आहे हें समजून घेण्यासाठीं त्यांच्याकडे जा, त्यांच्या गरजा समजून घ्या व त्या पूर्ण होण्यासाठीं त्यांना साह्य करा.''
यास्नाया पोलियाना येथें त्यानें शेतकर्यांची शाळा उघडली. या शाळेंत तो पंतोजी म्हणून वागत नसे, तर त्यांच्याबरोबर सहविद्यार्थी होई. तो किसानांचा सहाध्यायी होई. टॉल्स्टॉय म्हणे कीं, ''जीवनाच्या गहन, गूढ ग्रंथांतील पहिली मुळाक्षरें धोकणार्या मुलांप्रमाणें ते सारे होतें.'' पोलिसांनीं ती शाळा बंद केली. 'शेतकर्यांना त्यांच्या अज्ञानांत तसेंच पडूं दे' असें टॉल्स्टॉयला सांगण्यांत आलें. यानंतर आजार व निराशा यांचे महिने आले. त्याचे दोन भाऊ क्षयानें मेले. आपणासहि तोच रोग आहे अशी टॉल्स्टॉयला शंका आली. त्याची सारी श्रध्दा लोपली. त्याची मंगलावरची श्रध्द गेली. त्याचा कशावरच विश्वास उरला नाहीं. त्याच्या डोक्यांत आत्महत्येचे विचार डोकावूं लागले. पण या वेळेस त्याच्या कलेनें तसेंच त्याच प्रेमानेंहि त्याला वांचविलें. सोपिच्या ऍन्ड्रेयेवना बेहर्स नांवाच्या सतरा वर्षांच्या मुलीशीं त्यानें लग्न केलें. तो तिच्या दुप्पट वयाचा होता. त्यानें पंधरा वर्षे अमिश्र आनंद उपभोगला. त्याच्या जीवनाचें आकाश निरभ्र व स्वच्छ होतें. त्याची पत्नी बुध्दिमती होती. ''मी खर्या ग्रंथकाराची पत्नी आहे; माझा तो हक्क आहे.'' असें ती म्हणे. ती त्याला शुध्दलेखन घाली, त्याच्या कल्पनाशक्तीला चेतवी, त्याला उत्तेजन देई. ती त्याच्या हस्तलिखिताच्या कष्टानें व मेहनतीनें नकला करी. जी कांहीं अत्यंत मनोहर पृष्ठें त्यानें रंगविलीं आहेत त्यांच्यासाठीं ती जणूं आदर्श म्हणून त्याच्यासमोर असे.